राज्यात पावसाची संततधार सुरूच असून, सलग दुसऱ्या दिवशी काही भागांना जोरदार पावसाने झोडपून काढले. राज्यात चोवीस तासांत 5.25 इंच पावसाची नोंद झाली, तर आतापर्यंत एकूण 46.93 इंच पावसाची नोंद झाली आहे. या मोसमातील आत्तापर्यंतच्या दुसऱ्या सर्वांत जास्त पावसाची नोंद काल झाली. तसेच राज्यात झाडांच्या पडझडीच्या 58 घटनांची नोंद झाली. हवामान विभागाने गुरुवारी जोरदार पावसाची शक्यता गृहीत धरून रेड अलर्ट कायम ठेवला होता. शुक्रवार दि. 7 जुलैसाठी ऑरेंज अलर्ट जारी करून जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली. तसेच 8, 9 आणि 10 जुलैसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात बुधवारी जोरदार पावसाची नोंद झाल्याने राज्यातील विद्यालये, महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी देण्यात आली होती. राज्यात गेले काही दिवस सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मोसमी पावसाची तूट भरून आली असून, अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील दक्षिण गोव्यात चांगल्या पावसाची नोंद होत आहे, तर उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे.
राज्यभरात झाडाच्या पडझडीच्या 58 घटनांची नोंद झाली. तिसवाडीतील गोवा वेल्हा, दोनापावल, मेरशी, मिरामार, टोक येथे रस्त्यावर झाडे मोडून पडली होती. पणजी शहरातील डॉन बॉस्को विद्यालयाजवळील एका पेट्रोल पंपाजवळील झाड मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी 6 च्या सुमारास घडली. यावेळी त्या परिसरात कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या दुचाकी व इतर सामानाचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून संध्याकाळ 5 वाजेपर्यंत तिसवाडी भागात आणखी 8 झाडाच्या पडझडीच्या घटनांची नोंद झाली.
काणकोणात सर्वाधिक 6.64 इंच पाऊस
चोवीस तासांत काणकोण येथे सर्वाधिक 6.64 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा 4.92 इंच, पेडणे 5.14 इंच, फोंडा 4.96 इंच, पणजी 6.23 इंच, जुने गोवे 4.90 इंच, साखळी 3.22 इंच, वाळपई 3.30 इंच, काणकोण 6.64 इंच, दाबोळी 4.97 इंच, मडगाव 5.51 इंच, मुरगाव 5.51 इंच, केपे 4.72 इंच, सांगे 6.12 इंच पावसाची नोंद झाली. राज्यातील म्हापसा, दाबोळी आणि मुरगाव हे तीन विभाग मोसमी पावसाच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. मुरगाव येथे 48.28 इंच, दाबोळी येथे 47.71 इंच आणि म्हापसा येथे 47.31 इंच पावसाची नोंद झाली.
अंजुणे धरणात अजूनही 9 टक्के पाणीसाठा
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यातील वाळपई आणि साखळी येथे आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण कमी नोंद झाले आहे. उत्तर गोव्यात मोसमी पावसाची आत्तापर्यंत सुमारे 6.9 टक्के तूट आहे. सत्तरीतील अंजुणे धरणामध्ये केवळ 9 टक्के पाण्याचा साठा आहे.
साळावली धरणातील पाणीसाठ्यात वाढ
सांगे येथील साळावली धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली असून, आता पाण्याचा साठा 42 टक्क्यांवर पोहोचला आहे. फोंडा तालुक्यातील पंचवाडी येथील म्हैसाळ धरणातील पाण्याचा साठा 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. आमठाणे धरणामध्ये 56 टक्के, गावणे धरणामध्ये 55 टक्के आणि चापोली धरणामध्ये 48 टक्के
जलसाठा आहे.
केपे, सांगे, काणकोणात पावसाचे इंचांचे अर्धशतक
राज्यातील आणखी तीन तालुक्यात मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक पूर्ण केले. केपे येथे आत्तापर्यंत 52.05 इंच, सांगे येथे 50.24 इंच आणि काणकोण येथे 50.25 इंच पावसाची नोंद झाली. मडगाव येथे मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक बुधवारीच पूर्ण केले असून, आत्तापर्यंत 56.57 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण चांगले असून, आत्तापर्यंत 16.9 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.