मुलांचा नाश्ता आणि आरोग्य

0
43
  • डॉ. मनाली महेश पवार

शालेय जीवन म्हणजे मुलांचे वाढीचे वय. या वयात त्यांना सकस अन्नाची गरज असते. त्यामुळे संतुलित अन्न-घटकांना फार महत्त्व आहे. मुलांना आपण जे काय खातो-पितो त्याचा आपल्या शरीराला- मनाला फायदा होतो का नाही, पोषण मिळते की नाही याच्याशी काहीही देणे-घेणे नसते. त्यामुळे पालकांनी सतर्क राहिले पाहिजे.

गोव्यात शाळा सुरू होऊन साधारण दोन आठवडे झाले. पाऊस सुरू न झाल्याने गर्मी तशीच होती. उकाड्यात मुलं शाळेत कशी बसतील याची चिंता पालकांना होती. मुलंच ती! ती एकदम आनंदात होती. मुलांनी शाळेचं स्वागतच केलं. पण उकाड्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे मुलांच्या नाश्त्याचा. सध्या यावर पालकांनी डोळस होऊन पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा एखाद्या बेकरीबाहेर आई टिफिनमध्ये काहीतरी पदार्थ घालताना दिसते. मुलं वाघ मागे लागल्यासारखं पॅटिस/सामोसा खात आहेत. खात कुठलं कोंबत आहेत. असे हे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते आहे. हे चित्र पाहिल्यावर आईची कीव करावी की त्या मुलांची हेच कळत नाही. असाच एक प्रसंग पाहिला आणि मन सुन्न झालं. खरोखरच ही चिंतेची बाब आहे. शाळेत मुलांना माध्यान्ह आहार देतात. ते खाद्य पालक मुलांना द्यायला घाबरतात आणि बेकरीवरचे पदार्थ द्यायला त्यांना योग्य वाटतात.
पालकांना मुलांच्या आहाराविषयी काळजी असतेच. पण सध्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे व आईवडील कामानिमित्त, उद्योगधंद्यासाठी घराबाहेर पडत असल्याने महिलांची तारेवरची कसरत होते हे खरेच; पण व्यवस्थित नियोजन केल्यास इतर कामांबरोबर स्वयंपाकाचेही व्यवस्थापन योग्य प्रकारे होते.

शालेय जीवन म्हणजे मुलांचे वाढीचे वय. या वयात मुलांची वाढ झपाट्याने होत असते. त्यांना सकस अन्नाची जास्त गरज असते. त्यामुळे संतुलित अन्न-घटकांना फार महत्त्व आहे. मुलांना आपण जे काय खातो-पितो त्याचा आपल्या शरीराला- मनाला फायदा होतो का नाही, पोषण मिळते की नाही याच्याशी काहीही देणे-घेणे नसते. त्यांच्यासाठी जिभेला जे चांगले लागते, ज्याने आपली जिव्हा तृप्त होते, नेमके तेच पदार्थ त्यांना आवडतात व तेच पदार्थ ती खायला बघतात. उदा. चिप्स, वेफर्स, बिस्किटे, फास्टफूड, जंकफूड, चटपटीत पदार्थ, तळलेले पदार्थ इत्यादी. बेकरी प्रोडक्ट्स फारच आवडतात. पण ते पदार्थ आरोग्यासाठी हितकारक नसतात.
संपूर्ण दिवस ऊर्जा मिळण्यासाठी सकस नाश्त्याची म्हणजे आहाराची गरज असते. आपण जे खातो त्यातूनच आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जडणघडण होत असते. म्हणून आपण जे अन्न ग्रहण करतो ते समतोल आणि परिपूर्ण असावे. चावणे, चोखणे, चघळणे, शोषणे, पिणे यांसारख्या खाण्याशी निगडित सर्व क्रिया कराव्या लागतील तो समतोल आहार. तसेच गोड, खारट, आंबट, तुरट, कडू, तिखट अशा सहाही रसांचा समावेश असेलला आहार असावा. तसेच क्रोधी, खिन्न, विचलित किंवा आक्रमक मनःस्थितीत असलेल्या माणसाने तयार केलेल्या स्वयंपाकावर तशाच प्रवृत्तींचा परिणाम झालेला असतो. म्हणून स्वयंपाक हा आईने प्रेमाने केलेलाच असावा. घरात बनवलेले पदार्थ महाप्रसादाप्रमाणे असतात. ते गुण बाहेरील हॉटेल, बेकरी पदार्थांमध्ये येणार नाहीत.

दूध, दही, पक्व फळे, सुका मेवा, लाह्या यांसारख्या वाळवलेल्या धान्यांवर नकारात्मक शक्तींचा परिणाम होत नाही. त्यामुळे या अन्नाला ‘सात्त्विक’ अन्न म्हणतात. या पदार्थांचा वापर सकाळी नाश्त्यासाठी करता येतो.
नेहमी सात्त्विक अन्न खाण्याने प्रकृती सुदृढ राहते, ताजेतवाने वाटते, मन शांत राहते. सकारात्मक, सृजनात्मक असा दृष्टिकोन तयार होतो. तसेच आहारात असलेली जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, फायबर इत्यादींमुळे शरीर व मनाला ऊर्जा मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. नाहीतर मुले शाळेत जाऊ लागल्यावर सारखी सर्दी-तापाने आजारी पडतात. त्यामुळे उत्तम संतुलित आहार असावा. आहाराचा निरोगी आयुष्यासाठी सिंहाचा वाटा आहे. आहार, स्मृती, एकाग्रता वाढवण्यासाठी आणि शालेय प्रगतीसाठी आहाराला महत्त्वाचे स्थान आहे.

