6 नद्यांमध्ये जलक्रीडांना परवानगी

0
9

>> बंदर कप्तान खात्याने मागवल्या सूचना व हरकती

राज्यात मान्सून पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने जून ते 15 सप्टेंबर या दरम्यान झुआरी, साळ, शापोरा, नेरुल व सिकेरी या नद्या तसेच मांडवी नदी (दिवाडी बेटाच्या दिशेने) या नद्यांबरोबरच दोनापावला खाडी या ठिकाणी जलक्रीडांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

यासंबंधी जनतेने त्यांच्या सूचना व आक्षेप असल्यास त्या पाच दिवसांच्या आत बंदर कप्तान खात्याकडे पाठविव्यात, असे कळविले आहे. यासंबंधीची अधिसूचना सरकारी राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या पाच दिवसानंतर सदर प्रस्ताव विचारात घेतला जाईल. सदर अधिसूचना 28 जून रोजी सरकारी राजपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे.
या काळात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या दरम्यान ह्या जलक्रीडांना परवानगी असेल. मात्र, ज्या दिवशी हवामान खराब असेल त्या दिवशी जलक्रीडांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे बंदर कप्तान खात्याने कळविले आहे.

खराब हवामानामुळे किनारपट्टीवरील जलक्रीडा पावसाळ्यात बंद ठेवण्यात येत असल्याने ह्या जलक्रीडा पावसाळ्याच्या काळात राज्यातील नद्यांमध्ये सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.