जन्म बाईचा… खूप घाईचा… घाईचा…

0
127
  • पौर्णिमा केरकर

गृहिणी ही जर घरची ‘गृहलक्ष्मी’ असे मानले जाते तर मग लक्ष्मीचा पावलोपावली केला जाणारा अपमान हा कौटुंबिक तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकणारा ठरणार. गृहिणींना गृहीत न धरता तिला सन्मान द्यायला शिकायला हवे. कुटुंबाचे भरणपोषण करणारी ती शक्तिरूपिणी फक्त मंदिरांतून मूर्तीरूपात पुजण्यासाठी नाही तर तिची शक्ती ही भक्ती आणि प्रीतीची समरसता साधून कुटुंबस्वास्थ्य टिकविण्यासाठी आहे.

आदर्श गृहिणीच्या काही संकल्पना आमच्या संस्कृतीने आखलेल्या-रेखलेल्या आहेत. संसारासाठी, मुलाबाळांच्या संगोपनासाठी आपलं सर्वस्व पणाला लावणाऱ्या त्यागमूर्तीच्या रूपात तिला बघितलेलं आहे. ती सकाळी लवकर उठून, सडासंमार्जन करून, दळण-कांडण करून मुलाबाळांच्या पोटापाण्याचे पाहते… घराचा सभोवताल, अंगण ही तिची हक्काची जागा. उंबरठा ओलांडून बाहेर फिरण्याची मुभा तिला नव्हती. ते कार्यक्षेत्र पुरुषांचे. पारंपरिक सण-उत्सवांच्या निमित्ताने ती घरातील सर्व कामे आटोपून या आनंदाच्या क्षणात सहभागी होत असे. तिथे ती त्या पारंपरिक मांडावर अभिव्यक्त व्हायची. संसाराचा भार पेलताना तिची होणारी परवड, सासरच्या मंडळीकडून होणारा मानसिक-शारीरिक छळ, सासूची शिवीगाळ, नवऱ्याचा मार, नणंदांचा जाच, जावेच्या कागाळ्या असे प्रत्येक ठिकाणी तिला अडवले जायचे, तरीही तिने तोंडातून शब्द काढायचा नाही असा कडक वचक होता. या महिलांनी मग आपल्या वेदनांचे गाणे केले. बुक्क्यांचा मार सहन केला. परंतु घरातील जाच उंबरठ्याबाहेर येऊ दिला नाही. त्यांना तसे भय कुटुंबाने, समाजाने घातलेले होते.

आज काळ बदलला आहे. महिला मोठ्या प्रमाणात शिकल्या-सवरल्या. कौटुंबिक ते सार्वजनिक अवकाशाला त्यांनी कवेत घेतले आहे. या पार्श्वभूमीवर तिच्या समस्यांतही अधिक भर पडली आहे. तिचे प्रश्न, त्यातील तीव्रता अधिक वाढली असून आता तिला घर आणि कार्यालय असा दुहेरी संघर्ष करावा लागत आहे. घर आणि बाहेरील काम… त्यातही सरकारी वा तत्सम काम करणाऱ्या महिलांना थोडा जास्तीचा सन्मान समाजात मिळू लागला आहे. परंतु हे चित्र बऱ्याच वेळा वरवरचे आभासी वाटते आहे. बंद दरवाजामागे तिचं जीवन अनुभवण्याचा प्रयत्न केला तर अजूनही तिचे दैनंदिन जीवन, तिचे विचार-आचार यांवर सतत कुरघोडी होत असते. ज्या गृहिणी कुटुंब सांभाळतात, घराचे नियोजन करून सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबराब राबतात त्या कोणाच्या खिजगणतीतही नसतात. अलीकडे या बाबीवर महिला जागरूक झालेल्या आहेत. काही अंशी समाजाचे, कुटुंबाचे सहकार्य त्यांना असते. असे असले तरी म्हणावी तशी प्रतिष्ठा त्यांना प्राप्त झालेली नाही.

नोकरी करून महिन्याकाठी विशिष्ट आर्थिक कमाई करणारी महिला कार्यालयातून घरी आल्याआल्या आणि सकाळी कामावर जाण्यापूर्वी घरच्यांसाठी सारे काही आवरून-सावरून जात असते म्हणून ती आदर्श गृहिणी. तिच्याकडून अपेक्षाही तशाच असतात. तिचे अदृश्य अस्तित्व, तिचे लवकर उठणे, उशिराने झोपणे यांना तसे महत्त्वाचे मानले जात नाही. उलट तिने बाहेर कितीही जग गाजवले तरी कौटुंबिक, सार्वजनिक जीवनात या गोष्टीला तेवढेसे प्राधान्य दिलेले नाही. नवऱ्याला विचारले, ‘बायको काय करते?’ तर त्याचे उत्तर असते, ‘काही नाही, घरीच असते!’ मुलांना प्रश्न केला की ‘तुमचे पालक काय करतात?’ तर मुले सांगतात की ‘वडील कामाला जातात, आई घरीच असते.’ म्हणजे एकूणच संपूर्ण घराला वेळेत जेवणखाण मिळायला हवे म्हणून दिवसरात्र एक करणारी, घर नीटनेटके ठेवण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी, महिन्याच्या शेवटी घरात पगार म्हणून एक ठराविक रक्कम देत नाही म्हणून ती काहीच काम करीत नाही अशी ती गृहिणी असा तिच्यावर शिक्काच बसलेला आहे. ही वर्षानुवर्षांची मानसिकता आजकाल गृहिणींना खटकू लागली आहे म्हणून खटके उडू लागले आहेत. आज जगभरात घरकाम हा एकूण स्त्री-रोजगारातील एक महत्त्वाचा रोजगार बनला आहे. तिथे आपली भारतीय गृहिणी वर्षानुवर्षे स्वयंपाकघरात काम करीत आलेली आहे. ते तिचे काम नेहमीच दुय्यम दर्जाचे मानले गेले. त्यामुळे घरची सगळी आघाडी सांभाळून ती काहीच करीत नाही, घरीच असते असे सहजपणे म्हटले जाते. कारण ‘काम आणि त्याच्या मोबदल्यात दाम’ असे सरसकट समीकरण झालेले आहे. सर्वच संसारी महिला समर्थपणे स्वतःचा घरसंसार सांभाळतात. स्वयंपाकपाणी, धुणीभांडी, पै-पाहुणे, मुलाबाळांचे, जुन्या-जाणत्यांचे दुखणे-खुपणे हे सर्व घरची गृहिणीच सांभाळीत असते. एवढे करूनही श्रेय तिच्या वाट्याला येतच नाही किंबहुना तीच स्वतःला मग शेवटी प्राधान्यक्रम देते. असंख्य नाती तिने जतन केलेली असतात. स्वतःसाठी मात्र ती अजिबात वेळ राखून ठेवत नाही. आपलं स्वतःशीही काही नातं आहे हेच मुळी ती विसरायला लागली आहे. या तिच्या मनोधारणेमुळेच ती आपली सर्व कर्तव्ये पार पाडत असावी.

