साखळी, फोंडा पालिकांवर भाजपचा झेंडा

0
11

>> साखळीत 12 पैकी 11 तर फोंड्यात 15 पैकी 10 उमेदवार विजयी

फोंडा आणि साखळी नगरपालिका निवडणुकीत भाजपने अपेक्षेनुसार यश संपादन प्राप्त केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने साखळी नगरपालिकेमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तर, फोंडा नगरपालिकेत भाजप पुरस्कृत गटाने बहुमत प्राप्त केले आहे. साखळी नगरपालिकेमध्ये भाजप पुरस्कृत एकूण 12 पैकी 11 उमेदवार निवडून आले आहेत. तर, फोंडा नगरपालिकेत एकूण 15 पैकी भाजप पुरस्कृत 10, रायझिंग फोंडा पुरस्कृत 4 आणि अपक्ष 1 उमेदवार निवडून आला आहे. फोंड्यात भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

फोंडा नगरपालिकेच्या अनेक प्रभागांत चुरशीच्या लढती झाल्या. भाजपचे नेते, फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी नगरपालिका मंडळावर वर्चस्व राखण्यात यश प्राप्त केले आहे. भाजप पुरस्कृत गटाचे एकूण 10 उमेदवार निवडून आले आहेत. त्यात मंत्री नाईक विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक आणि रॉय नाईक हे दोन्ही पुत्र निवडून आले आहेत. फोंडा नगरपालिकेत सात नवीन चेहरे निवडून आले आहेत. केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखालील रायझिंग फोंडा गटाचे 4 उमेदवार निवडून आले आहेत. तर, विद्यमान नगरसेवक व्हिसेंट पॉल फर्नांडिस यांचा पराभव झाला. काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर यांनी पुरस्कृत केलेल्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

दीपा कोलवेकर 1 मताने विजयी
माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्या पत्नी दीपा कोलवेकर प्रभाग 10 मधून केवळ एका मताने विजयी झाली आहे. त्यांना 391 मते मिळाली. तर, प्रतिस्पर्धी मनस्वी मामलेकर यांना 390 मते मिळाली.

ॲड. प्रतीक्षा नाईक तरुण नगरसेविका
फोंडा नगरपालिका निवडणुकीत तीन माजी नगराध्यक्षांनी आपल्या कन्यांना निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यातील माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्या कन्या ॲड. प्रतीक्षा नाईक प्रभाग 8 मध्ये विजयी झाल्या आहेत. ॲड. प्रतीक्षा नाईक सर्वांत तरुण नगरसेवक ठरल्या आहेत. विद्यमान नगरसेविका गीताली तळावलीकर आणि राजेश तळावलीकर हे जोडपे निवडणूक रिंगणात उतरले होते. प्रभाग 15 मधून गिताली तळावलीकर विजयी झाल्या आहेत. तर, प्रभाग 2 मध्ये राजेश तळावलीकर यांनी पराभव स्वीकारावा लागला.

दीर – भावजय लढत
प्रभाग 5 मध्ये माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक व्यंकटेश नाईक आणि नगरसेविका चंद्रकला नाईक या दीर आणि भावजय यांच्यात लढत झाली. व्यंकटेश नाईक यांनी 471 मते मिळवून विजय संपादन केला. भावजय चंद्रकला नाईक यांना केवळ 11 मते मिळाली.
प्रभाग 14 मध्ये आनंद पांडुरंग नाईक यांनी सर्वाधिक 74.18 टक्के मते मिळवून विजय प्राप्त केला आहे. आनंद नाईक सलग दुसऱ्यांदा नगरपालिकेवर निवडून आले आहेत. प्रभाग 2 मध्ये वीरेंद्र ढवळीकर यांनी 67.96 टक्के मते मिळविली आहे. तर, प्रभाग 6 मध्ये शौनक बोरकर यांनी 61.54 टक्के मिळवून विजय मिळविला आहे. शौनक बोरकर प्रथमच नगरपालिका मंडळावर निवडून आले आहेत.

