>> शिक्षण खात्याचा आदेश; मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे खबरदारीचा उपाय; महाविद्यालयांच्या पूर्वनियोजित परीक्षा मात्र होणार
भारतीय हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने राज्यातील प्राथमिक, माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयांना शिक्षण खात्याकडून गुरुवार दि. 6 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्यात येणार नाही, त्या पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होतील, असे उच्च शिक्षण खात्याने म्हटले आहे. दरम्यान, राजधानी पणजीसह राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाने काल झोडपून काढल्याने जनजीवनावर परिणाम झाला. मुसळधार पावसानंतर पणजी पुन्हा एकदा पाण्याखाली गेली. येथील हवामान विभागाने रेड अलर्ट काल सकाळी जारी केला; मात्र मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू झाली होती. बुधवारी सकाळी पावसाच्या प्रमाणात आणखी वाढ झाली. दिवसभरात सातत्याने अविश्रांत सरी कोसळल्या. राज्यात येत्या 6 जुलैला जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर 7 व 8 जुलैसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत शालेय मुलांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पहिली ते बारावीपर्यतच्या मुलांना सुट्टी देण्यात येत आहे, असे परिपत्रक शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केले आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, राज्य सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाने एक परिपत्रक जारी करून संचालनालयाच्या कक्षेत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. तथापि, पूर्वनियोजित परीक्षा रद्द करण्यात येणार नाही. नियोजित वेळापत्रकानुसार परीक्षा घेतली जाणार आहे, याची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असे परिपत्रकात म्हटले आहे.
पणजी, मिरामारमध्ये पाणीच पाणी
काल जोरदार पावसामुळे मिरामार, कांपाल, पणजी शहरातील अनेक भागांत पावसाचे पाणी तुंबल्याने वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय झाली. कांपाल ते मिरामार ह्या दयानंद बांदोडकर मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याचा अंदाज न आल्याने काही वाहने गटारात कलंडल्याच्या घटना घडल्या. मिरामार सर्कल पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. तसेच, राज्यातील पावसाचा जोर कायम असल्याने अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचले. परिणामी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस आणखी काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. राज्यात पडणाऱ्या गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मोसमी पावसाची तूट भरून आली आहे.
पडझडीच्या 47 घटनांची नोंद
राजधानी पणजी शहरातीतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. सखल भागात असलेल्या कांपाल, मळा, पाटो, सांतइनेज, ताळगाव, करंजाळे आणि टोंक भागात पावसाचे पाणी साचले होते. या परिसरातील काही घरांत पाणी शिरले. नेरुळ येथील फ्रान्सिस्को मेंडिस यांच्या मालकीच्या मारुती व्हॅनवर नारळाचे झाड पडल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. गोवा वेल्हा येथील क्वीन ऑफ एंजल चॅपलजवळील घरावर भेंडीचे झाड पडले. राज्यात चोवीस तासांत पडझडीच्या आणखी 31 घटनांची नोंद झाली. तसेच, बुधवारी सकाळपासून पडझडीच्या 16 घटनांची नोंद झाली.
मडगावात 51.06 इंच पाऊस
मडगाव येथे मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक ओलांडले आहे. मडगाव येथे आत्तापर्यंत 51.06 इंच पावसाची नोंद झाली आहे. केपे येथे मोसमी पाऊस इंचाच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. दक्षिण गोव्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत 6 टक्के जास्त नोंद झाले आहे.
उत्तर गोव्यात पावसाचे प्रमाण कमी
राज्यात उत्तर गोव्यात आत्तापर्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात मोसमी पावसाची आत्तापर्यंत सुमारे 14 टक्के तूट आहे. सत्तरीतील अंजुणे धरणामध्ये केवळ 7 टक्के पाण्याचा साठा आहे. वाळपई साखळी या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण जास्त नोंदविणाऱ्या वाळपईमध्ये आत्तापर्यंत 29.99 इंच पावसाची नोंद झाली आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी
मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत गोवा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्कालीन स्थितीत मदत मिळवण्यासाठी संपर्क क्रमांक जारी केले आहेत. त्यात संपूर्ण राज्यासाठी 08322419550, उत्तर गोव्यासाठी 08322225383 आणि दक्षिण गोव्यासाठी 08322794100 हा संपर्क क्रमांक जाहीर केला आहे.
24 तासांत 4.16 इंच पाऊस
राज्यात चोवीस तासांत 4.16 इंच पावसाची नोंद झाली. आत्तापर्यंत एकूण 41.52 इंच पावसाची नोंद झाली आहे. काणकोण येथे सर्वाधिक 6.70 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा 3.70 इंच, पेडणे 3.49 इंच, फोंडा 3.06 इंच, पणजी 4.70 इंच, जुने गोवे 3.07 इंच, साखळी 1.87 इंच, वाळपई 1.53 इंच, काणकोण 6.70 इंच, दाबोळी 4.11 इंच, मडगाव 4.82 इंच, मुरगाव 4.11 इंच, केपे 5.53 इंच, सांगे 4.11 इंच पावसाची नोंद झाली.
गोव्यासह अन्य राज्यांत पावसाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने आगामी 5 दिवसांत गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील घाट भागात हलका, मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. कोकण आणि गोव्यात 6 जुलै रोजी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 6 रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात, 7 रोजी गुजरात प्रदेशात आणि 7 आणि 8 जुलै रोजी सौराष्ट्र आणि कच्छ भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
नदीच्या प्रवाहात महिला गेली वाहून
नाकेरी-बेतुल येथे शेतात काम करणारी एक महिला नदीच्या पाण्यात वाहून बेपत्ता झाली. तिचे नाव फ्लोरिना डिसोझा (56) असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती नायकिणी-बेतुल येथील रहिवासी आहे. ती शेतात काम करायला गेली होती. नदी पार करून जाताना अचानक पुराचे पाण्याचा प्रवाह वाढला आणि ती वाहून गेली. सायंकाळी उशिरापर्यंत तिचा पत्ता लागू शकला नाही.