पावसाळी आजार

0
26
  • डॉ. मनाली महेश पवार

सहाही ऋतूंमध्ये वर्षा ऋतूत आरोग्य सांभाळणे सर्वात अवघड असते. या काळात शरीरशक्ती सर्वात कमी होत असते. शरीरातील त्रिदोष व अग्नी अशा स्थितीत असतात की खाण्या-पिण्यात, वागण्यात सर्वाधिक काळजी घेणे अनिवार्य ठरते; अन्यथा या ऋतूतील चुकीचा आहार-विहार हळूहळू अनेक कष्टसाध्य रोगांना आमंत्रण देऊ शकतो.

उन्हाळ्याच्या तापाने तप्त झालेल्या धरणीला शांत करण्यासाठी पाऊस कधी एकदाचा येतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. पाण्याच्या टंचाईची समस्या निर्माण झाली होती. शेतीची कामे खोळंबली होती. गेल्या आठवड्यापासून मोसमी पावसाने जोर धरला व धरणीमाता शांत झाली. ही पावसाची ओढ पुरी करत येणारी पावसाची पहिली सर बालगोपालांपासून थोरामोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच सुखावून गेली. सर्व आसमंत प्रसन्न व ताजातवाना झाला. पण झाडांच्या पडझडीच्या घटना वाढल्या, वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले. त्यामुळे अचानक निर्माण होणारी शारीरिक, मानसिक हानी तर वाढलीच, त्याचबरोबर ऋतुबदलामुळे उत्पन्न होणाऱ्या आजारांनाही विसरता कामा नये. त्यासाठी आहार, विहार व औषध या त्रिसूत्रीमध्ये योग्य बदल व योग्य आचरण करायला हवे.

सहाही ऋतूंमध्ये वर्षा ऋतूत आरोग्य सांभाळणे सर्वात अवघड असते. या काळात शरीरशक्ती सर्वात कमी होत असते. शरीरातील त्रिदोष व अग्नी अशा स्थितीत असतात की खाण्या-पिण्यात, वागण्यात सर्वाधिक काळजी घेणे अनिवार्य असते; अन्यथा या ऋतूतील चुकीचा आहार-विहार हळूहळू अनेक कष्टसाध्य रोगांना आमंत्रण देऊ शकतो. सर्दी, खोकला, दमा यांसारखे कफज रोग; ताप, ॲलर्जी, अपचन यांसारखे पित्तज रोग; संधिवात, दुखणे-खुपणे यांसारखे वातज रोग; त्याचबरोबर अतिसार, कावीळसारखे अग्निदोषाने उत्पन्न होणारे रोग व अशुद्ध पाणी, जंतूमुळे पसरणारे स्वायनफ्लू, डेंग्यू इत्यादी सगळ्या प्रकारचे रोग पावसाळ्यात डोके वर काढतात. म्हणूनच ‘प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्यूअर’ या म्हणीनुसार सर्वांनी ऋतुबदलामध्ये आहार, आचार, विचार बदलासाठी सज्ज व्हायचे आहे. मुलं, म्हातारी माणसे यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने यांना ऋतुबदल लगेच बाधतो व ही पहिल्या पावसातच आजारी पडतात म्हणून विशेष काळजी लहान-मोठ्यांची घ्यावी.

