उन्हाळ्यातील त्रासांपासून सुटका कशी कराल?

0
40
  • डॉ. मनाली महेश पवार

उन्हाळा तीव्र होऊ लागला आहे. उन्हाच्या झळा व ज्वाला शरीर व मनावरही उमटू लागल्या आहेत. घरात व बाहेरही झळ बसायला लागली आहे. पाणी प्यालो तरी तहान-तहान व आंघोळ केली तरी घामच घाम. सध्या सुट्ट्या आहेत म्हणून उन्हाळा आवडतो, पण तो आजारही तेवढेच वाढवतो!

उन्हाळा तीव्र होऊ लागला आहे. उन्हाच्या झळा व ज्वाला शरीर व मनावर उमटू लागल्या आहेत. घरात व बाहेरही झळ बसायला लागली आहे. अंगावर टाकलेले आंघोळीचे थंड पाणीही गरम होऊन खाली पडायला लागले आहे. नळालाही कडकडीत गरम पाणी येऊ लागले आहे. पाणी प्यालो तरी तहान-तहान व आंघोळ केली तरी घामच घाम. शाळांना सुट्ट्या पडतात म्हणून उन्हाळा आवडतो, पण तो आजारही तेवढेच वाढवतो.
सूर्याच्या प्रखर उष्णतेमुळे स्निग्ध गुण नाहीसा होतो व रूक्षता वाढू लागते. यात बाह्य वातावरणातील वाढलेल्या रूक्षतेचा परिणाम होऊन शरीरामध्ये वातदोषाचा संचय होऊ लागलो. या ऋतूत फार घाम येतो. सर्व रोगरंध्रे मोकळी होतात. त्वचेवाटे शरीरातील उष्मा बाहेर पडत असतो. त्यामुळे या ऋतूत ‘अग्निमांद्य’ निर्माण होते.
अग्निमांद्य, पचनशक्ती कमी होणे, मलावरोध, मूळव्याध, तोंड येणे व थकवा यासारखी लक्षणे म्हणा किंवा आजार उन्हाळ्यात उत्पन्न होतात. यासाठी उन्हाळ्यातील आहार हलका-फुलका असावा. अग्नीवर ताण देऊ नये. पचायला हलका असा आहार घ्यावा. म्हणूनच पूर्वी उन्हाळा आला म्हणजे भाताची पेज, नाचणीचे आंबील, मुगाचे कढण, कुळिथाची पिठी, तोंडी लावण्याला कैरीची फोड, चटण्या, पालेभाज्या, काकडीची कोशिंबीर, दही, ताक, लस्सी व माठातील गार पाणी असा आहार असायचा. आणि आता तर उष्मा पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढला आहे. पूर्वी विहार म्हटला तर त्याचेही एक वेगळे व्यवस्थापन असायचे. कामे उन्ह लागायच्या अगोदर खूप लवकर उठून आटोपून घ्यायची. ऊन लागू नये म्हणून डोक्यावर फडकं किंवा छत्रीने स्वतःचे संरक्षण करायचे. सकाळी सूर्यनमस्कार किंवा बैठकांसारखे शरीराला पुरेसे व्यायाम व्हायचे व रात्री चांदण्यात बसणे, बाहेरच अंगणात झोपणे असा साधारण क्रम होता. आज मात्र चित्र वेगळे आहे. ऑफिस आणि घरात ‘एसी’- म्हणजे कृत्रिम थंडपणा. चालणं नाही, फिरणं नाही. सगळ्याच कामाकरिता चारचाकी. गरज नसतानाही ‘जीम’चा व्यायाम. खाण्यामध्ये तर फास्टफूड, जंकफूड, आइस्क्रीम, सॉफ्टड्रिंक्स, मसालेदार चटपटीत पदार्थ, तळलेले पदार्थ, त्याचबरोबर अनियमित, अप्रमाणात खाणे म्हणजेच अग्निमांद्याला पूरक असे वातावरण निर्माण करणे. म्हणूनच या काळात पचनशक्ती बिघडू नये म्हणून पूर्वीसारखेच आहाराचे सेवन आपण का करू नये?

