>> लुटलेल्या 4 कोटींच्या सोन्यापैकी 1 कोटीचे सोने हस्तगत; कोकण रेल्वे पोलिसांची मुंबई व सांगलीत मोठी कारवाई
काणकोण येथे रेल्वे प्रवासात एका सोनाराकडील 4 कोटींचे सोने लुटून फरार झालेल्या चौघा संशयितांना अटक करण्यात मडगाव येथील कोकण रेल्वे पोलिसांना काल यश आले. 4 कोटींपैकी 1 कोटी रुपयांचे सोने व 50 हजारांची रोख रक्कम या चौघांकडून हस्तगत करण्यात पोलिसांनी यश मिळविले. संशयितांमध्ये 1 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे. या प्रकरणी संदीप वसंत भोसले (40, रा. कवठेमहाकाळ, सांगली), अक्षय रामा चिनवाल (28, रा. खानापूर, बेळगाव), अर्चना उर्फ अर्ची मोरे (32, रा. मुंबई) व धनपत हंसराज बैद (44, रा. परेल ईस्ट मुंबई) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. या चोरीत आंतरराज्य टोळीचा हात असल्याचे त्यात उघड झाले आहे. कोकण रेल्वेचे पोलीस अधीक्षक गुरुदास कदम, पोलीस निरीक्षक सुनील गुडलर व अन्य पोलिसांनी ही कारवाई केली.
सविस्तर माहितीनुसार, मुंबई येथील मधू ऑर्नामेंट सराफी दुकानाचे कर्मचारी अशोक आर. (55) हे 7 किलो वजनाचे आणि 4 कोटी रुपये किमतीचे सोने घेऊन केरळला निघाले होते. पनवेल ते तिरुअनंतपुरम (गांधीधाम) रेल्वेने ते प्रवास करत होते. ही रेल्वे 2 मे 2023 रोजी काणकोण रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबली असता या चौघा चोरट्यांनी अशोक आर. यांच्याकडून 7 किलो वजनाचे आणि 4 कोटी रुपये किमतीचे सोने लुटून पळ काढला होता. रेल्वेतून बाहेर पडत त्यांनी कारच्या मदतीने पुढील प्रवास केला होता. त्यानंतर अशोक आर. यांनी कोकण रेल्वे स्थानकात या प्रकरणी तक्रार नोंदवली होती.
या प्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांकडून तपास सुरुच होता. मात्र दोन महिने या चोरट्याचा ठावठिकाणा लागत नव्हता; मात्र पोलिसांकडून प्रयत्न सुरूच होते. याच तपासासाठी कोकण रेल्वे पोलीस अधीक्षक गुरुदास कदम पोलीस पथकासह मुंबईला गेले होते त्यावेळी रविवारी पहाटे 4 वाजता मुंबई पोलिसांच्या मदतीने अर्चना मोरे आणि धनपत बैद यांना ताब्यात घेतले. तसेच पोलीस कुलदीप गावकर यांनी सांगली येथे जात संदीप भोसले व अक्षय चिनवाल यांना तेथील पोलिसांच्या मदतीने पकडले. दोन महिन्यांनंतर हे सर्व पोलिसांच्या तावडीत सापडले. या तपास मोहिमेत पोलीस समीर शेख आणि अश्विन नाईक यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांनी या चोरट्यांच्या शोधासाठी सर्व मुंबई पालथी घातली आणि भर पावसात पहाटे त्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत केला. पोलिसांनी दागिने वितळवून तयार केलेले 1.900 ग्रॅम सोने आणि रोख 50 हजार रुपये हस्तगत केले. तसेच या गुन्ह्यांत वापरलेल्या दोन कार आणि दोन महागडे मोबाईल पोलिसांनी जप्त केले.
अर्चना मोरे मुख्य सूत्रधार
या सोने लुटीच्या प्रकरणात अटक केलेली 32 वर्षीय महिलाच मुख्य सूत्रधार असून, तिनेच कोणत्या रेल्वेतून कोणती व्यक्ती किती किलोचे सोने घेऊन जात आहे याची माहिती आपल्या साथीदारांना दिली होती. त्या माहितीच्या आधारावरच तिच्या अन्य 3 साथीदारांनी लुटीचा कट रचला होता. त्यानंतर संदीप भोसले, अक्षय चिनवाल आणि धनपत बैद या तिघांनी लुटमारीची योजना तयार केली होती.
7 दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई व सांगली येथून काल सकाळी या चोरट्यांना गोव्यात आणून नंतर त्यांना रितसर अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना काणकोण न्यायालयात हजर केले असता, त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.