पक्ष कोणाचा?

0
23

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची व्याप्ती आता हळूहळू स्पष्ट होऊ लागली आहे. अजित पवार आणि शरद पवार अशा सरळ सामन्याचे स्वरूप या संघर्षाला आता आलेले दिसते. दोन्ही गटांमध्ये एकमेकांच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करणे, कार्यालयांवर ताबा घेणे असले प्रकार सुरू झालेले आहेत. अजितदादा गटाने मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केल्याने शरद पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने त्याविरुद्ध वयाच्या 82 व्या वर्षी दंड थोपटून ते स्वतः मैदानात उतरले आहेत. आपले गुरू यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचा आशीर्वाद घेऊन त्यांनी बंडखोरांना आगामी निवडणुकीत धडा शिकवण्याचा आणि पक्ष पुन्हा उभा करण्याचा संकल्प जाहीर केला. निवडणुकीत जे व्हायचे ते होईल, परंतु त्याआधी पक्ष आपल्या हातातून जाऊ द्यायचा नसेल तर विधिमंडळ, निवडणूक आयोग आणि न्यायालय अशा तीन आघाड्यांवर शरद पवार गटाला लढाई लढावी लागणार आहे. राज्यातील आणि केंद्रातील सरकारच विरोधात उभे असताना ही लढाई जिंकणे किती कठीण आहे हे मूळ शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील गेल्या वर्षभरातील संघर्षातून पुरेपूर कळून चुकलेच आहे. त्यामुळे तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या चुका न करण्याची धडपड शरद पवार गटाने केलेली चालवली आहे. अजितदादांचा शपथविधी झाल्याचे दिसताच लगोलग विधानसभा अध्यक्षांना शरद पवार गटाकडून पत्रे रवाना झाली. पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील हेच अजित पवार गटात सामील झाल्याने त्यांच्या जागी नव्या प्रतोदाचे नाव विधानसभाध्यक्षांच्या कार्यालयात रीतसर पाठवण्यात आले. शपथ घेणाऱ्या नऊजणांविरुद्ध अपात्रता याचिकाही ताबडतोब दाखल झाली. त्यामुळे पवार गटाने वेळीच चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या समोर ढकलला आहे. मात्र, शिवसेना प्रकरणात जे जे घडले, त्याचीच पुनरावृत्ती आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही घडत जाईल असे दिसते. बंडखोरांच्या अपात्रतेची लढाई विधानसभा अध्यक्षांपुढे आणि पक्षावर हक्क कोणाचा याची लढाई आता निवडणूक आयोगापुढे लढावी लागेल. त्यांचे निवाडे विपरीत आले तर न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल. न्यायालयाची पायरी चढण्यापेक्षा पुढच्या निवडणुकीत धडा शिकवू असा इशारा देत स्वतः शरद पवार मैदानात उतरले असल्याने आमदारांत चलबिचल सुरू झाली आहे. दोघे तिघे आमदार परतलेही आहेत, परंतु एकीकडे सत्तेचा मोह आणि दुसरीकडे सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय अशा केंद्रीय यंत्रणांची टांगती तलवार कायमची हटेल हा दिलासा, यापुढे पक्षनिष्ठा, शरद पवारांवरील श्रद्धा वगैरे सर्व बासनात गुंडाळायला शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुसंख्य मंडळी तयार झाली हे आम्ही सोमवारच्या अग्रलेखात म्हटलेच आहे. अवघी हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घालवलेली मंडळीही भाजपच्या आसऱ्याला गेली आहेत ती काही उगीच नव्हे. स्वतः अजित पवार यांच्याविरुद्ध केंद्रीय यंत्रणांनी कारवाईचे पाश आवळत आणले होते. छगन भुजबळ तर तुरुंगाची हवा खाऊनच आलेले आहेत. प्रफुल्ल पटेलांच्या इमारतीचे चार मजले ईडीने जप्त केलेले आहेत. तटकरे, मुश्रीफ वगैरे सगळ्यांनाच केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईचा ससेमिरा मागे लावल्याने भाजपला साथ देऊन स्वतःची सुटका करून घेण्याची पळवाट त्यांना हवीहवीशी वाटली तर त्यात नवल ते काय? आता प्रश्न आहे तो शरद पवार आपण स्थापन केलेला पक्ष स्वतःपाशी ठेवण्यात आणि दगा देणाऱ्यांना धडा शिकवण्यात कसे यशस्वी ठरतात हा. आपल्या विचारांशी द्रोह करणाऱ्यांनी आपले छायाचित्र वापरू नये अशी तंबी शरद पवारांनी दिलीच आहे. शिंदे गटाने बाळासाहेबांवर दावा केला, तसाच शरद पवारांचे नाव घेत आम्हीच मूळ पक्ष असे अजितदादा गट म्हणत असला, तरी पक्षाची घटना काय सांगते, त्यातील राष्ट्रीय अध्यक्षांचे अधिकार काय आहेत, कार्याध्यक्षांचे अधिकार काय आहेत वगैरे सगळ्या बाबींचा कीस यापुढील संघर्षात पडेल. परंतु शरद पवारांनी यापेक्षा आगामी निवडणुकीचेच रणमैदान पसंत केलेले दिसते. ‘लोक माझे सांगाती’ हे त्यांचे म्हणणे शब्दशः खरे आहे हे आगामी निवडणुकीत दिसल्यावाचून राहणार नाही असा जबरदस्त आत्मविश्वास त्यांना आहे. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांत उभी फूट पाडल्याने भाजपाचे संख्याबळ भले वाढले असेल, परंतु त्या पक्षाची जनमानसातील प्रतिमा रसातळाला गेली आहे. ‘पार्टी विथ द डिफरन्स’ उरली आहे कुठे? अत्यंत मतलबी, किळसवाण्या राजकारणाचा पायंडा राज्याराज्यांतून पाडला जातो आहे. जे महाराष्ट्रात घडले, तेच उद्या कर्नाटकात आणि बिहारमध्येही घडेल असे सूतोवाच आता होऊ लागले आहे. या स्वार्थी, घाऊक पक्षांतरांनी भारतीय लोकशाहीलाच डांबर फासले आहे.