गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यातून जाणारा पश्चिम बगल मार्ग हा खांबांवर उभारण्याची मागणी केली. तसे न केल्यास सासष्टीतील काही भागांत पावसाळ्यात पूर येण्याची भीती त्यांनी गडकरींसमोर व्यक्त केली.
या मागणीसोबतच सरदेसाई यांनी यावेळी गडकरी यांच्याकडे भोम व खोर्ली येथील बगल मार्गाच्या आरेखनात बदल करण्याची मागणी केली. त्याचबरोबर काणकोण करमल घाट या वनक्षेत्रातील वृक्षांची तोड होऊ नये, यासाठी त्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 चे चौपदरीकरण करताना हा रस्ता फ्लायओव्हरवर बांधण्याची मागणी त्यांनी गडकरींकडे केली.
नितीन गडकरींनी आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेतल्याचे सांगून आपण केलेल्या सूचना ते स्वीकारतील, असा विश्वास विजय सरदेसाई यांनी भेटीनंतर व्यक्त केला. गोवा सरकारने याबाबत आपला अहंकार आड येऊ न देता या मागण्यांना जनतेचे हित लक्षात घेऊन पाठिंबा द्यावा, अशी मागणी सरदेसाई यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे काल केली. यावेळी सरदेसाईंसमवेत पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत हेही हजर होते.