अराजक

0
13

पाकिस्तानी लष्कराशी पंगा घेणे इम्रान खानला अखेर महाग पडले आहे. एकीकडे शाहबाज शरीफ सरकार आणि दुसरीकडे लष्कर व आयएसआय या दोघांनाही शिंगावर घेऊ पाहणाऱ्या इम्रानला कह्यात आणण्यासाठी पावले उचलली जातील याची अटकळ होतीच. शरीफ सरकारने इम्रानविरुद्ध दाखल केलेले भ्रष्टाचारापासून दहशतवादापर्यंतचे आणि ईश्वरनिंदेपासून हिंसाचारापर्यंतचे जवळजवळ एकशे चाळीस खटले पाहता त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पाकिस्तानचे विद्यमान सरकार किती उतावीळ आहेत हे कळून चुकते. यापूर्वी दोन वेळा त्याच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सरकारने करून पाहिला, परंतु प्रत्येकवेळी इम्रानने आपल्या समर्थकांच्या पाठबळावर ते प्रयत्न हाणून पाडले. तोषाखाना प्रकरणात लाहोरच्या झमान पार्कमधील त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला तेव्हाही इम्रानच्या पाठिराख्यांनी पोलिसांना त्याच्यापर्यंत पोहोचू दिले नव्हते. कोर्टाची समन्सही तो सतत चुकवत राहिला. पण तो इस्लामाबादेत उच्च न्यायालयात येणार असल्याचे दिसताच थेट न्यायालयात जाऊन काचा फोडून खुर्चीवरून उचलबांगडी करीत फरफटत त्याला अटक करण्यात आली. त्यासाठी यावेळी पोलिसांची नव्हे, तर पाक रेंजर्सची म्हणजे निमलष्करी दलाची मदत घेतली गेली. एखाद्या कुख्यात गुन्हेगाराला पकडून न्यावे तसे अक्षरशः गळा पकडून पाकिस्तानच्या या माजी पंतप्रधानाला फरफटत नेण्यात आल्याची दृश्ये अवघ्या जगाने पाहिली. ही अटक केवळ एका अल कादिर ट्रस्ट गैरव्यवहार प्रकरणात झालेली आहे. पंजाबमधील झेलममध्ये हे विद्यापीठ उभारून त्याच्या आडून अब्जावधीचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा इम्रानवर आरोप आहे, त्यासंदर्भात ही कारवाई असल्याचे भासवले जात असले, तरी प्रत्यक्षात एकेकाळी ज्या लष्कराच्या पाठिंब्यानिशी इम्रान पंतप्रधानपदापर्यंत पोहोचू शकला होता, त्याच लष्कराच्या आणि आयएसआयच्या नेतृत्वाने आता त्याला धडा शिकवायचा चंग बांधला आहे. जनरल कमर जावेद बाजवा याच्याशी इम्रानचे आयएसआय प्रमुखाच्या नेमणुकीवरून बिनसले, तेव्हापासून सुरू झालेल्या संघर्षाला आता उघड तोंड फुटले आहे असे दिसते. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानपदावरून पदच्युत झाल्यापासून इम्रानने आगामी निवडणुकांवर नजर ठेवून जी जोरदार आघाडी उघडली आहे, त्यामध्ये खोडा घालण्यासाठीच त्याला ही अटक झाली आहे. आपल्या जिवाला धोका आहे असे इम्रानला वाटते आणि त्या भीतीत तथ्यही आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याच्या लाहोर ते इस्लामाबाद फ्रीडम मार्चमध्ये त्याच्यावर गोळीबार झाला होता. गोळी झाडणाऱ्याने आपण एकट्यानेच ते कृत्य केल्याचा जबाब जरी दिला असला, तरी आयएसआयपासून आपल्या जिवाला धोका आहे हे इम्रानला पुरेपूर ठाऊक आहे. पण तरीही लष्कराच्या आणि आयएसआयच्या वरिष्ठ नेतृत्वावर शेलकी टीका करायला त्याने मागेपुढे पाहिले नाही. आयएसआयचा महासंचालक नदीम अंजुम याला तर त्याने ‘डर्टी हॅरी’ म्हणून चिडवले. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे नेतृत्व खवळून उठले आहे. निवडणूक आयोगाने इम्रानवर पाच वर्षे निवडणूक लढवायला बंदी घातलेली आहे, पण काहीही करून इम्रानच्या पक्षाला पुन्हा सत्तेपर्यंत पोहोचू द्यायचे नाही असा त्यांनी चंग बांधला आहे. परंतु या अटकेमुळे पाकिस्तानातील राजकारणाची समीकरणे उलटीपालटी होऊ शकतात. त्याच्या पाकिस्तान तेहरीक ई इन्साफचे समर्थक देशभरात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी लक्ष्य केले आहे ते थेट लष्कर आणि आयएसआयला. त्यांनी रावळपिंडीत लष्कर मुख्यालयावरच हल्ला चढवला. कॉर्प्स कमांडरच्या लाहोरच्या घराची मोडतोड केली. आयएसआय मुख्यालयाला लक्ष्य केले. आधीच पाकिस्तानच्या राजकीय नेतृत्वाने देशाला दिवाळखोरीकडे नेले आहे. पाकिस्तानात महागाई 36 टक्क्यांनी वाढली आहे. कर्जावरील व्याजदर 21 टक्क्यांवर गेला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी चाललेली कर्जाबाबतची बोलणी अधांतरी आहेत. एवढे असूनही शाहबाज शरीफ सरकार निवडणुकांना सामोरे जायला तयार नाही. ऑगस्टमध्ये होणाऱ्या निवडणुका लवकर घ्याव्यात म्हणून इम्रानने पंजाब आणि खैबर पख्तुनख्वामधील आपली प्रांतिक सरकारे मुदतपूर्व बरखास्त केली. सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात निवडणुका घ्या असे सांगूनही शरीफ सरकारने ती शिफारस नाकारली आहे. जनतेचा हा सगळा राग इम्रानच्या अटकेचे निमित्त होऊन रस्त्यावर प्रकटताना दिसतो आहे. त्यावर आणीबाणी हाच उपाय उरला आहे. प्रश्न एवढाच आहे. इम्रान या सगळ्यातून तावून सुलाखून पुन्हा पूर्वीसारखीच लोकप्रियता गाठू शकेल? त्याचे ‘नया पाकिस्तान’ त्याच्या पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत साथ देईल?