अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने उत्तर-पश्चिम मार्गाने पुढे सरकत आहे. त्यामुळे गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्राला चक्रीवादळाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे येणाऱ्या मुसळधार पावसाने सखल भागात पाणी साचण्याची, पूर येण्याची आणि किनाऱ्यालगत भरतीमुळे उंच लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या पार्श्वभफमीवर सुरक्षेच्या कारणामुळे आतापर्यंत 50 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातमधील जखाऊ बंदराजवळून जाण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास ताशी 125 ते 135 किलोमीटर वाऱ्याच्या वेगासह जमिनीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्ची घरे आणि बांधकामे कोसळू शकतात. झाडांची पडझड आणि वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीम तैनात केल्या आहेत. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के
गुजरातमधील भुज आणि कच्छमध्ये काल भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.3 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर स्थानिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. आधीच चक्रीवादळाची भीती, त्यातच भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.