महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूकंप

0
9

>> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट

>> अजित पवारांनी घेतली 8 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ

शिवसेनेमध्ये झालेल्या राजकीय भूकंपानंतर आता एका वर्षाच्या आत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिमंडळात सहभागी होणार असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह आणखी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली असून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ अजित पवार यांनी घेतली आहे. काल रविवारी झालेल्या शपथविधीमध्ये अजित पवारांसोबत 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे. मात्र, या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा पाठिंबा नाही. महाराष्ट्राला आता देवेंद्र फडणवीस व अजित पवार असे दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.

शपथविधीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी झालो आहोत. तसेच आपल्याला पक्षाच्या सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. तसेच आगामी निवडणुका आपण शिवसेना-भाजप युतीसोबत राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच लढवणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

राष्ट्रवादीची 5 रोजी बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना मुंबईत बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचे सांगितले. 5 जुलै रोजी ही बैठक होणार असून राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार यांच्याच पाठिशी असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यात शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर कार्यकर्ते, नेत्यांच्या आग्रहानंतर पवारांनी राजीनामा मागे घेतला. पण त्यानंतर त्यांनी पक्षांतर्गत भाकरी फिरवत सुप्रिया सुळे व प्रफुल्ल पटेल यांची पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती केली होती. या माध्यमातून त्यांनी सुप्रिया यांची आपल्या उत्तराधिकारीपदीच निवड केली होती. या बदलांमध्ये अजित पवारांना कोणतीही नवी जबाबदारी मिळाली नाही. यामुळे ते पिछाडीवर पडले होते.
यातूनच त्यांनी थेट शरद पवार यांना आव्हान देत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच मी भाजपसोबत जाणार नाही, हे स्टँप पेपरवर लिहून देऊ का? असा ठाम दावा केला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी भाजपशी घरोबा केला आहे.
शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड केल्यामुळे अजित पवारांच्या राजकीय भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणी ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये जातील, असाही दावा केला जात होता.

हा ईडी गट ः पृथ्वीराज चव्हाण
आज राष्ट्रवादीचा जो गट फुटला आहे. त्याला मी ईडी गट म्हणेन. त्याच्यावर ईडीची कृपा झालेली आहे, यासाठी पक्षांतर केलेले आहे. राष्ट्रवादीचा गट फोडला आहे. आता त्यांना मंत्रीपदे ही बहाल करण्यात आली आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर ते बोलत होते. मात्र जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा निर्णय अजित पवार यांच्यामुळे घेतला असल्याचे म्हटले होते. आता त्याच अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या हाताखाली शिवसेनेचे आमदार काम करणार असल्याची टीका चव्हाण यांनी केली.


पाचव्यांदा उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी काल पुन्हा एकदा मोठा धक्का देताना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच अजित पवार पाचव्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री बनले आहे. राज्याच्या राजकारणात सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा त्यांचाच विक्रम त्यांनी मोडला आहे.
अजित पवार यांनी 11 नोव्हेंबर 2010 रोजी सर्वप्रथम उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. 1 वर्ष 319 दिवस या पदावर राहिल्यानंतर 25 सप्टेंबर 2012 रोजी त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते.

यानंतर तीनच महिन्यांत पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वात 7 डिसेंबर 2012 रोजी अजित पवार यांनी पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून सरकारचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत ते या पदावर कायम राहिले. एकाच पंचवार्षिकमध्ये दोन वेळा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांनी 23 नोव्हेंबर 2019 रोजी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी संपूर्ण देशभरात चांगलाच चर्चेत राहिला. सकाळीच घेतलेल्या या शपथेला पहाटेचा शपथविधी म्हणून संबोधले गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या नेतृत्वात तीन दिवसांसाठी अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. मात्र हा शपथविधीचा प्रयोग फसल्यानंतर अजित पवार पुन्हा महाविकास आघाडीसोबत आले आणि पुन्हा उपमुख्यमंत्रिपदाची 30 डिसेंबर 2019 रोजी चौथ्यांदा शपथ घेतली. महाविकास आघाडी सरकार कोसळेपर्यंत 2 वर्षे 181 दिवसांसाठी ते या पदावर कायम राहिले.
आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी काल रविवार 2 जुलै 2023 रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत ते पाचव्यांदा या पदावर विराजमान झाले आहेत. विशेष म्हणजे एकाच पंचवार्षिकमधील हे त्यांचे तिसरे उपमुख्यमंत्रिपद आहे.

फुटीर आमदार संपर्कात ः शरद पवार
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, अजित पवारांबरोबर गेलेल्या काही सहकाऱ्यांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. आमची वेगळी भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले असल्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाच्या धोरणाशी विसंगत पाऊले कोणी टाकली असतील तर त्याचा निर्णय पक्षाचे लोक बसून घेतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. काहींची पदाधिकारी यांची नेमणूक मी केलेली आहे. सरचिटणीस म्हणून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक मी केलेली आहे. ज्यांनी पक्षाच्या भल्यासाठी पाऊले टाकलेली नाहीत. त्यांच्यावरील पुढील कारवाई मला करावी लागेल, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

पुढे बोलताना पवार यांनी, बंडखोरीमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही. बंडखोरीबाबतचे अधिक स्पष्ट चित्र माझ्याइतकेच जनतेच्या समोर मांडण्याची आवश्यकता आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) जर त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली तर त्याबद्दल माझा विश्वास बसेल. त्यांनी तशी भूमिका मांडली नाही, तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. मी याबाबत न्यायालयात जाणार नाही तर जनतेत जाईन असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड
अजित पवारांनी बंड केल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नव्या नेत्यांकडे काही जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. अनिल पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतोदपद होते. अनिल पाटील हे अजित पवार यांच्यासोबत बंडात सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवले आहे.

विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज झालेल्या बंडामुळे शरद पवार यांच्यासोबत 15 आमदार असल्याची चर्चा आहे. तर, काँग्रेसकडे 45 आमदार आहेत. त्यामुळे विरोधी बाकांवर आता काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करण्याची करण्याची शक्यता आहे.

नांदा सौख्य भरे ः उद्धव ठाकरे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीवर आणि अजित पवार यांच्या सरकारमध्ये सामील होण्याच्या घटनेवर उद्धव ठाकरेंनी एका ओळीची प्रतिक्रिया देताना ‘नांदा सौख्य भरे’ असे म्हटले आहे.

अजित पवार यांचे स्वागत ः मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना, आज अजितदादा पवार आणि त्यांचे सहकारी आमदार यांनी आपल्या शिवसेना-भाजप युतीच्या डबल इंजिन सरकारला विकासासाठी साथ दिली आहे. अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. मी त्यांचे मनापासून स्वागत व अभिनंदन करतो. विकासाच्या राजकारणाला विकासाच्या माणसाने साथ दिली आहे अशी प्रतिक्रिया दिली. आता राज्याचा विकास बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे धावेल. महाराष्ट्राच्या जनतेला विकासाचा फायदा मिळेल, राज्याचा विकास वेगाने होईल’ असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

पहिला अंक ः राज ठाकरे

काल महाराष्ट्रात घडलेल्या घटनेबाबत बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, उद्धव ठाकरेंचे ओझं शरद पवारांना उतरवायचे होते. त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होणार असल्याचे सांगितले.

मंत्रिमंडळात सामील झालेल्या नेत्यांची यादी
अजित पवार ः उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ ः मंत्री
दिलीप वळसे-पाटील ः मंत्री
हसन मुश्रीफ ः मंत्री
धनंजय मुंडे ः मंत्री
धर्मारावबाबा आत्राम ः मंत्री
आदिती तटकरे ः मंत्री
संजय बनसोडे ः मंत्री
अनिल पाटील ः मंत्री

विकासासाठी मंत्रिमंडळात

अजित पवार यांचा दावा
यावेळी बोलताना अजित पवार यांनी, आज जे महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे, त्यांच्यामध्ये जाण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. या संदर्भात अनेक दिवस तिथे चर्चा सुरू होती. देशपातळीवर जी चर्चा आहे. राज्याची परिस्थिती आहे, त्यावर विकासाला महत्त्व दिले पाहिजे, त्यासाठी आम्ही एकत्र आलो. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 9 वर्ष सरकार सुरू आहे. देशाला मजबुतीने पुढे नेण्याचे काम ते करत आहेत. त्यामुळे विकासासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला असून त्याच कारणासाठी आम्ही मंत्रिमंडळात सहभागी झाल्याचे स्पष्ट केले.
यावेळी अजित पवार यांनी, विरोधकांवर टीका करताना विरोधी पक्ष एकत्र बैठका करत आहेत असा सवाल केला.ममतादीदी त्यांच्या राज्यात बैठका करत आहे, केजरीवाल त्यांच्या राज्यात काम करत आहे. जेव्हा यांची बैठक होते तेव्हा त्यातून निश्चित काहीच बाहेर निघत नसल्याचे सांगितले.