काळ जसा बदलतो तसा समाजाच्या मानसिकतेत बदल होणे अपरिहार्य आहे. बदलांचा हा प्रवाह संथपणे प्रवाहित होत आहे. त्यामुळे गृहिणीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात वेगाने बदल संभवत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत कुटुंबव्यवस्थेला महत्त्वाचे स्थान आहे. एकमेकांशी असलेले भावनिक बंध अतूटपणे जतन करणे, मोठ्यांना आदर देणे, एकमेकांना समजून घेत पुढे जाण्याला प्राधान्य दिले गेले आहे. घरची कामे, मुलाबाळांच्या संगोपनाची जबाबदारी घरच्या गृहिणीची, तर बाहेरची कामे पुरुषांची. पुरुषांनी कमवायचे आणि बायकांनी रांधायचे, वाढायचे… अशी अलिखित कामाची विभागणी होत गेली. यावर कोणाचा आक्षेपही नव्हता. ‘गृहिणीने सदा हसतमुख राहावे, गृहकार्यात दक्ष राहून घरदार- घरातील उपकरणे यांची स्वच्छता राखावी, संसारासाठी हात राखून खर्च करावा, पित्याने आणि भावाने जुळवून दिलेल्या व्यक्तीचा तिने मनोमन पती म्हणून स्वीकार करावा, त्याच्यासाठीच झिजावे, ‘पती हाच परमेश्वर’ ही भावना बाळगून तिने स्वतःचे जीवन हे कुटुंब आणि पतीसाठीच घालवावे- ही गृहिणीच्या आदर्श संकल्पनेसंदर्भात मनूने पुरुषप्रधान संस्कृतीला समोर ठेवून केलेली नियमावली आहे आणि हीच विचारधारा घेऊन, अपमान-अवहेलना वर्षानुवर्षे सहन करीत, आयुष्यभर गुलामगिरी सहन करीत आली आहे. आता आता कोठे यासंदर्भात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. गृहिणी ही घरची गृहलक्ष्मी होती. ती सदैव व्यस्त राहिलेली आहे. तसे बघायला गेलो तर ‘गृहिणी’ ही संकल्पना खूप उशिरा मानवी समाजात रूढ झालेली आहे. पूर्वी स्त्री-पुरुष आदिम अवस्थेत असताना ते रानावनात भटकायचे. नंतर नंतर त्यांना जाणीव झाली की स्त्रीवरून सतत त्यांच्यात भांडणे होताहेत. मग लग्नाची संकल्पना रुजली आणि स्त्रीवर बंधने लादली गेली. सातच्या आत घरात. तिने जे काही करायचे ते उंबरठ्या आत. उंबरठा ही तिची मर्यादा. आता हे चित्र बदलले आहे. मातीत घट्ट पाय रोवून ती आकाशाचे स्वप्न पाहू लागली आहे. ते तिने प्रत्यक्षातही उतरवले आहे. तिला या सर्वांची जबर किंमत मोजावी लागते, तरीही तिने स्वतःच्या हक्काची चूल आणि मूल यांचा त्याग केलेला नाही. गृहिणीचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे, त्यालाही ती पुरून उरलेली दिसते. त्यांच्या कामाचा उरक मोठा. शुभांगी या उच्चशिक्षित गृहिणीचे उदाहरण आपण घेऊ शकतो. ती वकिली करते. नोटरी… तिने स्वतःचे ऑफिस घरातच थाटलेले आहे. हेतू एवढाच की घरातील कामे आणि तिचे क्लाईंटस्‌‍, त्याचबरोबर मुलांकडे लक्ष देता येईल म्हणून हा सगळा खटाटोप. ती ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठते. मुलांसाठी व नवऱ्यासाठी सकाळचा नाश्ता, त्यांची टिफिन तयार करून त्यांच्या बॅगेत भरते. नवरा स्वतःची तयारी करून ऑफिसमध्ये जातो. त्यानंतर ती छोट्या मुलाला शाळेत पोहोचवून येते. दुपारी शाळेतून घरी येणाऱ्या मुलांसाठी जेवणसुद्धा सकाळी सकाळी करून आधीच येऊन घरी बसलेल्या क्लाईंटशी चर्चा करण्यास तत्पर होते. या मधल्या वेळेत तिची मोलकरीण येऊन घरची साफसफाई करते, कपडे धुवून घेते. तीही आपल्या घरामधून शुभांगीसारखीच नवरा आणि मुलांचे करून आलेली असते.

