राष्ट्रवादीत हकालपट्टी अन्‌‍ नियुक्त्यांची मालिका

0
4

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवारांच्या गटाकडून काल दिवसभरात वेगवेगळ्या पदांवर नव्या नियुक्त्या आणि काहींची हकालपट्टीही करण्यात आली. शरद पवार यांनी अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल व सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर अजित पवार गटाने जयंत पाटलांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवल्याचे जाहीर केले. याशिवाय जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले. त्याआधी रविवारी शरद पवारांनी विरोधी पक्षनेते आणि प्रतोदपदी जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केली होती. तसेच अजित पवारांसह 9 जणांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली. आव्हाड यांनी रविवारी रात्री उशिरा याबाबतचे पत्र राहुल नार्वेकर यांच्या घरी दिले
होते.

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी काल घेतला. खासदार सुप्रिया सुळे यांनी या दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी करत शरद पवारांना एक पत्र लिहिले होते. तटकरे आणि पटेल या दोन खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा, अशी मागणी सुळे यांनी केली होती.

दुसऱ्या बाजूला जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात आल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच सुनील तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या 21 जूनच्या कार्यक्रमात मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. त्यानंतर पक्षाच्या कार्यकारी समितीचा उपाध्यक्ष नियुक्त झालो होतो, तेव्हा मी काही नियुक्तया जाहीर केल्या होत्या, त्यात जयंत पाटील यांची हंगामी नियुक्ती केली होती. या पार्श्वभूमीवर आम्ही जयंत पाटील यांना पदावरून मुक्त केले असून, सुनील तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले आहे, असे पटेल यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांना अपात्र करण्यासंदर्भात आम्ही विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे, अशी माहिती अजित पवार यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. रविवारी शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांना विरोधी पक्षनेते आणि प्रतोद म्हणून नियुक्त केले होते, तर जयंत पाटील हे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्षविरोधी कारवाई केली म्हणून अजित पवार यांनी त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे.