>> साळावली, म्हैसाळ, चापोली, गावणे, आमठाणे धरणाच्या पाणीपातळीत वाढ; अंजुणे धरणात अजूनही कमीच पाणीसाठा
राज्यात मागील काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर पडल्याने साळावली, अंजुणे यासारख्या मुख्य धरणांतील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाली होती. आता, राज्यात पावसाने गती घेतल्याने काही धरणांतील जलसाठ्यामध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सत्तरी तालुक्यातील अंजुणे येथील धरणातील पाणीपातळीत फारशी वाढ झालेली नाही. या धरणातील पाण्याची पातळी 3 टक्क्यांपर्यंत आली होती, ती आता 6 टक्के एवढी वाढली आहे.
दक्षिण गोव्याला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या साळावली धरणातील पाण्याची पातळी 21 टक्क्यांपर्यत खाली आली होती. जोरदार पावसामुळे या धरणातील पाण्याची पातळी 31 टक्क्यांवर पोहोचली आहे. फोंडा तालुक्यातील पंचवाडी येथील म्हैसाळ धरण पूर्णपणे आटले होते. या धरणामध्ये 25 टक्के पाणीसाठा झाला आहे. काणकोण येथील चापोली, गावणे आणि डिचोली तालुक्यातील आमठाणे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. दरवर्षी पेक्षा वाळपई येथे पावसाचे प्रमाण आत्तापर्यंत कमीच राहिले आहे. परिणामी अंजुणे धरणातील पाण्याच्या साठ्यात अजूनपर्यंत मोठी वाढ झालेली नाही.
राज्यात पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी नागरिकांना काही प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. नागरिकांनी या पाण्याचा पिण्यासाठी वापर करताना योग्य काळजी घेण्याची गरज आहे, असे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल सांगितले.
राज्यात दररोज सातशे ते साडे सातशे एमएलडी पाण्याची गरज भासते. आगामी दोन-तीन वर्षांत पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. त्यामुळे आणखीन 300 एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी विविध भागात बंधारे बांधून पाणी अडविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. तसेच नवीन 3 बंधारे बांधण्याची योजना तयार करण्यात आली आहे. तातोडी आणि काजूमळ येथे लघू धरण बांधण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. साळ येथे पाण्याचा साठा वाढविण्यासाठी दोन प्रकल्पांची कामे सुरू केली आहेत, असेही शिरोडकर यांनी सांगितले.
अतिरिक्त 300 एमएलडी पाण्याचे नियोजन सुरू
राज्यात दरवर्षी पाण्याची मागणी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त 300 एमएलडी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जलस्रोत खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.