केरी पेडणे येथे काल रविवारी 23 रोजी 23 जणांचा एक गट समुद्र किनारी फिरण्यासाठी आला होता. त्यातील चौघेजण सेल्फी काढत असताना समुद्राच्या लाटांत वाहून गेले. वाहून गेलेल्यांमधील दोघांचे मृतदेह सापडेल असून दोघेजण बेपत्ता आहेत. वाहून गेलेल्यांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे. बार्देश तालुक्यातील कांदोळी व म्हापसा येथून हा 23 जणांचा गट केरी येथे आला होता.
केरी समुद्रात बुडालेल्यांमधील सबिना खातोब (20) आणि बाकीर अली (24) या दोघांचे मृतदेह सापडेल आहेत. तसेच बुडालेल्या अजून दोघांचा काहीही पत्ता लागलेला नाही. या ठिकाणी बेपत्ता झालेल्यांचा पथकाद्वारे शोध सुरू आहे परंतु शोधकामात अडचणी येत असल्यामुळे शोधमोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या 23 जणांच्या गटातील चौघेजण सेल्फी काढत असताना लाट आल्यामुळे आणि जोरदार वारा वहात असल्यामुळे चौघेही लाटेबरोबर पाण्यात वाहून गेले. त्यांना वाचवण्यासाठी वासिफ खातोब या मुलाने पाण्यात उडी घेतली. मात्र त्यांना वाचवण्यात तो अपयशी ठरला. वासिम मात्र पाण्याबाहेर सुखरूप आला.
सदर घटना घडल्याचे समजल्यावर पेडणे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत, मोप पोलीस निरीक्षक निनाद देऊळकर, जीवरक्षक आदी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी शोधकार्य सुरू केले. शोधकार्यात दोन मृतदेह सापडेल असून दोघेजण बेपत्ता आहेत. रात्री उशिरापर्यंत सर्व अधिकारी तेथे ठाण मांडून होते.