ऑफिसमध्ये काम न करणाऱ्या गृहिणी संपूर्ण दिवस व्यस्त असतात, परंतु त्यातूनही वेळ काढून त्यांनी स्वयंसहाय्य गट, महिला मंडळाशी स्वतःला जोडून घेतलेले आहे. त्या घरकाम करतात आणि मग स्वतःचे छंदही जोपासतात. पूर्वी भूक लाडू, तहान लाडू घराघरांत केले जायचे. लग्न-सण-उत्सवप्रसंगी जेवणावळी सामूहिक व्हायच्या. आता यांची जागा स्वयंसहाय गटांनी घेतली आहे. महिला एकत्रित येऊन ही कामे स्वतः अंगावर घेऊन करतात. घरच्या गृहिणींचे रांधा-वाढा-उष्टी काढा हे कधी सुटलेच नव्हते. पूर्वी ती फक्त कुटुंबासाठी रांधायची… तेव्हा तिचे सुगरण असणे जाणवले नव्हते. तिच्या हातून स्वयंपाकात काही कमी-जास्त झाले तर तिला हिडीसफिडीस केले जायचे. आता तिच्या हाताला असलेल्या चवीचे जाहीर कौतुक होत आहे. तिच्या श्रमांना मिळालेली ही कौतुकाची थाप आहे. ती तिची पोचपावती आहे. आताच्या गृहिणीचे काम खूप वाढले आहे. घराची आणि बाहेरची अशा दोन्ही बाजू ती सांभाळते आहे. शुभांगीसारख्या कितीतरी महिलांनी- ज्या कमावतात, स्वावलंबी होतात, गाडी चालवितात- मुलांना जन्म देण्यापासून ते त्यांचे संगोपन, शिक्षण, लग्न अशा सर्वच स्तरांवरची जबाबदारी लीलया पेललेली आहे. किंबहुना त्यांच्या जगण्याचा तो अविभाज्य घटक बनलेला आहे. ही केवळ आपल्या कुटुंबाप्रती असलेली कर्तव्यभावना नाही तर ती भावनिक गुंतवळ आहे. जे आनंदानं आणि मनःपूर्वक केलं जातं, त्याचं कधी ओझं होत नाही की थकवाही जाणवत नाही. ‘जन्म बाईचा, खूप घाईचा’ हे आपण अनुभवत आहोत. गृहिणीशिवाय घराला घरपण लाभत नाही. घर कोरडे, निस्तेज वाटते. याचा अर्थ तिनेच एकटीने राबावे असे मुळीच नाही. तिची दृष्टी, व्यवस्थापन, कलात्मकता नेहमीच घराला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देत आलेली आहे. गरज आहे ती समाजाने, कुटुंबाने तिला समजून घेण्याची. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर तिची खूप घालमेल होते. तेव्हा तिला वाटते की, इतकी वर्षे ज्या घरासाठी मी राबले त्या घराने आत्मीयतेने आपली विचारपूस करावी. ‘तू थकलीस, आराम कर, राहिलेले मी करीन’ या शब्दासाठी ती आसुसलेली असते अन्‌‍ तिला या शब्दांमधूनच प्रेरणा मिळते, अंगात बळ संचारते. नव्या उमेदीने ती स्वतःला कामात जुंपून घेते. कुटुंबाला बांधून घेतलेल्या या गृहिणीने घरकामाची व्यावहारिक वाटणी केली नाही. अजूनही बिनपगारी काम ती करते. ‘आई कोठे काय करते… ती हाऊसवाईफ आहे’ असे टोमणे, तिच्याप्रतीचे समाज अन्‌‍ कुटुंबाचे विचार बदलायला हवेत. तीही एक जिवंत हाडामांसाची व्यक्ती आहे. ती ज्या कुटुंबासाठी राबते त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी एकमेकांना सहाय्य करणे अशी असायला हवी. गृहिणी ही जर घरची गृहलक्ष्मी असे मानले जाते तर मग लक्ष्मीचा पावलोपावली केला जाणारा अपमान हा कौटुंबिक तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकणारा ठरणार.
त्यासाठीची वाटचाल सध्या सुरू झालेली आहे. अजूनही फारसा उशीर झालेला नाही. गृहिणींना गृहीत न धरता तिला सन्मान द्यायला शिकायला हवे. कुटुंबाचे भरणपोषण करणारी ती शक्तिरूपिणी फक्त मंदिरातून मूर्तीरूपात पुजण्यासाठी नाही तर तिची शक्ती ही भक्ती आणि प्रीतीची समरसता साधून कुटुंबस्वास्थ्य टिकविण्यासाठी आहे.