राज्यात बरसल्या पावसाच्या जोरदार सरी

0
10

>> आज, उद्याही जोरदार पावसाची शक्यता; पावसाच्या तुटीचे प्रमाण 10.7 टक्क्यांवर

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल दिवसभरात राज्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्याशिवाय रात्री देखील पावसाचा जोर कायम राहिला. पणजी, मडगाव, म्हापसा यासह राज्याच्या सर्वच भागांत पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने 5 आणि 6 जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून, ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच 7 व 8 जुलैसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

जोरदार पावसामुळे राज्यात मोसमी पावसाच्या तुटीचे प्रमाण आता 10.7 टक्क्यावर आले आहे. राज्यभरात मागील दहा-बारा दिवसापासून चांगल्या पावसाची नोंद होत आहे. राज्यात चोवीस तासांत 1.86 इंच पावसाची नोंद झाली, तर राज्यात आत्तापर्यंत एकूण 37.36 इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर बरेच दिवस मोसमी पाऊस मंदावला होता. त्यामुळे पावसाच्या तुटीचे प्रमाण 70 टक्क्यांपर्यंत गेले होते. राज्यात गेल्या 22 जूनपासून मोसमी पावसाने पुन्हा जोर धरला. त्यानंतर 27 जूनपासून पावसाची संततधार सुरू आहे.

राज्यात चोवीस तासांत दाबोळी येथे सर्वाधिक 3.37 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा 1.25 इंच, पेडणे 0.77 इंच, फोंडा 1.57 इंच, पणजी 2.07 इंच, जुने गोवे 1.29 इंच, साखळी 0.40 इंच, काणकोण 2.18 इंच, दाबोळी 3.37 इंच, मडगाव 2.68 इंच, मुरगाव 2.93 इंच, केपे 2 इंच, सांगे 1.33 इंच पावसाची नोंद झाली.

राज्यात मागील चोवीस तासांत झाडांच्या पडझडीच्या 31 घटनांची नोंद झाली. मेरशी येथे घरावर माड मोडून पडल्याने पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झाले. शिवोली येथील राष्ट्रोळी मंदिराजवळील एका घरावर झाड मोडून पडल्याने 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. पंट्टेमळ कुडचडे येथे घरावर पोफळीचे झाड मोडून पडल्याने 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. कुडचडे येथे खोलीवर झाड पडल्याने 50 हजार रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय विविध भागात रस्त्यावर झाडे मोडून पडण्याच्या घटनांची नोंद झाली.

429 घटनांत , 42 लाखांचे नुकसान
राज्यात गेल्या 19 जून ते 3 जुलै या पंधरा दिवसाच्या काळात झाडांच्या पडझडीच्या एकूण 429 घटनांची नोंद झाली. त्यात 42 लाख 36 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले.