>> अनेक ठिकाणी पडझड, धारगळमध्ये दरड कोसळली
सतत कोसळणाऱ्या जोरदार पावसाने काल रविवारी राजधानी पणजीतील गोव्यातील विविध भागांना झोडपून काढले. त्यामुळे राज्यातील जनजीवन तर विस्कळीत झालेच, शिवाय विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडणे, जुन्या घरांची मोडतोड होणे, अशा घटनाही घडल्या. मात्र काल रविवारनिमित्त नोकरदारांना सुट्टी असल्याने लोकांवर पावसाचा मारा सहन करीत कामावर जाण्याची पाळी आली नाही.
जोरदार पावसामुळे काल दत्तवाडी-म्हापसा येथील भाग्योदय इस्पितळाजवळ एका मोठ्या जुन्या घराचा भाग कोसळून पडण्याची घटना घडली. मात्र, सुदैवाने ह्या दुर्घटनेत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. आणखी एका घटनेत करंझाळे येथील रॉयल पाम इमारतीजवळ एक मोठा वृक्ष उन्मळून रस्त्यावर पडल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तर धारगळ-पत्रादेवी येेथे राष्ट्रीय महामार्ग-66 वर दरड कोसळण्याची घटना घडली.
उद्या-परवा जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढील दोन दिवस म्हणजेच उद्या दि. 4 व परवा दि. 5 जुलै रोजी राज्याला केशरी रंगाचा इशारा दिला असून या काळात उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील काही भागांत अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. तर 6 जुलै रोजी राज्याला पिवळ्या रंगाचा इशारा दिला असून या दिवशी उत्तर व दक्षिण गोव्यातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, आज 3 जुलै रोजी महाराष्ट्रातील वेंगुर्ला ते गोव्यातील वास्कोपर्यंतच्या किनारपट्टीवर 3 ते 3.3 मीटर एवढ्या उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा दिला आहे.
हवामान खात्याचा 25 राज्यांना अलर्ट
सध्या देशातील बहुतांश राज्यांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि आसाम या राज्यात पावासाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच हवामान विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. नुकताच भारतीय हवामान विभागाने 25 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये काही राज्यात जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही राज्यांत मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे जुलै महिन्यात देशातील बहुतेक राज्यांत जोरदार पाऊस पडणार आहे.
ज्या 25 राज्यांत सतर्कतेचा इशारा दिला आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अंदमान-निकोबार, तमिळनाडू, केरळ, झारखंड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि तेलगणा यांचा समावेश आहे. नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुराम या राज्यात चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, कोकण आणि गोव्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.