पणजीतील स्मार्ट सिटीची कामे महिनाभरात पूर्ण होणार : मुख्यमंत्री

0
12

पणजी शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत जी कामे चालू आहेत, ती कामे महिनाभरात पूर्ण केली जातील, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी काल या पार्श्वभूमीवर पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात यांच्यासह विविध खात्यांच्या प्रमुखांसह स्मार्ट सिटीच्या संपूर्ण कामाचा आढावा घेतला. पावसाळा जवळ आल्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत होऊ घातलेली कामे विनाविलंब पूर्ण केली जावीत, यासाठी नागरिकांकडूनही सरकारवर दबाव वाढू लागला आहे.

स्मार्ट सिटीची कामे करण्यासाठी पणजी शहरातील बाजारपेठ परिसरात सर्व ठिकाणी खोदकाम करून ठेवलेले असल्याने व्यापारी, नागरिक, पर्यटक, नोकरदार वर्ग अशा सर्वांची प्रचंड गैरसोय होऊ लागलेली आहे. एकदा पावसाळा सुरू झाला की या खोदकामामुळे अपघात घडण्याची भीतीही लोक व्यक्त करू लागलेले आहेत. अशातच खोदकाम केल्यानंतर बुजलेले रस्ते धसू लागल्याने तोही मोठा चिंतेचा विषय ठरलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम खाते, जलस्रोत खाते, मलनि:स्सारण खाते, वीज खाते आदी विविध खात्यांची कामे पणजी शहरात चालू आहेत. विविध खात्यांची एकत्रित सुरू झालेली ही कामे संथगतीने चालू असल्याने मोठी समस्या निर्माण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी ही कामे महिनाभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सांडपाणी वाहिनीचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नसल्याचे मंत्री नीलेश काब्राल यांनी स्पष्ट केले असून, या पार्श्वभूमीवर सांडपाण्याची जुनी वाहिनीच जोडून रस्त्यांचे काम पूर्ण केले जाईल. मात्र, रस्ते पुन्हा खादावे लागणार असल्याने रस्त्यांचे हॉटमिक्सिंग करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.