जी-20 बैठकीपूर्वी काश्मीरमध्ये दहशतवादी अटकेत

0
9

>> अनेक फुटीरवादी व संशयितांना लष्कराने घेतले ताब्यात

>> आजपासून श्रीनगरमध्ये तीन दिवस बैठक

जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये आज 22 मेपासून जी-20ची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून काल रविवारी एनआयएने जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. कुपवाडा जिल्ह्यातील मोहम्मद उबैद मलिक असे या दहशतवाद्याचे नाव आहे. उबैद हा पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद कमांडरच्या सतत संपर्कात होता. तो भारतीय सैनिक आणि सुरक्षा दलांच्या हालचालींची गुप्त माहिती दहशतवादी संघटनेला देत असल्याचा लष्कराला संशय आहे.

जी-20 ची बैठक शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. भारताने या जी-20 बैठकीच्या सुरक्षेचा विचार करून पाहुण्यांचा गुलमर्ग दौरा रद्द केला. तेथे दहशतवादी काही मोठा कट रचत असल्याची बातमी आली आहे. आता एका दहशतवाद्याच्या अटकेनंतर श्रीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्था कडक
जी-20 बैठकीपूर्वी सुरक्षा सतर्क करण्यात आली आहे. ठिकठिकाणी जवानांची गस्त सुरू आहे. दल सरोवरात मरीन कमांडो तैनात आहेत. जवान रात्रंदिवस सुरक्षा देत आहेत. भारतीय लष्कराचे जवान कोणत्याही प्रकारच्या कारवाईला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत. येथे जी-20 बैठक होणार असल्याने तलावाभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे.
स्फोटके किंवा आयईडी तपासण्यासाठी स्कॅनर आणि स्निफर डॉग तैनात करण्यात आले आहेत. लष्कराचे जवान प्रत्येक कोपऱ्यावर लक्ष ठेवून आहेत.

एलिट एनएसजी आणि मरीन कमांडो कडेकोट बंदोबस्तात श्रीनगरमध्ये तैनात करण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळांच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि निमलष्करी दलाचीही मदत घेतली जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात कोणतीही स्फोटके येऊ नयेत म्हणून शहरातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे.

बैठकीपूर्वी फुटीरतावादी ताब्यात
जी-20 बैठकीपूर्वी काश्मीरच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने संशयित आणि फुटीरतावाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काहींना अटकही करण्यात आली आहे. दुसरीकडे, जी-20 विरोधी प्रचाराचा भाग म्हणून मोठ्या संख्येने काश्मीरमधील लोकांना ब्रिटिश फोन नंबरवरून वारंवार कॉल येत आहेत. अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्यास आणि अशा संशयास्पद कॉलला प्रतिसाद देऊ नका असे सांगितले आहे. श्रीनगरमधील जी-20 कार्यक्रमात व्यत्यय आणण्यासाठी दहशतवादी काही मोठे हल्ले करण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लष्करही आपली रणनीती बदलत अशा हल्ल्यांना तोंड देण्यास सज्ज झाले आहे. या भागात यापूर्वी झालेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये पाच स्पेशल फोर्स कमांडोसह दहा लष्करी जवान शहीद झाले होते.

चीनचा सहभागास नकार
श्रीनगरमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या जी-20 बैठकीत सहभागी होण्यास चीनने नकार दिला आहे. वादग्रस्त भूभागावर कोणत्याही प्रकारच्या जी-20 बैठकीला आपला विरोध असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या या वक्तव्यावर भारताने आक्षेप घेतला आहे. भारताने प्रत्युत्तर देताना आपल्या हद्दीत कुठल्याही भागात बैठक घेण्याचे भारत देशाला स्वातंत्र्य आहे. यापूर्वी मार्चमध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये जी-20 बैठक झाली होती. तेव्हाही चीन या बैठकीत सहभागी झाला नव्हता, त्यानंतर पाकिस्तानने चीनच्या या बहिष्काराचे समर्थन केले होते. तसेच चीन व्यतिरिक्त तुर्की आणि सौदी अरेबियानेही श्रीनगरमध्ये होणाऱ्या जी-20 पर्यटन गटाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी नोंदणी केलेली नाही. नोंदणीची अंतिम तारीख 22 मे आहे. तीन जी-20 सदस्य देशांची अनुपस्थिती ही जी-20 बैठक आयोजित करण्याच्या भारताच्या निर्णयाच्या संदर्भात तीन देशांचे एक धोरणात्मक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. कारण ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील भारताचा हा पहिला मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिली मोठी बैठक होत आहे.