कर्मफळ

0
35

योगसाधना- 603, अंतरंगयोग- 188

  • डॉ. सीताकांत घाणेकर

आपले विचार शक्यतो सकारात्मक हवेत व कर्मदेखील नीतिमत्तेला धरून हवे.
कलियुगाच्या वातावरणामुळे हे असे घडणार, पण सुज्ञाने स्वतःची बुद्धी वापरून दिनचर्येवर लक्ष द्यायला हवे. तसेच आपले विचार, बोल, व्यवहार यांसंदर्भात अत्यंत दक्ष असायला हवे.

प्रत्येक जीवाची- मग तो पशू, पक्षी, कृमी, किटक, जंतू वगैरे कोणताही प्राणी असो- अपेक्षा असते की आपले जीवन सुखद असावे. पण ते आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. मानवच फक्त बुद्धीचे दान लाभलेला प्राणी आहे. तोच विचार करू शकतो- ‘जीवन जगावे तर कसे जगावे’ तसेच ‘जीवनाची यात्रा संपल्यावर कसे मरावे.’
प्रत्येक मानवाचा वर्तमान वेगवेगळा असतो- सुख-दुःख, यश-अपयश, मान-अपमान, श्रीमंती-गरिबी… असे विविध पैलू असलेला. त्याची कारणेही तशीच आहेत. त्यात मुख्य म्हणजे त्याचे कर्म- या जन्मीचे आणि पूर्वीच्या अनेक जन्मांचे. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते.

शास्त्रकार म्हणूनच म्हणतात ः ‘जसे पेराल तसे भोगाल’, ‘तांदूळ-गहू पेरले तर तेच उगवतील!’ आंबा पेरला तर आंबे खाल आणि काटे लावले तर तेच मिळतील. म्हणून दर व्यक्तीने कर्म करताना सखोल विचार करायला हवा. भविष्यात चांगले फळ, सुखी-आनंदी जीवन हवे असेल तर त्याप्रमाणे सत्कर्म करायला हवे. बहुतेकजण हे माहीत असूनदेखील स्वार्थ व अहंकारामुळे आपले कर्म व्यवस्थित पार पाडत नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर पश्चात्ताप करायची वेळ येते.
काही वेळा हेतू चांगला असतो, पण थोडीशी चूक झाली तरी कर्मसिद्धांताप्रमाणे फळ चुकत नाही. इतिहासात अशी काही उदाहरणे आहेत. पण एक चांगले उदाहरण म्हणजे भीष्म पितामह. महाभारताच्या लढाईत भीष्म कुरुक्षेत्रावर शरपंजरी पडले होते. इच्छामरण असल्यामुळे ते जीवंत होते. अजून त्यांच्या मताप्रमाणे योग्य वेळ आली नव्हती. दर संध्याकाळी श्रीकृष्ण पांडवांबरोबर त्यांना भेटायला येत असे. लढाईचा सर्व तपशील पितामहांना दिला जायचा.

एके दिवशी भीष्मांनी श्रीकृष्णाला विचारले, “कृष्णा, मी अगदी निःस्वार्थी जीवन जगलो. पित्याच्या सुखासाठी लग्न केले नाही. राजा झालो नाही. फक्त वचनाप्रमाणे राज्याचा सांभाळ केला. तरीपण मला हे असे शरपंजरी जीवन का?”
श्रीकृष्ण म्हणाले, “तुम्हीच या घटनेला जबाबदार आहात. तुमच्या मागच्या जन्माचे ते कर्मफल आहे.” श्रीकृष्णाने त्यांच्या डोळ्यासमोर हात ठेवला व आपण जशी कॅसेट ‘रिवांडर’ व ‘प्ले’ करतो तसा त्यांच्या पूर्वजीवनाचा भाग त्यांना दाखवला आणि त्यांना लक्षपूर्वक बघायला सांगितले.

दरजन्मी ते राजपुत्रच होते. काही जन्म बघितले पण त्यांना तसे काही कारण सापडले नाही. त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले- “या जन्मीचे कर्म व्यवस्थित बघा.”
एक दिवस ते घोड्यावरून शिकारीला जात होते तेव्हा रस्त्यात एक सरडा आडवा आला. तो सरडा घोड्याच्या टापेखाली मरेल म्हणून भीष्मांनी आपला बाण चपळतेने काढला व त्या सरड्याला बाजूला वर जंगलात फेकले.
श्रीकृष्ण म्हणाले, “हेच तुमचे कर्म!” भीष्म म्हणाले, “यात मी वाईट काय केले?” श्रीकृष्णाने सांगितले, “तुम्ही अवश्य सरड्याला घोड्याच्या टापेखाली मरण्यापासून वाचवले, पण पुढे त्याचे काय झाले ते बघा!” आणि बघतो तर काय? तो सरडा उलटा काट्यांवर पडला होता. त्याला सरळ होता येईना. शेवटी तो वळवळून उपाशी मेला.

