राज्यातील धरणांची पाणी पातळी खालावली

0
13

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी असल्याने राज्यातील अनेक भागांतील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. फोंडा तालुक्यातील पंचवाडी येथील म्हैसाळ धरणातील पाण्याची पातळी 1 टक्क्यावर आल्याने धरणातून पाणी खेचण्यावर निर्बंध आले आहेत. सत्तरी तालुक्यातील अंजुणे धरणातील पाण्याची पातळी 6 टक्क्यांवर आली आहे. सांगे तालुक्यातील साळावली धरणातील पाण्याची पातळी 22 टक्क्यांवर आली आहे.

म्हैसाळ धरणातून शिरोडा व पंचवाडी या पंचायत क्षेत्रात पाण्याचा पुरवठा केला जात होता. तथापि, धरणातील पाण्याची पातळी घटल्याने शिरोडा भागात ओपा पाणी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

दरवर्षी मान्सूनपूर्व पाऊस चांगला प्रमाणात पडत असल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होत होती. या वर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांत केवळ पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाची नोंद झाली आहे. आता, जून महिन्यातसुद्धा मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी आहे. म्हैसाळ धरणामध्ये पावसाच्या पाण्याचा साठा करून नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणामध्ये नैसर्गिक झरे नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली. म्हैसाळ येथे धरणातील पाणी खेचण्यावर निर्बंध आल्याने पंचवाडी गावात पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. ही पाणी समस्या सोडविण्यासाठी स्थानिक आमदार, जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी प्रयत्न चालविले आहेत.

राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे घटलेले प्रमाण चिंतेचा विषय बनला आहे. या वर्षी मान्सूनचे आगमनही वेळेवर होणे कठीण आहे. राज्यभरातील नैसर्गिक झऱ्यांवर वाढत्या उष्णतेचा विपरीत परिणाम होत आहे. तथापि, चापोली, आमठणे आणि गवाणे धरणांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मान्सूनचे आगमन लांबणीवर
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले आहे. येत्या चोवीस तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. सदर चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचे आगमन अजूनपर्यंत झालेले नाही. त्यामुळे गोव्यातील मान्सूनचे आगमन लांबणीवर पडले आहे. राज्यातील तापमानात वाढ झाली असून नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात आर्द्रतेच्या प्रमाणात वाढ झाली असून आर्द्रता 90 टक्क्यावर पोहोचली आहे.

मान्सून केरळमध्ये येत्या 4 जूनच्या दरम्यान दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला होता. तथापि, अजूनपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल झालेला नाही. केरळ किनारपट्टीच्या दिशेने मान्सूनची वाटचाल सुरू झालेली आहे. हवामान विभागाने मान्सून येत्या 4 जूनच्या आसपास चार दिवस अगोदर किंवा उशिरा दाखल होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला होता. मान्सून दक्षिण अरबी समुद्र आणि लक्षद्वीप परिसरात आणखी काही भागात पुढे सरकला आहे आणि हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती
आहे.

राज्यातील तापमानात वाढ
राज्यातील तापमानात सामान्य तापमानापेक्षा वाढ झाली असून नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यात मान्सूनपूर्व पावसाचे प्रमाण कमी असल्याने उष्णतेमध्ये आणखी वाढ झाली आहे. पणजी येथे चोवीस तासांत कमाल तापमान 35.5 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27.6 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे. कमाल तापमानात सामान्य तापमानापेक्षा 3.5 अंश सेल्सिअस एवढी वाढ नोंद झाली आहे. येत्या चोवीस तासांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. येथील हवामान विभागाने राज्यातील काही भागात 7 जूनपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.