चिठ्ठीद्वारे प्रभाग 15 चा निकाल
फोंडा नगरपालिकेच्या प्रभाग 15 मध्ये गीताली तळावलीकर आणि संपदा नाईक यांना समान 402 मते मिळाली. फेरमतमोजणीमध्ये मतामध्ये कोणताही फरक झाला नाही. अखेर चिठ्ठीद्वारे गिताली तळावलीकर यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. गीताली तळावलीकर सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.

साखळीत भाजपचे निर्विवाद वर्चस्व

साखळी पालिका निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत बारापैकी अकरा जागा जिंकून वेगळा करिष्मा सिद्ध केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आखलेले डावपेच, रणनीती, त्यांना उमेदवार व कार्यकर्त्यांची मिळालेली साथ यामुळे भाजपने भव्य यश संपादन केले आहे.
या विजयामुळे साखळी शहरात भाजप अधिक भक्कम झाला असून भाजपचे अकरा नगसरसेवक विजयी झाले आहेत.
टूगेदर फॉर साखळीतर्फे प्रभाग पाचमधून प्रवीण ब्लॅगन (बिनविरोध) हे एकमेव उमेदवार विजयी झाले.

निर्विवाद वर्चस्व ः सुलक्षणा सावंत
साखळी पालिका निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. सावंत, सर्व कार्यकर्ते, मतदार यांनी भाजपला मोठे सहकार्य देताना अभूतपूर्व यश लाभल्याची माहिती भाजप महिला नेत्या सुलक्षणा सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. आम्ही योग्य पद्धतीने प्रचार केला व सर्व उमेदवार, मतदार यांची साथ मिळाली त्यामुळे हे यश मिळाल्याचे सांगून त्यांनी सर्वच घटकांचे अभिनंदन केले.
मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी आम्हाला हा विजय अपेक्षित होता. मुख्यमंत्र्यांनी योग्य पद्धतीने रचना आखली त्याला सर्वानी साथ दिली त्यामुळे हे यश लाभले असल्याचे सांगितले.

सर्व विजयी उमेदवारांचे भाजप महिला नेत्या सुलक्षणा सावंत, मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वडील पांडुरंग सावंत तसेच मोठ्या संख्येने उपस्थिती लावलेल्या कार्यकर्त्यांनी विशेष अभिनंदन केले.

पराभव मान्य ः सगलानी
टूगेदर फॉर साखळीचे धर्मेश सगलानी यांनी जनतेने दिलेला कौल मान्य असून जनतेपर्यंत पोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे आम्ही जनतेच्या मताचा आदर करीत असल्याचे सांगितले.
जनतेने तसेच मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आम्हाला पाठिंबा दिला. विकासाला साथ दिली. त्यामुळे हे मोठे यश लाभल्याचे रश्मी देसाई यांनी सांगितले. तर सिद्धी परब यांनी डॉ. प्रमोद सावंत, सौ. सावंत यांनी तसेच आमचे सर्व कार्यकर्ते, मतदार यांनी सुरवातीपासून विश्वास दाखवला. त्याचे सार्थक झाल्याचे सांगितले.

रश्मी देसाईं यांचा सगलानींना धक्का
रश्मी देसाई यांनी साखळीचे माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांचा पराभव करून मोठे यश प्राप्त करताना सगलानी यांना मोठा धक्का दिला. सगलानी यांना 334 मते मिळाली. प्रभाग एकमधून नगरसेवक यशवंत माडकर यांनी कुंदा माडकर यांचा पराभव केला. प्रभाग तीनमधून सिद्धी परब यांनी माजी नगराध्यक्ष सुनिता वेरेकऱ यांचा पराभव केला. सत्तर वर्षीय विनंती विनायक पार्सेकर यांनी प्रभाग सहामधून मोठा विजय संपादन करताना डॉ. सरोज देसाई यांचा 210 मतांनी पराभव केला.