अत्याधुनिक कौशल्य शिक्षणासाठी आज 4 सामंजस्य करार

0
5

>> कौशल्य विकास खात्याच्या संचालकांची माहिती; 6 अभ्यासक्रमही चालीस लावणार

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांतील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यावर भर दिला जात असून, विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नामवंत कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले जात आहेत. जागतिक युवा कौशल्य दिनी आयटीआयमधील अत्याधुनिक कौशल्य शिक्षणासाठी आणखी चार सामंजस्य करारावर सह्या करण्यात येणार आहेत. त्यात टाटा स्ट्राईव आणि जॅक्वार व इतर दोन कंपन्यांचा समावेश आहे. टाटा स्ट्राईवच्या माध्यमातून 23 कमी कालावधीचे अभ्यासक्रम आणि 6 मोठ्या कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती राज्य सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचे संचालक एस. एस. गावकर यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना काल दिली.

कौशल्य विकास खात्याने आयटीआयमधील विद्यार्थ्यांना अद्ययावत कौशल्य मार्गदर्शन करण्यावर भर दिला आहे. आयटीआयमधील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन केले जात आहे. त्याचबरोबर विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आयटीआय केंद्रांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करत आहेत. वाहन उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या मारुती सुझुकी, ह्युंडाई यासारख्या कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. या कंपन्यांनी आवश्यक नवीन साधनसुविधा सुध्दा उपलब्ध केल्या आहेत. या कंपन्यांकडून आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी मदत केली जात आहे, असेही गावकर यांनी सांगितले.

टाटा स्ट्राईव या कंपनीच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी 23 कमी कालावधीचे आणि 6 मोठ्या कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. त्यात ड्रोन, रोबोटिक्स, 3 डी प्रिटींग, आयओटीएस, स्मार्ट ॲग्रिकल्चर आदी नवीन अभ्यासक्रमाचा समावेश आहे. तसेच, आयटीआयमध्ये प्लबिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी जॅक्वार या आघाडीच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला जाणार आहे, असेही गावकर यांनी सांगितले.

ॲप्रेंटिसशिप योजनेखाली नियुक्तीपत्रांचे आज वितरण

राज्य सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शनिवार दि. 15 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता ताळगाव येथे सामाजिक सभागृहात खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात ॲप्रेंटिसशिप योजनेखाली नोंदणी केलेल्या तरुण-तरुणींना सरकारी कार्यालये आणि खासगी कंपन्यांत प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्तीपत्रांचे वितरण केले जाणार आहे.या कार्यक्रमात राज्य सरकारने ॲप्रेंटिसशिप योजनेखाली सरकारी कार्यालये आणि खासगी क्षेत्रात 10 हजारांवर नोकरीच्या संधी तयार केल्या आहेत. आत्तापर्यंत पोर्टलवर साडेआठ हजारापेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली आहे. राज्य सरकारच्या विविध खात्यांकडून ॲप्रेंटिसशिप योजनेखाली नियुक्तिपत्रांचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, महसूल, कामगार व रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार जेनिफर मोन्सेरात, रुडॉल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, विरेश बोरकर, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, शिक्षण आणि कौशल्य विकास सचिव प्रसाद लोलयेकर उपस्थित राहणार आहेत.