राजकीय आरक्षणासाठी उद्या गोकुवेधतर्फे मडगावात उपोषण

0
10

अनुसूचित जाती-जमातींना (एससी, एसटी) राजकीय आरक्षण मिळावे या गोकुवेध फेडरेशन व इतर 14 संघटनांतर्फे आपल्या मागण्यांसाठी गुरुवार दि. 25 मे रोजी मडगावातील लोहिया मैदानावर उपोषण करणार आहेत, असे ॲड. जॉन फर्नांडिस यांनी सांगितले. यावेळी रवींद्र वेळीप, रुपेश वेळीप उपस्थित होते. गोव्यातील संघटनांचे नेते, पदाधिकारी, नागरिक, युवक, महिला उपोषणात सहभागी होतील.
दि. 25 मे 2011 रोजी बाळ्ळी येथे उटा आंदोलनावेळी दिलीप वेळीप व मंगेश गावकर हे शहीद झाले होते. त्यांच्या 12 व्या हुतात्मा दिनानिमित्त हे उपोषण आयोजित केले आहे. लोहिया मैदानावर स्मारकाजवळ गुरुवारी दुपारी 3.30 वाजता या दोन्ही शहिदांना आदरांजली वाहिली जाईल.
या आंदोलनात सहभागी झालेले काही नेते सरकारमध्ये आमदार, मंत्री बनले व त्यातही त्यांनी समाधान मानले असून कित्येक मागण्या मंजूर झालेल्या नाहीत. त्या विनाविलंब संमत कराव्यात, अशी मागणी आहे. आपल्या मागण्यांचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सर्व एससी-एसटी बांधवांनी या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.