>> मुख्यमंत्र्यांची माहिती; सांतईनेज भागातील कामांची पाहणी
पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत कामे पावसाळ्यात बंद ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला असून, पावसाळा कालावधीतही मलनिस्सारण वाहिनी, काँक्रिट रस्ता व इतर कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर महिन्यात पून्हा धूळ प्रदूषण व इतर समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.
मुख्यमंत्र्यांनी काल रात्री सांतईनेज-पणजी भागातील स्मार्ट सिटीच्या कामाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
स्मार्ट सिटीची कामे पावसाळ्यात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कंत्राटदारांनी कामे बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. आता, त्यांना कामे सुरू ठेवण्याची सूचना केली आहे. पावसाळ्यात कामे सुरू राहणार असल्याने पाणी साचण्याच्या समस्येवर त्वरित तोडगा काढला जाऊ शकतो. तसेच अपूर्ण गटारांचे काम पूर्ण करण्याची सूचनाही केली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रॉड्रिगीस यांनी काल संध्याकाळी सांतईनेज भागात सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.
पणजीत सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी अंतर्गत कामांना चालना देण्यासाठी संजीत रॉड्रिगीस यांच्याकडे स्मार्ट सिटीच्या कामाचा अतिरिक्त ताबा सुपूर्द करण्यात आला असून, काल त्यांनी या कामांची पाहणी केली. स्मार्ट सिटीच्या कामांना गती देण्यासाठी आराखडे तयार केले जात आहेत. कामे कधी पूर्ण होतील, याची नेमकी तारीख सांगितली जाऊ शकत नाही. कामांच्या बाबतीत मजूरवर्ग, कंत्राटासंबंधी काही समस्या उद्भवत आहेत, त्यावर तोडगा काढून कामांना पुन्हा गती देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती रॉड्रिगीस यांनी दिली.
अतिरिक्त मनुष्यबळाद्वारे
स्मार्ट सिटीच्या कामांना गती
पणजी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांना गती देण्यासाठी अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीचे नवे व्यवस्थापकीय संचालक संजीत रॉड्रिगीस यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.