>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून स्पष्ट; आणखी कोणाचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही होणार कडक कारवाई
पेडणे अबकारी कार्यालयातील घोटाळ्याप्रकरणी तीन कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत. या घोटाळ्यात आणखी कोणाचा सहभाग आढळला, तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात येईल. तीन निलंबित कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी सुरू असून, गरज भासल्यास या घोटाळ्याचा तपास दक्षता खाते किंवा भ्रष्टाचारविरोधी विभागामार्फत (एसीबी) केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले.
मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मोपा पोलीस स्थानक इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर ते स्थानिक पत्रकारांशी बोलत होते.
मार्च 2018 ते मार्च 2022 या काळात पेडणे अबकारी कार्यालयात घोटाळा झाला होता. पेडणेतील मद्य व्यावसायिकांना मद्य विक्री परवान्याची थकित रक्कम भरण्याची नोटीस पाठविल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. पेडणे कार्यालयातील कारकून हरिश नाईक याने मद्य व्यावसायिकांच्या अबकारी परवान्यांच्या नूतनीकरणात त्यांच्याकडून रोख रक्कम स्वीकारली; मात्र ती रक्कम बँक खात्यात जमा केलीच नाही. बँकेत
पैसे भरल्याची पावती दाखवून बनावट अबकारी नूतनीकरण परवाने व्यावसायिकांना वितरित करून कोट्यवधींचा घोटाळा केला होता. सदर मद्य व्यावसायिकांना निरीक्षकांच्या सहीचे चलन देण्यात आले होते.
या घोटाळ्यातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यात कारकून हरिश नाईक, डिसेंबर 2017 ते जानेवारी 2022 या काळात पेडणे अबकारी कार्यालयात निरीक्षकपदी असलेले दुर्गेश नाईक (सध्या तिसवाडी अबकारी निरीक्षक) यांना आणि सध्या पेडणे कार्यालयातच अबकारी निरीक्षक-2 पदावर कार्यरत असलेल्या विभूती शेट्ये यांना निलंबित करण्यात आले; मात्र आजपर्यंत सदर निलंबित कर्मचाऱ्यांविरुद्ध आणि संशयितांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, तो अद्याप का नोंदवलेला नाही, असा सवाल पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना काल केला. या प्रश्नावर थेट उत्तर न देता मुख्यमंत्र्यांनी या घोटाळ्यात जे जे सामील असतील, त्यांची गरज भासल्यास दक्षता खात्यामार्फत, एसीबी आणि इतर विभागांची मदत घेऊन चौकशी आणि नंतर कारवाई केली जाईल, असे सांगितले.
दरम्यान, पेडणे अबकारी खात्याचे अधिकारी व अबकारी आयुक्तांविरुद्ध पेडणे पोलिसात संजय बर्डे यांनी तक्रार यापूर्वीच दाखल केली आहे. मात्र आजपर्यंत गुन्हा नोंद झालेला नाही. मद्य विक्री परवान्यांच्या नूतनीकरणात घोटाळा करून सदर कर्मचाऱ्यांनी अबकारी खात्याला कोट्यवधींचा चुना लावला आहे.