बांबोळी येथे पुढील 16 ते 18 महिन्यांत कर्करोग इस्पितळ उभे राहणार असून, या इस्पितळात कर्करोगाच्या रुग्णांसाठी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू करण्यासाठी लवकरच केंद्र सरकार, गोवा सरकार व मुंबईस्थित टाटा मेमोरियल इस्पितळ यांच्यात करार होणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी काल सांगितले.
यासंबंधी अधिक माहिती देताना राणे हे म्हणाले की, टाटा मेमोरियल इस्पितळातील डॉक्टर आठवड्यातून एकदा या इस्पितळाला भेट देऊन ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची तपासणी करतील. या सामंजस्य करारावर केंद्र सरकार, गोवा सरकार व टाटा मेमोरियल इस्पितळ सह्या करणार असून, टाटा मेमोरियलचे डॉ. श्रीखंडे यांचे या करारासाठी खास सहकार्य लाभले असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.