दोन्ही गटांच्या आज बैठका; कोणत्या बैठकीला किती आमदार हजेरी लावणार?
अजित पवारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय कलह वाढला असून, बुधवार दि. 5 जुलै रोजी दोन्ही गटांकडून दोन स्वतंत्र बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला हजर राहण्यासाठी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष व अन्य नेत्यांना दोन्ही गटांकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. एक पक्ष आणि दोन व्हीप यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व नेते संभ्रमात पडले आहेत.
या बैठकीमुळे बुधवारी महाराष्ट्रातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी वांद्रे येथे बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे, तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार आणि नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दोन व्हीप जारी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मात्र सत्वपरीक्षा सुरू झाली आहे. शरद पवार साहेब की अजितदादा पवार कुणाच्या पाठिशी उभे राहायचे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता अजित पवार यांनी एमईटी वांद्रे येथे पक्षाची बैठक बोलवली आहे, तर दुपारी 1 वाजता शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलवली आहे. आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि इतर नेते कोणत्या बैठकीला हजर राहणार याकडे लक्ष लागले आहे.