स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जाहीर
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद होत असल्याची घोषणा केल्यानंतर आता स्टेट बँक ऑफ इंडियाने या नोटा बदलण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत नागरिक बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकतात. उद्या मंगळवारी 23 मेपासून नोटा बदलण्याचे काम सुरू होणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 2000 रुपयांच्या नोटा एकावेळी 20 हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलण्याची सुविधा असेल. यासाठी कोणताही फॉर्म किंवा स्लिप भरण्याची गरज नाही. यामुळे नागरिक एकाच वेळी 2000 रुपयांच्या 10 नोटा बदलून घेऊ शकतात. एसबीआयच्या कोणत्याही शाखेत जाऊन कोणताही फॉर्म न भरता किंवा ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा सहज बदलून घेऊ शकता.
बँकेने जारी केलेल्या गाईडलाईन्सनुसार, 2000 रुपयांच्या दहा नोटा बदलताना ग्राहकाला कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राची गरज भासणार नाही. म्हणजेच, नोटा बदलून घेताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यासंदर्भात घोषणा केली. पण या नोटा रद्द केल्यानंतरही त्या लीगल टेंडर असतील, असे आरबीआयने म्हटले. आता 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत नागरिक 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकतात.