>> टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांची स्पष्टोक्ती; शिक्षण संचालनालयातर्फे जनभागीदारी कार्यक्रम
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 नवभारत घडविण्यास हातभार लावणार आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांना विश्वासात घेतले जात आहे, असे शालेय शिक्षणासाठी नियुक्त टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी येथे काल स्पष्ट केले. शिक्षण संचालनालयातर्फे आयोजित जनभागीदारी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राज्यात या शैक्षणिक वर्षापासून एनईपी 2020 च्या अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही अंमलबजावणी यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालकांचा सूहभाग महत्त्वाचा आहे. या वर्षीपासून नर्सरी, लोअर, अप्पर केजीसाठी फाउंडेशन कोर्सचा समावेश आहे, असेही शिरोडकर यांनी सांगितले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीबाबत राज्य सरकार अत्यंत गंभीर आहे आणि ते पद्धतशीरपणे अमलात आणेल, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.
मुलांच्या आयुष्यातील तीन ते आठ वर्षांमध्ये मेंदूचा विकास सर्वांत जलद होतो आणि म्हणूनच मेंदूच्या सर्वांगीण वाढीसाठी आपण त्यांना कसे शिकवू शकतो यावर भर देणे आवश्यक आहे. एनईपी 2020 पंचकोश संकल्पनेवर लक्ष केंद्रित करते ज्यामध्ये शारीरिक विकास, जीवन ऊर्जेचा विकास, भावनिक आणि मानसिक विकास, बौद्धिक विकास आणि आध्यात्मिक विकास यांचा समावेश आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले.
केंद्रीय शिक्षण मंत्रालय सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या भागीदारीत जनभागीदारी कार्यक्रमाच्या माध्यमातून एनईपी 2020 बाबत देशभरात जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहे, असे लोलयेकर यांनी सांगितले.
शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी स्वागत केले, तर एससीईआरटीचे संचालक शंभू घाडी यांनी आभार मानले.
खास अभ्यासक्रम, खास शिक्षक
मुलांच्या पायाभूत शिक्षणासाठी बालवाडी, नर्सरीच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच, पायाभूत स्तरावरील देण्यात येणाऱ्या शिक्षणावर देखरेख ठेवण्यासाठी एका समितीची स्थापना केली जाणार आहे. पायाभूत स्तरावर शिक्षण देणारे खास शिक्षक तयार करण्यासाठी खास अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत, असे प्रसाद लोलयेकर यांनी सांगितले.