योगासने, योगजीवन, योगदृष्टी, योगसाधना अशा योगाविषयीच्या विविध संकल्पना भारतात पूर्वीपासून प्रचलित आहेत. योगा म्हणजे एकात्मता, एकता, एकात्मिकता अशा विविध संकल्पनादेखील योगाबद्दल सांगता येतील. सर्व सजीवसृष्टी ही एकमेकांशी जोडली गेलेली आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे योगा!
मानवी जीवनाची अत्यंत उच्च स्थिती योगदृष्टीने प्राप्त होऊ शकते. भारतात योगज्ञान अति प्राचीन काळापासून उपलब्ध आहे. आध्यात्मिक प्रक्रियेचा एक विशेष भाग म्हणून योगा या संकल्पनेचा उपयोग केला जातो. योगामध्ये विविध योगसूत्रांचा वापर केला जातो. यम, नियम, प्रत्याहार, ज्ञान, आसन, भक्ती, ध्यान अशा बाबी त्यामध्ये समाविष्ट आहेत.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये 21 जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. एकूण 193 देशांपैकी 175 देशांनी या प्रस्तावास होकार दिला. सविस्तर चर्चेनंतर या प्रस्तावाला डिसेंबर 2014 मध्ये संपूर्णपणे मान्यता प्राप्त झाली. 21 जून 2015 रोजी पहिला ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला.
जागतिक योग दिनाचे महत्त्व
मानवी जीवनात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर योगाने विकास घडवून आणता येतो. त्याचा प्रत्यय जे लोक योगा करतात त्यांना आलेला असतो. असे लोक योगप्रचार करण्यास अत्यंत योग्य व्यक्ती असतात. संपूर्ण जगभरात योगप्रचार झाला तर मानवतेला भारत देश आणि योगा जीवनपद्धती ही सकारात्मक आणि शांततापूर्ण जीवनासाठी सहाय्यक ठरू शकेल.
जागतिक योग दिन कसा साजरा केला जातो?
संपूर्ण जगभरात या दिवशी योगपूर्ण जीवनपद्धती अंगिकारण्याचे आवाहन केले जाते. जीवन सुखी, समृद्धी आणि आनंदी बनवण्यासाठी शरीर व मन योगयुक्त बनवले जाते. त्यासाठी योगासने, प्राणायाम, ध्यान यांचे महत्त्व या दिवशी समजावून सांगितले जाते.
योग दिनाची माहिती सर्वांना व्हावी व त्यानिमित्ताने जनजागृती व्हावी अशा उद्देशाने योग दिनाचे महत्त्व प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र पसरवले जाते. सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करून योग दिनाचे संदेश सर्वत्र पोचवले जातात. जागोजागी मोठमोठे फलक लावले जातात.
योगचिकित्सा, योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार अशा सर्व बाबींची माहिती सर्वांना व्हावी यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी योगाची व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली जातात.
जागतिक योग दिनाची रूपरेखा
जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षी विशिष्ट रूपरेखांचे आयोजन करण्यात येते. रूपरेखा समजून घेऊन त्यामागील उद्देश जाणून घेतला जातो आणि वर्षभर त्याचे पालन करण्यात येते.