पवार मोकळे

0
17

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आपली कन्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल असे पक्षाचे दोन कार्याध्यक्ष नेमून आपल्या राजकीय चातुर्याचे दर्शन घडवले आहे. पुतण्ये अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा असल्याचे कारण देत आणि त्यांनीच सुप्रियाचे नाव सुचवल्याचे सांगत त्यांचा पत्ता व्यवस्थित कापला गेला. मात्र, राष्ट्रवादीने आता भाजपशी हातमिळवणी करावी या अजित पवारांच्या विचारांचे समर्थक असलेले आणि ईडीचा दणका बसलेले प्रफुल्ल पटेल यांनाही सुप्रियाच्या जोडीने कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवून पवारांनी तो पर्यायही भविष्यासाठी खुला ठेवला आहे. सुप्रिया यांच्याकडे पक्षाची कमान सोपविल्याने घराणेशाहीचा आरोप होणार होता, त्याची धगही त्यातून कमी झाली ती वेगळीच. शिवाय सुप्रियाला कार्याध्यक्ष बनवण्याचा निर्णय हा आपला नसून पक्षाचा असल्याचेही पवार सांगत आहेत. सुप्रिया सुळे ह्या निश्चितपणे एक कार्यक्षम महिला नेत्या आहेत. पित्याच्या तालमीत तयार झालेल्या असल्याने विनम्रपणे सर्वांशी हसत खेळत, मिळून मिसळून वागण्याचे कसब त्यांना साधले आहे. त्यामुळे त्यांना व्यापक स्वीकारार्हता आहे. आधी राज्यसभेच्या आणि नंतर तीन वेळा लोकसभेच्या खासदार असल्याने राष्ट्रीय पातळीवरही त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. संसदेत त्यांनी वेळोवेळी उत्तम कामगिरी बजावली आहे आणि ‘संसद रत्न’ पुरस्कारानेही त्या सन्मानित आहेत. प्रफुल्ल पटेल हे तर केंद्रात मंत्री होते. राष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख तर आहेच. या दोघांमध्ये विविध राज्यांच्या जबाबदाऱ्या वाटून देऊन स्वतः पवारांनी आपले हात मोकळे केले आहेत. वय आणि दुर्धर आजारपण यामुळे पक्षाची संपूर्ण जबाबदारी पेलणे त्यांच्यासाठी तापदायक होत असेल यात शंका नाही. मात्र, पक्षाध्यक्षपद सोडण्याची घोषणा करण्यासाठी त्यांनी ‘लोक माझे सांगाती’ ह्या आपल्या आत्मकथनपर पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाची वेळ निवडली. अर्थातच, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तेथे ती आकस्मिक घोषणा पूर्णपणे अनपेक्षित असल्याने त्याला तेथेच प्रचंड विरोध झाला आणि अजित पवारांची काकांचा पक्ष पुढे चालवण्याची महत्त्वाकांक्षाही तेथेच गाडली गेली. अजित यांची कोणाचा मुलाहिजा न ठेवणारी बेधडक कार्यपद्धती पक्षाला अडचणीत टाकणारी ठरेल हे पवार अर्थातच पुरेपूर जाणून आहेत. शिवाय अजितदादांना केवळ महाराष्ट्राचे राजकारण प्रिय आहे, त्यांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नाही हा भागही त्यात आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण सेंटरमधील कार्यक्रमात ‘सुप्रिया, तू गप बस’ म्हणून दटावणाऱ्या अजितदादांना पवारांनी आपल्या शैलीत न दटावताच गपगार केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून चालला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे त्यांचा सहभाग असलेली महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची सत्ता गेली. पक्षाने आपले राष्ट्रीय पक्षाचे स्थानही गेल्या एप्रिलमध्ये गमावले. पक्ष स्थापून पंचवीस वर्षे झाली, तरी महाराष्ट्राबाहेर म्हणावा तसा मोठा विस्तार करण्यात पक्षाला अजूनही यश आलेले नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध दर्शवीत ज्या काँग्रेसमधून फुटून निघून पवारांनी तारीक अन्वर आणि पी. ए. संगमांच्या साथीने पक्ष स्थापन केला, त्याच काँग्रेससोबत अल्पावधीत हातमिळवणी करून पक्षाने आपली विश्वासार्हताच घालवली. महाराष्ट्रात त्या पक्षाच्या सोबत सरकार स्थापन करणे काय, केंद्रातील काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला पाठिंबा आणि मंत्रिपदे काय, राष्ट्रवादी काँग्रेस शेवटी सोनिया – राहुल यांच्या काँग्रेसचीच देशी आवृत्ती म्हणून वावरत आली आहे. मध्यंतरी काँग्रेस रसातळाला चालली असताना ती पोकळी भरून काढण्याची संधी आम आदमी पक्षासारख्या नवख्या पक्षाने अनेक राज्यांत घेतली, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला तेही जमले नाही. महाराष्ट्रापलीकडे व त्यातही पश्चिम महाराष्ट्रापलीकडे या पक्षाला अजूनही झेप घेता आलेली नाही. पवारांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा अजूनही प्रज्वलित असल्या, तरी पक्षाला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व देण्याजोगी परिस्थितीच राहिलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांची आघाडी बनवण्याचे दिवास्वप्न वेगवेगळ्या घटकांकडून पाहिले जात आहे, परंतु पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण याचे उत्तर कोणापाशीही नाही. जो तो स्वतःलाच त्या खुर्चीत बसलेले पाहतो आहे. पवारांची महत्त्वाकांक्षाही जरूर आहे. पक्षात कार्याध्यक्ष नेमल्याने आता त्यांचा हात मोकळा झाला आहे. त्यामुळे विरोधकांची आवळ्या भोपळ्याची मोट बांधण्यात ते कितपत सक्रिय होतात, किमान पक्षाने गमावलेले राष्ट्रीय पक्षाचे स्थान तरी त्याला पुन्हा देऊ शकतात का, हे आता पाहावे लागेल.