श्रीकृष्ण म्हणाले, “हेच तुमचे कर्म. त्याचे श्राप तुम्हाला भोगावे लागताहेत. जेवढे दिवस तो सरडा जगला तेवढे दिवस तुम्हाला असे शरपंजरी पडावे लागणार. त्यानंतर तुम्हाला मृत्यू येईल. खरे म्हणजे तो सरडा कुठे पडला हे तुम्ही बघायला हवे होते. पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमचा हेतू शुद्ध होता- एका मुक्या जीवाला वाचवण्याचा. त्यामुळे तुम्हाला तेवढ्या यातना होत नाहीत. तसेच तुम्ही उपाशी नाही. इथे तुम्हाला खायला-प्यायला मिळते. तसेच आम्हीदेखील दर दिवशी तुम्हाला भेटायला येतो. तो सरडा बिचारा एकटाच मेला उपाशी!”
सारांश काय तर कर्म करताना लक्षपूर्वक करायला हवे. तसेच कर्म करण्याचा हेतूदेखील बघायला हवा. उदाहरण म्हणजे- एखादा चोर, गुंड दुसऱ्याला आपल्या स्वार्थापोटी इजा करतो त्यावेळी ते कर्म शुद्ध नसते. ते पापकर्म ठरते. एखादा शल्यविशारद रोग्याला वाचवण्यासाठी त्याचा हात-पाय कापतो. त्यावेळी हेतू शुद्ध असतो. असले कर्म पाप होत नाही.

हल्ली अनेक संस्था ‘जीवन कसे जगावे’ याबाबत कार्यशाळा ठेवतात. त्यावेळी विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली जाते. चर्चासत्रे होतात. त्यात एक विषय असतो- दिवसाची दिनचर्या. तिथे काही मुद्दे आवर्जून सांगितले जातात.
वेळेचे व्यवस्थापन ः हा विषय अत्यंत महत्त्वाचा तसाच विस्तृत आहे. ज्या व्यक्तीला यश संपादन करायचे असते त्याने जीवनाचा प्रत्येक क्षण सकारात्मक रीतीने वापरला पाहिजे. उगाच व्यर्थ गोष्टीत वेळ वाया न घालवता उपयोगी गोष्टींसाठी वापरायचा असतो. त्यासाठी दिनचर्या व्यवस्थित आखायला हवी. यात एक मुद्दा आवर्जून येतो, तो म्हणजे झोपेचा. किती वेळ अन्‌‍ केव्हा? येथे एक म्हण सर्वांनाच माहीत आहे- ‘लवकर झोपावे, लवकर उठावे.’ त्यामुळे व्यक्ती श्रीमंत, निरोगी व विद्वान होते.

यादृष्टीने विचार केला तर रात्री दहापर्यंत झोपावे. मग केव्हा उठावे हे ठरवण्यासाठी किती तास झोपेची आवश्यकता आहे हे बघायला हवे. त्यासाठीदेखील एक छान म्हण आहे- ‘पुरुषांसाठी सहा तास, महिलांसाठी सात तास व मूर्खांसाठी आठ तास.’
खरे म्हणजे किती तास झोप हवी हे बघण्यापेक्षा झोप कशी असावी यावर जास्त लक्ष द्यायला हवे. झोप शांत असली तर थोडा वेळदेखील चालेल. त्यासाठी मन शांत हवे. अनेक महापुरुष फक्त दोन ते चार तास झोपत असत. पण बहुतेक व्यक्तींना सहा तास शांत झोप पुरेशी असते. म्हणजे सहा वाजता झोपून चार वाजता उठावे.
शास्त्रामध्येदेखील हीच वेळ सांगितली आहे- ब्रह्ममुहूर्त (अमृतवेळा). कारण त्यावेळी सगळी सृष्टी शांत असते. अशावेळी रोजचे सर्व आवश्यक व्यवहार पार पाडल्यानंतर योग करणे फायद्याचे असते. योगसाधनेमध्ये इतर पैलूंबरोबर ध्यान हे अष्टांगयोगामधील अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ती म्हणजे- फक्त डोळे मिटणे म्हणजे ‘ध्यान’ होत नाही. शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळाले नाही तर ते ‘बकध्यान’ होऊ शकते. त्यामुळे वेळ वाया जातो.
योगसाधना करताना आपण ‘योग’ या शब्दाचा अर्थ समजून न घेता कर्मकांडात्मक योग करतो. योग म्हणजे ‘भावपूर्ण जुळणे’ (मीलन). आसनामध्ये शरीराकडे, कपाळभाती व प्राणायाममध्ये श्वासाकडे व ध्यानामध्ये भगवंताकडे जुळणे आवश्यक आहे. तेदेखील भावपूर्ण.
आपण बालपणात व नंतरही म्हणत असलेली प्रार्थना- ‘सदा सर्वदा योग तुझा घडावा।’ लक्षात घेतली (अर्थपूर्ण, भावपूर्ण) तर योगसाधना म्हणजे काय हे सहज लक्षात येईल.

दिनचर्येत दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे दिवसभर आपण करतो ते विचार व काम (कर्म). आपले विचार शक्यतो सकारात्मक हवेत व कर्मदेखील नीतिमत्तेला धरून हवे.
कलियुगाच्या वातावरणामुळे हे असे घडणार, पण सुज्ञाने स्वतःची बुद्धी वापरून दिनचर्येवर लक्ष द्यायला हवे. तसेच आपले विचार, बोल, व्यवहार यांसंदर्भात अत्यंत दक्ष असायला हवे.
आपल्यापुढे अनेक आदर्श आहेत. त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला तर आपले जीवनदेखील सुंदर होईल. ‘जीवन जगावे कसे हे तर समजलेच, पण मरावे कसे हेदेखील समजेल.’
पूर्वज नियमित सांगत असत- ‘मरावे पण कीर्तिरूपे उरावे.’ प्रत्येक क्षेत्रात अशा अनेक व्यक्ती आहेत. त्यांच्या दैनंदिन व संपूर्ण जीवनाचा सूक्ष्म अभ्यास केला व त्यांच्या सद्गुणांचे अनुकरण केले तर आपल्याकडूनही सत्कर्म सहज घडेल. जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन मिळेल.