>> मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, विविध खात्यांचे सचिव व अधिकाऱ्यांचा सहभाग
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून पुढे आलेले दोन दिवसांचे चिंतन शिबिर दक्षिण गोव्यातील बाणावली येथील ताज एक्झोटिका या हॉटेलमध्ये कालपासून सुरू झाले असून, काल सकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्या शिबिराचे उद्घाटन केले.
राज्याचे मंत्री आणि विविध खात्यांचे सचिव व अधिकारी वर्ग यांच्या समन्वय असावा. तसेच राज्याची धोरणे आणि योजना चांगल्या प्रकारे राबवता याव्यात या उद्देशाने हे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
या शिबिरात मुख्यमंत्र्यांबरोबरच मंत्री, आमदार, पोलीस महासंचालक, विविध खात्यांचे सचिव आणि अधिकारी सहभागी झाले होते.
सरकारी योजनांची प्रभावीपणे कशी अंमलबजावणी करावी, यावर उपाययोजना आखतानाच अर्थसंकल्पातील तरतुदी जनतेपर्यंत योग्य प्रकारे कशा पोचवाव्यात, याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे.
सरकारी योजनांमध्ये त्रुटी असल्यास संबंधित खात्याचे मंत्री त्या दाखवून देणार आहेत. तसेच त्या त्रुटी दूर कशा कराव्यात, यावर चर्चा होणार आहे.