पावसाळ्यातील विकार व त्यांचे घरच्या घरी उपचार

  • पावसाळ्यात वात-पित्त-कफाचे असंतुलन होत असल्याने प्रामुख्याने पचनाचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. सामान्यतः भूक न लागणे, पोट जड होऊन फुगल्यासारखे वाटणे, गॅसेस होणे, अपचन या सर्व तक्रारींवर पाव चमचा हिंग्वाष्टक चूर्ण जेवणाच्या सुरुवातीला घासभर भात आणि तुपाबरोबर मिसळून खावे व नंतर जेवण जेवावे. पावसाळ्यात प्रत्येकाच्या घरात हिंग्वाष्टक चूर्ण उपलब्ध असावे. हे चूर्ण सगळ्या आयुर्वेदिक फार्मसीमध्ये मिळते.
  • पचनशक्ती मंदावलेली असल्याने कमी खावे.
  • दिवसातून दोन वेळा व भूक भागेल तेवढेच जेवावे.
  • ज्यांना फारशी भूक लागत नाही त्यांनी एकभुक्त राहावे. दुपारी जेवण जेवून रात्री काहीही खाऊ नये किंवा रात्री फक्त मुगाचे कढण, पालकाचे सूप, रव्याची पातळ लापशी असा द्रवाहार करावा. इतरांनी कमीत कमी आठवड्यातून एकदा रात्री काहीही न खाता पचनसंस्थेला विश्रांती द्यावी.
  • सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्यावे.
  • पोटाचे रोग- उदा. मलावरोध, गॅसेस, ॲसिडिटी, मूळव्याध यांपैकी काहीही त्रास होत असल्यास जेवणानंतर अविपत्तिकर, इसबगोल इत्यादी द्रव्यांपासून तयार केलेले चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्यावे.
  • पचायला जड व तेलकट पदार्थ खाऊ नयेत. दही, चीज, पनीर किंवा जड मिठाई खाऊ नये.
  • मंद झालेल्या अग्नीला प्रज्वलित करण्यासाठी भाजी, आमटी बनवताना जिरे, हिंग, धणे, दालचिनी, तमालपत्र, आले, हळद, आमसूल अशा मसाल्याचा वापर करावा.
  • पुदिना, ओले खोबरे, लिंबू, आले यांपासून तयार केलेली चटणी खावी.
  • शक्य तेथे सुंठ किंवा आले वापरावे. भाज्या, आमटी किंवा सूप बनवताना तिखटापेक्षा आले वापरावे. दुधामध्ये सुंठ टाकावी व चहात आले.
  • सर्दी, पडसे, घसा दुखणे-खवखवणे, तापासारखे वाटणे या तक्रारी पावसाळा सुरू होताच सगळ्यांमध्ये सर्रास जाणवतात. त्यामुळे सीतोफलादी चूर्णासारखे औषधही पावसाळ्यात घरी हवेच. अर्धा चमचा सीतोफलादी चूर्ण गरम पाण्याबरोबर सकाळ-संध्याकाळ घ्यावे. लहान मुलांना देताना पाव चमचा द्यावा. हे चूर्ण दुधातून, मधाबरोबर किंवा तुपासोबतही सेवन करता येते.
  • खोकला, दमा असणाऱ्यांनी, विशेषतः छातीत कफ साचून राहिला असल्यास वासावलेह सकाळ-संध्याकाळ घ्यावा.
  • दम्याचा त्रास असणाऱ्यांनी बृहत्‌‍ चिंतामणीसारखी औषधे वैद्याच्या सल्ल्यानेच घ्यावी. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी त्रास होण्याची वाट न पाहता पावसाळ्याच्या चाहुलीबरोबरच योग्य ते उपचार सुरू करावे व ऋतू संपेपर्यंत उपचार सुरू ठेवावेत.
  • बाहेर जाताना छत्री किंवा रेनकोट अवश्य जवळ बाळगावा.
  • बाहेरून आल्यावर ओले शरीर पुसून कपडे लगेच बदलावेत. केस धुतल्यानंतर केस व्यवस्थित वाळतील याकडे लक्ष द्यावे.
  • पावसाबरोबर थंड वारा वाहत असल्याने कानाचे, कपाळाचे रक्षण व्हावे म्हणून डोक्यावर स्कार्फ किंवा मफलर बांधावा.
  • घरात किंवा ऑफिसमध्ये फरशीवर पादत्राणे न घालता चालू नये.
  • गरम पाण्यानेच स्नान करावे व साबणाऐवजी उटण्याचा वापर करावा.
  • जुलाब होत असल्यास चमचाभर आल्या-लिंबाचा रस घ्यावा व दिवसभर फक्त ताक-भात किंवा मुगाचे कढण प्यावे.
  • उलट्या होत असल्यास साळीच्या लाह्या कोरड्याच खाव्यात. डाळिंबाचा रस खडीसाखर टाकून थोडा-थोडा पीत राहावा व लंघन करावे.
  • दुपारी जेवणानंतर ताज्या ताकात आले, ओव्याची पूड, चिमूटभर हिंग व काळे मीठ टाकून घ्यावे.
  • जेवणानंतर मुखवास म्हणून ओवा, धण्याची डाळ, बडीशेप व सैंधव यांचे भाजून केलेले मिश्रण वापरावे.
  • आमवात, संधिवात असणाऱ्यांनी पावसाळा सुरू होताच रोज सकाळी सुंठ, गूळ व तूप यांपासून तयार केलेली सुपारीच्या आकाराची गोळी घ्यावी. सांध्यांना नियमित तेल लावून शेकावे. शरीरशक्तीनुसार आयुर्वेदिक पद्धतीने बाष्पस्वेद घ्यावे.
  • काहीही त्रास होत नसला तरी वात वाढू नये म्हणून रोज रात्री हलक्या हाताने सर्वांगाला तेल लावावे.
  • शक्य असेल त्यांनी वातशामक तेलाची बस्ती घ्यावी.
  • अधूनमधून आलेपाकाचा छोटासा तुकडा चघळावा.
  • या काळात विविध संसर्गजन्य रोग होण्याचा संभव वाढत असल्याने बाहेरील तसेच उघड्यावरच्या खाद्य-पेयांचा वापर टाळावा.
  • पावसाळ्यात एकंदरच हवा आणि पाण्यामधून जंतुसंसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने प्यायचे पाणी चांगले गाळून आणि उकळूनच प्यावे, म्हणजे पाण्याचा काढा करून घ्यावा. एकंदरीत पाणी खूप उकळून प्यावे व शक्यतो गरम असतानाच प्यावे.
  • याच कारणास्तव पालेभाज्या वापरण्यापूर्वी खूप पाण्याने काळजीपूर्वक धुवून घ्याव्यात. भाज्या शिजवूनच खाव्यात; कच्च्या, सॅलड किंवा रस काढून वापरू नयेत.
  • सकाळ-संध्याकाळ हवा शुद्ध करण्यासाठी धूपन करावे. यासाठी वेखंड, सुंठ, ओवा, कडुनिंबाची सुकवलेली पाने, जटामांसी, ऊद यांचे मिश्रण वापरावे.
  • लहान मुलांना आंघोळीनंतर कपडे घालण्यापूर्वी व्यवस्थित धूप द्यावा. धुपासाठी ओवा, देवदार, गुग्गुळ, वावडिंग यांचे चूर्ण वापरावे. याने पावसाळ्यात होणारे सर्दी, खोकला, ताप वगैरे तक्रारी निश्चित टाळता येतात.
  • पावसामुळे बाहेर फिरायला जायला मिळत नाही, मैदानी खेळ खेळता येत नाहीत म्हणून घरच्या घरी साधी योगासने किंवा सूर्यनमस्कार घालावेत.
  • प्राणायामसारखा योग करावा.
  • रात्री जागरण करू नये, दिवसा झोपू नये. लवकर झोपावे व लवकर उठावे.
    आहार-विहाराची पथ्ये पाळल्यास औषधांची गरज भासत नाही. म्हणूनच सांगते, आला पावसाळा तब्येत सांभाळा!