दातृत्व

0
84
  • प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

दातृत्वाला सीमा आणि मर्यादा नसते. कोणत्या थरापर्यंत दातृत्व जाईल याचा नेम नसतो. सर्वस्वाच्या त्यागाची भावना येथे अधोरेखित होत असते. स्वतःचे हित पाहून दातृत्व होत नाही तर स्वतःचा त्यागच दातृत्वामध्ये सामावलेला असतो.

‘दातृत्व’ हा फारच थोर गुण आहे. निसर्गाने आपल्याला किती-किती मुक्तपणे दिले आहे. ‘हे माझे- ते माझे’ म्हणून आपण माणसेच आपापसात भांडत आहोत. खरे म्हणजे काहीच कोणाचे नाही. सगळी सृष्टी परमेश्वराची आहे.
काही माणसांना जन्मजातच फार मोठी इस्टेट मिळते. श्रीमंत घराण्यात जन्म झाल्यामुळे वारसारूपाने त्या भव्य इस्टेटीची मालकी काहीजणांना मिळते, तर काहीजणांना आपल्या कष्टांनी व युक्तीनी फार मोठी मालमत्ता प्राप्त होते. नशिबाने व दैवगतीनेदेखील काहीजण करोडपती बनतात. कितीही जरी आपल्याकडे चालून आले तरी सगळेच आपण आपल्यासाठी ठेवावे का, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.
काहीजण आपल्या पुढे येणाऱ्या दहा पिढ्यांचा विचार करतात आणि त्यांच्यासाठी धन साठवून ठेवतात. हे सामाजिकदृष्ट्या योग्य आहे का? आपल्या स्वार्थी वृत्तीने एकंदर समाजाचे आपण नुकसानच करतो आहोत अशी खंत येथे प्रकट होत नाही का?
आपला भारत देश विशाल आहे आणि तेवढीच विशाल आपली संस्कृती आहे. कित्येक राजे-महाराजे या देशात दानशूर, दातृत्वगुणी व उदार मनोवृत्तीचे निर्माण झाले.

शिबी राजाच्या औदार्याची इंद्रदेवाने परीक्षा घेतली. स्वतः ससाणा पक्ष्याचे रूप घेऊन तो कबुतराच्या मागे लागला. ते कबुतर आश्रयासाठी शिबी राजाकडे आले. शिबी राजाने आपल्या उदार मानसिकतेतून त्याला आश्रय दिला. ससाणा पक्षी शिबी राजाशी भांडायला लागला व म्हणाला ः
“जर कबुतर तुला द्यायचे नाही तर हे राजा, कबुतराच्या वजनाएवढे मांस तुझ्या जांघेचे मला कापून दे!”
ससाणा पक्ष्याची आज्ञा स्वीकारून लगेच सुऱ्याने आपले मांस कापून तराजूत कबुतरासह तोलून शिबी राजाने ससाणा पक्ष्याला दिले. येथे शिबी राजाच्या दातृत्वाची वाखाणणी कोणत्या बरं शब्दात करावी?
राजा हरिश्चंद्राने आपल्या स्वप्नातील दृष्टांतानुसार संपूर्ण राज्य व संपूर्ण संपत्ती दान केली आणि स्वतःचे पोट भरण्यासाठी स्मशानात प्रेते जाळण्याचे कठीण काम त्याने स्वीकारले. या त्यागामागची समर्पणभावना तपासून बघा. या दातृत्वाचा महिमा किती सर्वश्रेष्ठ आहे तो पहा!
बळी राजाकडे बटू वामनाने तीन पावले जमीन मागितली आणि बळी राजाने ‘हो’ म्हटले. वचन मिळाल्यावर बटू वामनाने आपले खरे रूप प्रकट केले. पहिल्या पावलाने त्याने सगळी जमीन व्यापली, दुसऱ्या पावलाने सगळे विश्व व्यापले आणि आता तिसरे पाऊल कुठे ठेवावे असे विचारल्यावर बळी राजाने आपल्याच डोक्यावर ठेवायला सांगितले व स्वतः पाताळात जाणे पसंद केले. या दातृत्वाला दुसरी तुलनाच नाही असेच म्हणावे लागेल.

प्रभू रामचंद्राचे दातृत्व किती महान ते बघा. सावत्र आईला वडिलांनी दिलेल्या वचनपूर्तीसाठी राज्य- सिंहासनाचा अधिकारी असूनदेखील स्वतः सगळा त्याग करून त्याने चौदा वर्षे वनवास स्वेच्छेने पत्करला.
महारथी कर्णाच्या दातृत्वाला दुसरी उपमाच नाही. इंद्रदेव त्याच्याकडे कवच-कुंडले मागायला आला. स्वतः कर्ण त्यावेळी संकटात होता. आत्मरक्षणासाठी त्याला कवच-कुंडलांची गरज होती. तरीदेखील त्याने स्वतःचा विचार न करता अतिशय उदार मनाने शरीराची कवच-कुंडले त्याला काढून दिली. नंतर कर्णाचा अर्जुनाशी लढताना पराभव तर झालाच, पण दुःखद देहान्तदेखील झाला.
दातृत्वाला सीमा आणि मर्यादा नसते. कोणत्या थरापर्यंत दातृत्व जाईल याचा नेम नसतो. सर्वस्वाच्या त्यागाची भावना येथे अधोरेखित होत असते. स्वतःचे हित पाहून दातृत्व होत नाही तर स्वतःचा त्यागच दातृत्वामध्ये सामावलेला असतो.