  • थकवा घालवण्यासाठी आहारामध्ये फळांचा रस किंवा फळांचा अवलंब करावा. या ऋतूत कलिंगड, द्राक्षे, संत्री, डाळिंब, खरबूज, केळी इत्यादी फळे विपुल प्रमाणात बाजारात येतात. त्याचप्रमाणे फळांचा राजा आंबाही पिकतो. आंबा खाताना नेहमी लक्षात ठेवावे, आंबा खायच्या अगोदर साधारण अर्धा तास तो थंड पाण्यात भिजवून ठेवावा म्हणजे तो उष्ण होऊन बाधत नाही.
  • रानमेवा, जांभूळ, फणस हेदेखील या ऋतूचे आकर्षण असते. त्यामुळे आपल्याकडे उत्पन्न होणारी, पिकणारी फळेच त्या-त्या ऋतूत खावीत.
  • मूळव्याधाचा त्रास संभवतो, म्हणून आहारात जास्त प्रमाणात लोणी-तुपाचा समावेश करावा.
  • हिंग्वाण्टकसारख्या चूर्णाचे तूप व भाताबरोबर सेवन करावे. लवणभास्कर चूर्णही मलावरोधामध्ये उपयुक्त ठरते.
  • मृदुविरेचनासाठी आमलकी चूर्ण, आगग्वध मगज, अविपत्तिकर चूर्णासारख्या औषधी द्रव्यांचा वैद्याच्या सल्ल्यानेच उपयोग करावा.
  • आहारामध्ये आमपाचनासाठी लाजामण्ड सर्वोत्तम आहे.
  • उन्हाळ्यात दुसरा त्रास जो वारंवार जाणवतो तो म्हणजे अंगाची लाही होणे, हातापायांची आग होणे, डोळ्यांची जळजळ होणे इत्यादी पित्तज व्याधीही जाणवतात. म्हणूनच या ऋतूत साबणाऐवजी उटण्याचा वापर करावा. शरीराला शीतलता देणारे चंदन, ज्येष्ठमध, वाळा, मंजिष्ठा इत्यादी शीतद्रव्यांनी तयार केलेले उटणे अंगाला लावावे.
  • कलिंगडाच्या सालीचा आत असणारा पांढरा गर अंगावर लावण्याने उपयोग होतो.
  • सकाळ-संध्याकाळ अर्धी वाटी दूर्वांचा रस घेण्यानेही फायदा होतो.
  • मेंदीची पाने वाटून तयार केलेला लेप तळपाय व तळहातावर लावण्यानेही आग कमी होते. उन्हाळ्यात हाता-पायांची आग होणे ही मोठ्या प्रमाणावर आढळणारी तक्रार आहे. यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे पादाभ्यंग करणे. आठवड्यातून दोन-तीन वेळा पादाभ्यंग करण्याने उष्णता कमी होते.
  • दूर्वांच्या हिरवळीवर सकाळ-संध्याकाळ अनवाणी पायांनी चालण्याने तळपायांचा दाह, पर्यायाने सर्वांगाचा दाह कमी होण्यास मदत होते.
  • उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होणे ही स्वाभाविक बाब. झोपण्यापूर्वी बंद डोळ्यांवर गुलाबजलाच्या घड्या ठेवण्याने किंवा थंड दुधाच्या घड्या ठेवण्याने उपयोग होतो. किंवा कापलेल्या बटाट्याचे काप, काकडीचे काप डोळ्यांवर ठेवण्यानेही आराम मिळतो. तसेच कोरफडीचा गर बंद डोळ्यांवर ठेवण्यानेही डोळ्यांची आग, लालसरपणा वगैरे त्रास कमी होण्यास मदत होते.
  • त्याचबरोबर आहारावर शतावरी सिद्ध दूध प्यावे. मोरावळा, गुलकंद अशा पित्तशामक द्रव्यांचे सेवन करावे.
  • उन्हाळ्यात सहजतेने लहान मुलांमध्ये आढळणारे लक्षण म्हणजे नाकाचा घोळणा फुटून नाकातून रक्त येणे. उन्हाळ्याची उष्णता बाधल्याने नाकाचा घोळणा फुटून नाकातून रक्त येऊ शकते. डोक्यावर थंड पाणी लावणे, शक्य असल्यास आवळ्याचे चूर्ण व पाणी एकत्र करून तयार केलेला लेप गळूवर लावणे यामुळे रक्त थांबण्यास मदत होते.
  • वारंवार त्रास होत असल्यास अडुळशाच्या पानांच्या रसात (रस अर्धा ते एक चमचा) खडीसाखर घालून ते रोज प्यावे. रात्री झोपण्यापूर्वी साजूक तुपाचे नाकात दोन-तीन थेंब टाकावे. याने उपशय मिळतो.
  • घामोळे येणे, घामाचा चिकचिकाट, शरीरावर गळवे उठणे इत्यादी लक्षणे उन्हाळ्यामध्ये हमखास दिसतात. या लक्षणांपासून उपयश मिळण्यासाठी स्नानावेळी मसुरीचे पीठ व अनंतमूळ, चंदन वगैरे शीतल द्रव्यांपासून बनविलेले उटणे लावावे. घामोळे आल्यास त्यावर चंदनाचा गंध लावण्याने आराम मिळतो. वाळा, धणे व नागरमोथा यांच्या चूर्णाचा थंड पाण्यात लेप करण्याने किंवा जांभळाची बी उगाळून लावण्यानेही घामोळी कमी होतात.

