पेडणे येथील अबकारी खात्यात झालेल्या कथित अबकारी घोटाळा प्रकरणी संबंधितांवर पोलिसांत एफआयआर नोंद करण्यात यावी, या मागणीसाठी काल काँग्रेस नेत्यांनी गोवा अबकारी खात्याचे आयुक्त नारायण गाड यांना घेराव घातला.
अबकारी खात्यातल्या ज्या कारकुनाला या घोटाळ्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे, त्याने या घोटाळ्यातील लाखो रुपये परत केले असून, त्यामुळे हा घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सदर कारकुनाविरोधात पोलिसांत एफआयआर नोंद करण्यात यावी, अशी मागणी करीत काँग्रेस नेत्यांनी नारायण गाड यांच्याकडे केली.
एवढा मोठा घोटाळा केलेल्या आरोपीवर एफआयआर का दाखल केला नाही, असा सवाल करीत ह्या घोटाळ्यातील कारकून आणि दोघा अबकारी निरीक्षकांविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.
यावेळी काँग्रेस नेते एल्विस गोम्स, जनार्दन भंडारी, विजय भिके, प्रदीप नाईक आदींनी नारायण गाड यांना घेराव घालून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तसेच या प्रकरणी त्यांना एक निवेदनही सादर केले.