>> गोव्यातील तिसऱ्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा
गोव्यामधील स्टार्टअप20 च्या तिसऱ्या बैठकीत स्टार्टअप परिसंस्थेची वृद्धी आणि नवोन्मेषासाठी जी 20 देशांनी एकजूट दाखविली आहे.
जागतिक स्तरावर स्टार्टअप्सच्या वाढीसाठी आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी सहकार्य बळकट करण्याच्या आणि प्रयत्नांना एकत्रित करण्याच्या उद्देशाने गोव्यातील स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी महत्त्वपूर्ण चर्चा आणि बैठकांचे आयोजन करण्यात आले.
डॉ. चिंतन वैष्णव यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत स्टार्टअप 20 च्या बैठकीमधील प्रगती आणि धोरणविषयक परिपत्रक यासंदर्भात माहिती दिली. या परिपत्रकाबाबत शिष्टमंडळातील सर्व सदस्यांमध्ये झालेल्या मतैक्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. हा करार म्हणजे जी-20 देशांचा जागतिक पातळीवर स्टार्टअप परिसंस्थांना चालना देणारा एक महत्त्वाचा क्षण ठरला. हा महत्त्वाचा टप्पा साध्य करण्यात जी20 देशांदरम्यान झालेल्या प्रदीर्घ चर्चा आणि एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत, असे डॉ. वैष्णव यांनी सांगितले.
स्टार्टअप्ससाठी एका चौकटीची निर्मिती आणि स्वीकृती, स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी संस्थांच्या आणि परिसंस्थांच्या जाळ्याची निर्मिती, भांडवलात आणि उपलब्धतेत वाढ, स्टार्टअप्ससाठी बाजार नियमनात शिथिलता आणि स्टार्टअप परिसंस्थेमध्ये अतिशय कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या समुदायांच्या समावेशाला प्राधान्य त्याचबरोबर जागतिक महत्त्वाच्या स्टार्टअप्समध्ये वृद्धी या मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता. स्टार्टअप्सना नवोन्मेषासाठी, वाढीसाठी आणि प्रभावी पद्धतीने जागतिक आव्हानांची हाताळणी करण्यासाठी सक्षम करण्याचा या उपाययोजनांचा उद्देश आहे, असे डॉ. वैष्णव यांनी सांगितले.
डॉ. वैष्णव यांनी जी 20 देशांना त्यांच्या स्टार्टअप परिसंस्थेच्या वचनबद्धतेसाठी एकत्र येऊन कृती करण्याचे महत्त्वपूर्ण आवाहन केले. त्यांनी 2030 पर्यंत स्टार्टअप परिसंस्थेसाठी 1 ट्रिलियन डॉलर्सच्या भरीव रकमेच्या तरतुदीचा प्रस्ताव मांडला. धोरण परिपत्रकात नमूद केलेल्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी प्रतिनिधींनी उत्साह आणि वचनबद्धता व्यक्त केली. दरम्यान, स्टार्टअप 20 प्रतिबद्धता गटाची शिखर बैठक गुरूग्राम येथे 3 व 4 जुलै 2023 रोजी होणार आहे.