केंद्राच्या 943 कोटी रुपयांच्या एकूण 70 योजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य सरकारने तयार केला असून, त्यापैकी 42 योजनांचे डीपीआर यापूर्वीच केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
या योजनांच्या प्रगतीसंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काल एक आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्य सरकारच्या विविध खात्यांचे सचिव व खातेप्रमुख हजर होते. या प्रकल्पांना निधी मिळवण्यासाठी व योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
या योजनांमध्ये पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आदींचा समावेश आहे. गोवा राज्यासाठी केंद्राकडून भरीव निधी उपलब्ध होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
या योजनांचा आढावा घेण्यासाठी दर महिन्याच्या प्रारंभी आढावा बैठक होईल. गोवा हे छोटे राज्य असल्याने काही वेळा मोठ्या योजनांच्या अंमलबजावणीत काही अडथळे येतात, असेही ते म्हणाले.