चांद्रयान-3 आज अवकाशात झेपावणार

0
10

>> दुपारी 2 वाजून 35 मिनिटांची वेळ निश्चित; मोहिमेकडे सर्व देशवासीयांचे लक्ष; 615 कोटींचा खर्च

‘चांद्रयान-3′ मोहिमेकडे सर्व देशवासीयांचे लक्ष लागले असून, आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून आज (दि. 14 जुलै) दुपारी 2.35 वाजता ‘चांद्रयान-3′ अंतराळात प्रक्षेपित केले जाईल. 6 सप्टेंबर 2019 च्या पहाटे चंद्रावर लँडर व रोव्हर आदळल्यानंतर चांद्रयान-2 मोहीम अंशत: अयशस्वी झाली होती. आता चांद्रयान-3 च्या लँडरने 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे अपेक्षित आहे. 615 कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या चांद्रयान-3 या मोहिमेचे उद्दिष्ट हे रोव्हरला चंद्राच्या कक्षेमध्ये पोचवणे आणि चंद्राच्या पृष्ठभागावर वैज्ञानिक प्रयोग करणे हे आहे. विक्रम लँडर, प्रग्यान रोव्हर आणि प्रोपल्जन मॉड्यूल असे चांद्रयान-3 चे तीन प्रमुख भाग आहेत.

चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरला सप्टेंबर 2019 मध्ये चंद्रावर अलगद उतरण्यात अपयश आल्यानंतर त्या मोहिमेचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी आणखी एक मोहीम आखण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो केली होती. त्याला अनुसरून सुमारे 615 कोटी रुपये खर्चून चार वर्षांत चांद्रयान-3 ही मोहीम सज्ज केली आहे.
प्रक्षेपण कसे होणार?
चांद्रयान-2 मोहिमेतील ऑर्बिटर चंद्राभोवती कार्यरत असल्याने चांद्रयान-3 मोहिमेत ऑर्बिटरचा समावेश करण्यात आलेला नाही. गरज असेल तेव्हा चांद्रयान-2 चा ऑर्बिटर विक्रम लँडरशी संपर्क साधू शकेल. त्याचसोबत प्रोपल्जन मॉड्यूलही चंद्राभोवतीच्या 100 किलोमीटरच्या कक्षेतून संदेशांची देवाणघेवाण करेल. लाँच व्हेईकल मार्क 3 (एलव्हीएम 3) या भारताच्या सर्वात मोठ्या रॉकेटच्या साहाय्याने चांद्रयान-3 चे प्रक्षेपण करण्यात येईल.
मोहिमेचे महत्त्व काय?

ही मोहीम यशस्वी ठरल्यास अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीननंतर चंद्रावर यान उतरवणारा भारत चौथा देश ठरेल. मोहीम यशस्वी ठरल्यास चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यान उतरवणारा भारत पहिला देश ठरेल. बहुतांश काळ अंधारात असणाऱ्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पाणी असून, त्याचे नेमके स्वरूप भारताच्या मोहिमेतून समजेल. चंद्रावर पुन्हा माणसाला पाठवण्यासाठी आखण्यात आलेल्या अमेरिकेच्या आर्टेमिस मिशनला चांद्रयान 3 कडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होईल.

‘चांद्रयान-3′ मोहिमेचा अपेक्षित घटनाक्रम
14 जुलै रोजी दुपारी 2.35 ला श्रीहरीकोटाच्या अंतराळ केंद्रातून ‘चांद्रयान-3′ प्रक्षेपण करेल.
16 मिनिटांमध्ये ‘एलव्हीएम-3′ रॉकेटमधून ‘चांद्रयान-3′ विलग होऊन पृथ्वीभोवती 170 बाय 36500 किमीची दीर्घ वर्तुळाकार कक्षा प्राप्त करेल.

