>> भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंची स्पष्टोक्ती
भाजपच्या केंद्रीय समितीकडून दिली जाणारी कोणतीही जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.
राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांचा कार्यकाळ जुलै महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे राज्यसभेच्या भाजपच्या उमेदवारीसाठी तानावडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच, नवी दिल्ली येथे बुधवारी अमित शहा यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत राज्यसभा उमेदवारी प्रश्नावर चर्चा झाली.
भाजपच्या केंद्रीय समितीकडून राज्यसभेसाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. भाजपने अद्याप राज्यसभेसाठी उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे याबाबत आपण काही सांगू शकत नाही. भाजपच्या केंद्रीय संघटनेने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी निभावणार आहे, असे तानावडे म्हणाले.
नवी दिल्लीतील बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली. दक्षिण गोव्यात गत लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवाराला निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे यावेळी भाजप संघटन, मित्रपक्षांच्या सहकार्यातून दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.