  • मुलांना नाश्त्यासाठी आपण काय देऊ शकतो?
  • दूध हे पूर्णान्न आहे. ते प्रत्येकाने दररोज घ्यायलाच हवे. संपूर्ण शरीराचे पोषण आणि संवर्धन करण्याची दुधामध्ये क्षमता असते. बऱ्याच वेळा घेरी आल्यासारखे वाटल्यास किंवा थकल्यासारखे वाटल्यास साखर घातलेले ग्लासभर दूध प्यायल्याने मेंदू पुन्हा ताजातवाना होतो आणि शक्ती आल्यासारखे वाटते. ज्यांना दूध पचायला जड वाटते त्यांनी ते थोडे पाणी घालून पातळ करून, त्यात थोडी सुंठ घालून घ्यावे म्हणजे पचनाचा त्रास होणार नाही. उपाशी किंवा काहीतरी बेकरी पदार्थ देण्यापेक्षा दररोज मुलांना दूध द्या. दुधामध्ये प्रोटिन पावडर 1 ते 2 चमचे घालून ते दूध द्यावे. प्रोटिन पावडर घरातच करून हवाबंद डब्यात घालून ठेवावी. साधारण पंधरा दिवस पुरेल एवढी ती एकाच वेळी करता येते. बदाम, खारीक, काजू, अक्रोड, पिस्ता इत्यादी सुकामेवा साधारण मूठभर प्रत्येकी साजूक तुपात भाजून, मिक्सरला लावून चांगली बारीक पूड करावी. त्या पावडरच्या अर्ध्या किंवा समप्रमाणात खडीसाखर घालून चांगली बारीक वाटून पिठी करून एकत्र करावी. ही प्रोटिन पावडर रोज मुलांच्या दुधात घालून द्यावी. विद्यार्थ्याचे पोट भरण्यापेक्षा सगळी जीवनसत्त्वे मुलांच्या शरीराला मिळणे गरजेचे असते.
  • पंचामृताचे नित्य सेवन केल्यास बुद्धिवर्धन होते. हे बुद्धीचे टॉनिक आहे. व्याधीप्रतिकार क्षमता वाढविण्यास याचा उपयोग होतो. कृश मुलाने सेवन केल्यास वजन वाढते. सकाळी नाश्त्याला चपातीला किंवा भाकरीला मध लावून घ्यावे. याने अशक्तपणा किंवा दौर्बल्य दूर होते. अशक्त वा कृश मुलांसाठी दूध + मध हे उत्तम टॉनिक आहे. एक कप दुधामध्ये चार चमचे मध घालून दिल्यास चांगले वजन वाढते.

बुद्धिवर्धनासाठी मुलांना रोज दोन चमचे पंचामृत सकाळी खाण्यास द्यावे. त्याने स्मरणशक्ती व बुद्धी सुधारते. पंचामृत बनवण्याची विधी ः 1 चमचा दही, 1 चमचा मध, 1 चमचा साखर, 2 चमचे तूप व 5 चमचे दूध एकत्र करावे.

  • तूप व दूध या द्रव्यांना रसायन औषधांमध्ये विशेष महत्त्व आहे.
  • दूध व दुग्धजन्य पदार्थ म्हणजे दही, पनीर, चीज, लस्सी, पंचामृत, रवा, गहू, नाचणीच्या खिरी असे पदार्थ नाश्त्याला द्यावे. यात भरपूर कॅल्सियम आणि प्रोटिन असते.
  • रात्री मूठभर शेंगदाणे भिजत घालून सकाळी गुळाबरोबर खायला द्यावे.
  • मिश्र डाळींच्या पीठाचे लाडू नाश्त्यासाठी अति उत्तम.
  • मिश्र धान्यांच्या पिठाचे तसेच सुक्यामेव्याचे लाडूसुद्धा पौष्टिक असल्याने नाश्त्यासाठी श्रेष्ठ होय.
  • चपाती, गूळ-तुपाचा रोल.
  • चपाती-मधाचा रोल.
  • चपाती, साखर-तुपाचा रोल.
  • पराठा-बटाटा, पनीर किंवा मिश्र भाज्या घालून पराठा.
  • कणकेत चणाडाळ, मूगडाळ, उदीडडाळ व मिश्र भाज्या घालून थालीपीठ, ठेपले, धिरडे इत्यादी.
  • मुलांच्या आवडीच्या पदार्थांमध्ये भाज्या घालाव्यात.
  • वेगवेगळे पराठे, थालीपीठे, कटलेट्स इत्यादी.
  • वेगवेगळ्या भाज्या घालून इडली डोसा इत्यादी.
  • वेगवेगळ्या भाज्या किंवा त्यांची प्यूरी घालून वेगवेगळे पुलाव.
  • नाचणी सत्त्व, रव्याची लापशी, गव्हाची खीर, साबुदाण्याची खीर, शेवयांची खीर इत्यादी.
    असे अनेक पदार्थ कमी वेळात मुलांना नाश्त्यासाठी व शाळेत न्यायला डब्यासाठी बनवता येतात. अशा प्रकारचा नाश्ताच मुलांना खायला द्या. रागावून पदार्थ खायला सांगण्यापेक्षा पदार्थाचे महत्त्व पटवून देणे जास्त महत्त्वाचे व गरजेचे आहे.