राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची काल दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे. दोन खासदारांमध्ये प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांचा समावेश आहे. निलंबित आमदारांमध्ये अजित पवारांसह एकूण 9 जणांचा समावेश आहे. या बैठकीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय समितीने एकूण 8 ठराव मंजूर केले आहेत.
दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्यावर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पक्षावर कोणीही दावा करू द्या, कोणीही काहीही बोलत असेल त्याला काही तथ्य नाही. या बैठकीत 11 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. आम्हाला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळेल. राष्ट्रवादीचा आपण एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आयोग आम्हाला योग्य तो न्याय देईल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगाव्यतिरिक्त अन्य संस्थांकडून जाऊ, असे बोलत पवारांनी आपण न्यायालयातही जाऊ शकतो, असे संकेत दिले.