प्रकल्पांच्या कार्यवाहीसाठी समितीची स्थापना ः राणे

0
6

नगरपालिका संचालकांनी प्रकल्प अंमलबजावणी आणि व्यवस्थापनासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करून घेण्यासाठी कार्यरत राहणार आहे. नगरपालिका संचालनालय आणि जीसुडाच्या समन्वयाने प्रकल्पांच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी नगरपालिकांचे मुख्याधिकारी जबाबदार असतील, अशी माहिती नगरविकासमंत्री विश्वजीत राणे यांनी काल दिली. नगरविकास संचालनालय आणि शहरी विकास मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. निधीच्या योग्य वापरासाठी मुख्याधिकारी जबाबदार राहणार आहेत. त्यांनी नगरपालिकेचे अध्यक्ष आणि नगरसेवकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाची कामे अखंडपणे राबविली पाहिजेत, असेही राणे यांनी म्हटले आहे. वार्षिक लेखापरीक्षण पूर्ण न झाल्यास नगरपालिकेला निधी दिला जाणार नाही, असे परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. नगरविकास संचालनालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांची काटेकोरपणे अंमलबजावणीवर मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष ठेवला पाहिजे, असेही राणे यांनी सांगितले.