पुढील काही दिवसांत यानाची पृथ्वीभोवतीच्या कक्षेचा विस्तार करण्यात येईल. या प्रक्रियेतून यानाची गती वाढेल. वाढलेल्या गतीचा उपयोग करून यानाला चंद्राच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येईल.
प्रोपल्जन मॉड्यूलच्या साह्याने चंद्राजवळ पोचल्यावर यानाला चंद्राभोवती दीर्घवर्तुळाकार कक्षेत सोडण्यात येईल.
दीर्घवर्तुळाकार कक्षा टप्प्याटप्प्याने कमी करून अंतिमतः ‘चांद्रयान-3’ला चंद्राभोवती 100 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल
23 किंवा 24 ऑगस्टला (किंवा सप्टेंबर अखेरीस) प्रोपल्जन मॉड्यूलपासून विलग झालेले ‘लँडर’ चंद्रावर निश्चित केलेल्या ठिकाणाकडे टप्प्याटप्प्याने उतरण्याची प्रक्रिया पार पाडेल.

चांद्रयान-3 मधील उपकरणे आणि त्यांचे कार्य

लँडर’वरील उपकरणे :
रंभा एलपी : चंद्राच्या पृष्ठभागाजवळील प्लाझ्माची (आयन आणि इलेक्ट्रॉन) विविध वेळांमध्ये घनता तपासणे.
चास्ते : चंद्राच्या ध्रुवानजीकच्या प्रदेशाचे औष्मिक गुणधर्म तपासणे.
इल्सा : स्थानकाच्या भागातील भूकंपांच्या नोंदी घेऊन चंद्राच्या कवचाचा अंदाज बांधणे.

‘रोव्हर’वरील उपकरणे :
एपीएक्सएस : चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक गुणधर्म तपासणे आणि खनिजांचा अभ्यास करणे.
लिब्स : चंद्राच्या पृष्ठभागावरील माती आणि दगडांमधील मूलद्रव्यांचा शोध घेणे
प्रोपल्जन मॉड्यूलवरील उपकरण :
शेप : चंद्राभोवतीच्या कक्षेतून इन्फ्रारेड लहरींमध्ये पृथ्वीच्या नोंदी घेऊन बाह्यग्रहांच्या शोधासाठी मार्गदर्शक प्रणाली विकसित करणे.

चांद्रयान-2 मधील त्रुटींमधून नव्या मोहिमेत दुरुस्ती

चंद्रावर यान उतरण्याच्या अपेक्षित जागेची सीमा 500 मीटर बाय 500 मीटर वरून चार किलोमीटर बाय 2.4 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यानाला ऐनवेळी थोडे दूर जावे लागले तरी स्वयंचलित यंत्रणा त्यात दुरुस्ती करून अडथळा निर्माण करणार नाही.
यानाची इंधन क्षमता वाढवण्यात आली असून, यान दुसऱ्या जागेची गरज भासल्यास ते आणखी प्रवास करू शकेल.
विक्रम ‘लँडर’चे चार पाय अधिक मजबूत करण्यात आले आहेत.
चार इंजिनांच्या साह्याने ‘चांद्रयान-3′ अलगद चंद्रावर उतरेल.
यानावरील ‘सोलर पॅनल’चा विस्तार वाढवण्यात आला आहे.
संपर्कासाठीच्या अँटेनाची संख्याही वाढवण्यात आली आहे.
यानावरील ‘सॉफ्टवेअर’मध्ये मोठे बदल करण्यात आले असून, यान स्वयंचलित ‘मोड’मध्ये असताना चुका टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या वेळी सॉफ्टवेअरमधील चुकीमुळे यानाच्या विविध यंत्रणांचे कार्य बिघडत गेले होते.

लँडिंग साइटची (चंद्रावर उतरण्याची जागा) ‘चांद्रयान-2’ने टिपलेली छायाचित्रे ‘चांद्रयान-3’च्या मेमरीमध्ये आधीच टाकण्यात आली असून, ‘चांद्रयान-3’च्या कॅमेराने पूर्वीच्या छायाचित्रांचा आधार घेऊन चंद्रावर उतरण्याची जागा निश्चित करायची आहे.