मंत्रिमंडळ फेररचनेचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच

0
5

>> भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांची स्पष्टोक्ती; पक्ष केवळ शिफारस करणार; अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचाच

मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा मंत्रिमंडळाची फेररचना करावी की नाही हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा असतो, तो त्यांचा अधिकार आहे. पक्ष त्याबाबत फक्त काही सूचना करू शकतो, असे भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी काल पणजीतील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘सेवा, सुशासन व गरीब कल्याण’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यानिमित्त रवी हे गोव्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला.
काल पत्रकारांनी त्यांना राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेररचना होणार असल्याची चर्चा होती, त्याचे काय झाले असे विचारले असता त्यांनी सदर बाब स्पष्ट केली. तुमचा प्रश्न बरोबर आहे; पण तो तुम्ही चुकीच्या माणसाला विचारत आहात, असे त्यांनी यावेळी सदर प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला उद्देशून म्हटले. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तार किंवा फेररचनेबाबत पक्षाला सांगितले तर पक्ष तशी शिफारस करेल; मात्र तसा निर्णय मुख्यमंत्र्यांनाच घ्यावा लागणार असल्याचे रवी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी पक्षाकडे अद्याप तशी शिफारस केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पक्षाचा एखादा मोठा व दिग्गज नेता आला की मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार असल्याच्या अफवा उठू लागतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

आगामी लोकसभा निवडणुकीत केंद्रात पुन्हा एकदा भाजप सरकारच सत्तेवर येणार असून, पक्षाला 350 जागा मिळतील, अशी आशा सी. टी. रवी यांनी यासंबंधी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना स्पष्ट केले.
केंद्रातील भाजप सरकारचे काम जनतेने पाहिलेले आहे. लोक पुन्हा एकदा भाजप सरकारलाच भरभरुन मते देणार असून, पक्षाला 350 हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास रवी यांनी व्यक्त केला.

देशात ‘तुष्टीकरण आणि सब का साथ सब का विकास’ यांच्यात लढाई सुरू आहे. विरोधी पक्ष तुष्टीकरण करत आहेत, तर भाजप सर्वांना पुढे घेऊन जात आहे, असेही रवी म्हणाले.
देशात प्रचंड महागाई वाढलेली असून, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे, असे विचारले असता, कोरोना महामारी व रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाई भडकल्याचे ते म्हणाले. पाकिस्तान, श्रीलंका व अन्य कित्येक देश दिवाळखोर झालेले असतानाही भारताची स्थिती मजबूत आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

म्हादईचा राजकारणासाठी वापर नाही
कर्नाटक निवडणुकीत म्हादईचा तुम्हाला उठवता आला नाही असे तुम्हाला वाटते काय असे विचारले असता आम्ही म्हादईचा राजकीय फायद्यासाठी कधीही वापर केला नसल्याचा दावा रवी यांनी यावेळी केला. कर्नाटकला म्हादईचे पाणी मिळवून देणार का असे विचारले असता म्हादईचा प्रश्न हा न्यायालयात आहे आणि त्यासंबंधी न्यायालयच काय तो निवाडा देणार असून, या निवाड्याचे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटकातील पराभवाला विविध कारणे
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या दारुण पराभवाविषयी विचारले असता ते म्हणाले की, त्या पराभवाची वेगवेगळी कारणे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्याप्रमाणे काम करतात, त्याप्रमाणे भाजप कर्नाटकात करू शकला नाही. आमचे ते अपयश आम्हाला मान्य करावे लागेल, असे सी. टी. रवी म्हणाले. त्याशिवाय अनुसूचित जाती-जमातींतील लोकांना आरक्षण देण्यास आम्हाला आलेले अपयश हेही पराभवाचे आणखी एक प्रमुख कारण असल्याचे ते म्हणाले.