भारतीय रुपयाची घोडदौड

0
11
  • शशांक मो. गुळगुळे

ज्या देशांनी आपल्या देशाबरोबर रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखविली आहे, त्या देशांबरोबर आपली आयात-निर्यात वाढेल. भविष्यात इतर देशसुद्धा हळूहळू भारताबरोबर रुपयांत व्यवहार करण्यास तयार होतील. परिणामी भविष्यात भारतीय रुपया हे एक सक्षम आंतरराष्ट्रीय चलन होईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने जुलै 2022 मध्ये आपले आयात-निर्यात व्यवहार भारतीय चलनात म्हणजे रुपयात करण्याचे धोरण जाहीर केले. डिसेंबर 2022 मध्ये रशियाबरोबर खनिज तेल आयातीचा मोठा आंतरराष्ट्रीय व्यवहार झाला. हा व्यवहार यशस्वी झाल्यामुळे सुमारे 18 देश आपल्याबरोबर अमेरिकी डॉलरऐवजी भारतीय रुपया हे चलन वापरून आयात-निर्यात करण्यास तयार आहेत. हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे असून आपल्या अर्थव्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. सध्या जगातील वेगवेगळ्या देशांतील बहुतांश आयात-निर्यात व्यवहार अमेरिकी ‘डॉलर’, ‘ग्रेट ब्रिटन पाऊंड’ (जीबीपी) व ‘यूरो’ या चलनात होतात. काही जपानच्या ‘येन’ या चलनातही होतात. त्यामुळे या देशांची चलने इतर देशांच्या चलनांच्या तुलनेत मजबूत आहेत.
रशिया, इंग्लंड, जर्मनी, न्यूझिलंड, मलेशिया, ओमान, सिंगापूर, श्रीलंका, इस्राईल, मॉरिशस आणि अन्य आशिया आणि आफ्रिका खंडांतील देशांनी आपल्या देशाबरोबर ‘रुपया’ या चलनात व्यवहार करण्यास संमती दर्शवली आहे. अर्थातच हे आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शुभसूचक आहे. आपली निर्यात वाढत असली तरी डॉलरच्या तुलनेत रुपया पडत असल्याने आपल्याला अपेक्षित आर्थिक लाभ होत नसे, तो प्रश्नदेखील काही अंशी सुटेल. त्यामुळे रुपयामधील आयात-निर्यात लाभदायक ठरेल. भारतात वाढीव गुंतवणूक, रोजगार निर्मिती, महागाईवर नियंत्रण, रुपयाचे सबलीकरण असे अनेक फायदे आपल्या देशाला भविष्यकाळात होतील.

भारतीय अर्थव्यवस्था चांगली भक्कम व नियंत्रित आहे यावर सर्वांचा विश्वास आहे. भारताचा आर्थिक भविष्यकाळ हादेखील उज्ज्वल असेल याची खात्री बऱ्याच देशांना पटली आहे. जागतिक स्तरावरील युरोप व अमेरिका यांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाचा त्यांच्या अर्थव्यवस्थांवर बराच परिणाम झाला. तितका तो आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला नाही. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्या आर्थिक वृद्धीचा दरही मंदावत आहे. याउलट आपल्या देशाची अर्थव्यवस्था 6.5 टक्के या दराने विकसित होणार असून, आज आपली अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमांकाची बनली आहे. कोणत्याही देशाला भारताला विसरून अथवा भारताला विरोध करून आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आयात-निर्यात व्यवहार रुपयात करण्याच्या निर्णयामुळे आपल्या अर्थव्यवस्थेचे अमेरिकी डॉलरवर अवलंबून असणे हळूहळू कमी होणार. त्यामुळे परिणामी आपल्या रुपयाची किंमत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत स्थिरावेल. कच्चे तेल रशियाकडून आयात केल्यामुळे आपली फार मोठी बचत होत आहे. याच्या परिणामी चलनवाढीला आळा बसू शकेल. ज्या देशांनी आपल्या देशाबरोबर रुपयामध्ये व्यवहार करण्याची तयारी दाखविली आहे, त्या देशांबरोबर आपली आयात-निर्यात वाढेल. भविष्यात इतर देशसुद्धा हळूहळू भारताबरोबर रुपयांत व्यवहार करण्यास तयार होतील. परिणामी भविष्यात भारतीय रुपया हे एक सक्षम आंतरराष्ट्रीय चलन होईल. भारतीय उद्योजकांना विकसित देशांमध्ये किंवा अन्य विकसित देशांनादेखील भारतात गुंतवणूक करणे सहजशक्य होईल. त्यामुळे भारतात रोजगार वाढू शकतील. भारतीय वस्तू व सेवांना निर्यात करण्यासाठी विकसनशील देशांची बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. यामुळे वित्तीय तूट कमी होऊन आंतरराष्ट्रीय व्यापाराचा समतोल राखणेदेखील सहजशक्य होईल. इतर देशांच्या तुलनेत भारतीय रुपया हा खूप मजबूत आहे आणि तो अजून मजबूत होऊ शकेल.

भविष्यात भारताबरोबर रुपयात व्यवहार करणाऱ्या देशांचा एक समूह निर्माण होऊ शकेल व तो समूह अन्य देशांच्या समूहांशी, उदाहरणार्थ ‘युरोपियन युनियन’, ‘ओपेक’, ‘ब्रिक्स’, ‘नाफ्ता’, ‘आसियान’ यांच्याशी स्पर्धा करू शकेल. ‘ब्रिक्स’ तसेच बहुतांश दक्षिण आशियातील देश याची वाट पाहात आहेत. याचा फायदा आपल्या देशातील विविध सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांना होऊ शकेल. या समूहाचे नेतृत्व भारत करेल आणि अमेरिका, चीन यांच्या बरोबरीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचा प्रभाव वाढेल. परिणामी आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने दर वाढेल. याचा परिणाम म्हणून येत्या पाच वर्षांनंतर भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ शकेल. अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, भारत व इंग्लंड या जगातील पहिल्या सहा अर्थव्यवस्था आहेत. या सहा अर्थव्यवस्थांत तीन देश- ते म्हणजे भारत, चीन व जपान हे देश- आशिया खंडातील आहेत. चीन व भारतासारख्या बलाढ्य अर्थव्यवस्थांमुळे आशिया खंडाचे महत्त्व वाढते आहे.

परदेशी बँकांना भारतीय बँकेत ‘वोस्ट्रो’ खाते उघडणे आवश्यक आहे, जेणेकरून रुपयामधील व्यवहार तसेच निवेश यावर नियंत्रण ठेवता येते. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या यंत्रणांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे नियम, नियंत्रण व इतर देशांच्या तुलनेत जास्त असलेला वृद्धीचा दर यावर समाधान व्यक्त केले आहे. आपल्या पंतप्रधानांची जागतिक पातळीवर चांगली प्रतिमा आहे. भारताची भूमिका, धोरणे व नेतृत्व याला आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रात मान्यता मिळालेली आहे. भारताचा पाया मजबूत असल्यामुळे येत्या काळात ‘इंडिया शायनिंग’च राहणार!