उन्हाळ्यात घाम येण्याचे प्रमाण वाढणे साहजिक असले तरी कपडे ओले होतील इतका घाम येतो. घामाला एकप्रकारचा तीक्ष्ण वास येतो. हे टाळण्यासाठी स्नानाच्या वेळी कुळथाचे पीठ, वाळा, अनंतमूळ, नागरमोथा वगैरे द्रव्यांपासून तयार केलेले उटणे लावण्याने फायदा होतो.

  • उन्हाळ्यात नेमके आंबे येतात व त्यावर ताव मारल्यास गळवे शरीरावर होत राहतात. ही गळवे चोळली वा फोडली तर अधिकच चिडचिड होते. त्यामुळे थंड पाण्याने स्नान करावे. पित्तशामक असाच आहार घ्यावा. अनंत कल्प, शतावरी कल्प इत्यादी औषधी द्रव्ये घ्यावीत.
  • ‘उन्हाळ्या लागणे’ हा त्रास जवळपास सगळ्यांनाच जाणवतो. ‘उन्हाळ्या लागणे’ म्हणजे लघवीला जळजळ होणे, लघवी थेंब-थेंब होणे, लघवीला होताना त्रास होणे. पुरेशा प्रमाणात पाणी न पिण्याने उन्हाळ्या लागण्याची प्रवृत्ती तयार होते.
  • यावर सकाळ-संध्याकाळ साळीच्या लाह्यांचे पाणी किंवा धणे-जिऱ्याचे पाणी प्यावे. अधूनमधून शहाळ्याचेही पाणी प्यावे. धणे, जिरे, अनंतमूळ प्रत्येकी पाव-पाव चमचा रात्रभर कपभर पाण्यात भिजत घालून सकाळी गाळून घेऊन ते प्यावे.
  • भिजत घातलेली एक-दोन अंजिरे, मूठभर काळ्या मनुका रोज सेवन कराव्यात.
  • उन्हाळ्यात शरीरातील जलांश कमी होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. यामुळेच उन्हाळ्यात सरबत पिण्याची पद्धत असते. त्यामुळे लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, उसाचा रस, कैरीचे पन्हे इत्यादी पेये सेवन करावीत.
  • जास्तच उन्हाळ्या लागल्यावर वरुणादी काढा, गोखरूचा काढा, पळसाच्या फुलांचा काढा, पुनर्नव्याचा काढा इत्यादी वैद्याच्या सल्ल्याने घ्यावे.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उन्हामुळे त्वचा काळवंडते. त्याकरिता उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्यायला हवी. या ऋतूतील निष्काळजीपणामुळे त्वचेचे नुकसान होते. त्वचेचे सौंदर्य उन्हाळ्यातही उत्तम राखण्यासाठी काही गोष्टी नियमित केल्या तर उन्हाळ्यातही त्वचा उत्तम राहू शकते.
  • सनस्क्रीनचा वापर करा. सनस्क्रीन लोशन वापरताना त्याचा एसपीएफ क्रमांक पाहणे खूप महत्त्वाचे आहे. उन्हात बाहेर पडण्यापूर्वी चेहरा, मान, हात आणि शरीराचा जो भाग उघडा राहात असेल तिथे एसपीएफ आणि पीए हे घटक असणारे सनस्क्रीन लावावे.
  • कामाचे स्वरूप फिरतीचे असेल तर उन्हातान्हात फिरताना सुती किंवा शिफॉनचे लांब हाताचे कपडे वापरावे. तसेच डोक्याला रुमाल, टोपी आणि हातमोजेही घालावेत.
  • उन्हाळ्यात वॉटरप्रूफ मेकअप करावा. मिनरल पावडरही कायम आपल्या सोबत ठेवावी.
  • केसांना हेअर प्रायमर किंवा सीरम लावावे.
  • तसेच उघड्या त्वचेवर सन प्रोटेक्शन फॅक्टर असलेला सनस्क्रीम स्प्रे वापरावा.