- रमेश सावईकर
‘अक्षय तृतीया’ हा एक महत्त्वाचा हिंदू व जैन धर्मीय लोकांचा सण असून तो वसंतोत्सव म्हणून साजरा होतो. वैशाख शुद्ध तृतीया ही तिथी अत्यंत शुभ असून, हिंदू धर्मात वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी ती एक आहे. यश, वैभव आणि संपन्नता यांची वृद्धी होणारी ही तिथी आहे. वैशाख महिन्यातील ती शुक्ल पक्षातली तिसरी तिथी अत्यंत शुभ मानली गेली असून तो महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो.
‘अक्षय तृतीया’ हा एक महत्त्वाचा हिंदू व जैन धर्मीय लोकांचा सण असून तो ‘वसंतोत्सव’ म्हणून साजरा होतो. वैशाख शुद्ध तृतीया ही तिथी अत्यंत शुभ असून, हिंदू धर्मात वर्षातल्या साडेतीन मुहूर्तांपैकी तो एक आहे. ‘अक्षय’ या संस्कृत शब्दाचा अर्थ कधीही क्षय होत नाही, म्हणजेच नाश पावत नाही असा आहे. कृता व त्रेता युगाची सुरुवात झाली तो दिवसही ‘अक्षय तृतीया’ होता. ‘अख्ती’ किंवा ‘आखा तीज’ या नावानेही त्या तिथीला संबोधले जाते. यश, वैभव आणि संपन्नता यांची वृद्धी होणारी ही तिथी असून हिंदू व जैन धर्मांत वसंत ऋतूत येणाऱ्या वैशाख महिन्यातील ती शुक्ल पक्षातली तिसरी तिथी अत्यंत शुभ मानली गेली असून तो महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो.
वधू-वरांचे लग्न करण्यास, नवीन व्यापार, उद्योग किंवा नवीन संकल्पीत योजनेचा शुभारंभ अक्षय तृतीयेला करणे अत्यंत शुभफलदायी मानले जाते. या दिवशी परशुराम जयंती तीर्थक्षेत्री तसेच परशुरामाच्या मंदिरात विविध धार्मिक विधी व कार्यक्रमांसह भारतातील ओडिशा, केरळ, गोवा आदी राज्ये व नेपाळ देशात साजरी केली जाते.
या दिवशी भगवान शिव, विष्णू यांची पूजा तसेच आपल्या मृत झालेल्या जवळच्या जिवलग पूर्वजांचे श्राद्ध विशेष धार्मिक विधीसह करून त्यांचे स्मरण करण्याची प्रथा हिंदू धर्मीयांत रूढ आहे. ब्राह्मणांना पवित्र जलाने भरलेला ‘कुंभ’ (कलश) दान करणे, भोजन घालणे व गरिबांना अन्नदान करणे या बाबींना अधिक महत्त्व आहे.
शेतकरी लोक रब्बी पिकासाठी नांगरणी करून बी पेरतात. चांगले पीक प्राप्त व्हावे म्हणून शेतीकामांचा शुभारंभ अक्षय तृतीयेला करून हा दिवस ‘वसंतोत्सव’ म्हणून साजरा करतात. चैत्र महिन्यातील ‘गौरी हळदी-कुंकू’ची सुरुवात हिंदू महिला करतात. त्याची सांगता अक्षय तृतीयेला होते. महिलांना हळदी-कुंकू वाहणे, नवीन संवत्सरारंभी उत्पन्न झालेली फळे (काजूगर, फणस, आंबा), हरभरा डाळीपासून बनवलेली ‘पचडी’, कोकम सरबत किंवा कच्च्या कैरीचे ‘पन्हे’ पिण्यासाठी देणे हे या हळदी-कुंकू समारंभाचे एक वैशिष्ट्य आहे.
महिला परमेश्वराकडे आपल्या पतीसाठी प्रार्थना करून त्याच्यासह कुटुंबीयांचे कल्याण व्हावे अशी प्रार्थना करतात. अक्षय तृतीया सोमवार दिवशी आली तर ती अधिक शुभ मानली जाते. ‘अक्षय तृतीया’ ही अत्यंत शुभ व कल्याणफलित मानली असून या तिथीशी बऱ्याच पुरातन, ऐतिहासिक, वेदकालीन व नंतरच्या घटनांचा संबंध-संदर्भ जोडला गेलेला आहे.
वेदकालीन कथेनुसार व्यास ऋषींनी श्रीगणेशाला ‘महाभारत’ लिहून घेण्याची सूचना करून संपूर्ण ‘महाभारत’ त्यांना कथन केले, अशी आख्यायिका असून आजही मूळ व्यासरचित ‘महाभारत’ म्हणून त्याचे महत्त्व अधिक आहे.
परशुराम हा भगवान विष्णूचा सहावा अवतार मानला गेला आहे. वैष्णवांच्या मंदिरात परशुराम जयंती मोठ्या श्रद्धा-भावाने आजही साजरी केली जाते. समुद्रदेवाने परशुरामाला वरदान दिले की अरबी समुद्राच्या दिशेने भाला फेकून जेवढ्या भागापर्यंत ‘भाला’ पोचेल तिथपर्यंत समुद्र आटून निर्माण झालेली भूमी तुला दिली जाईल. त्यानुसार परशुरामाला केरळ, कानरा किनारपट्टी, कोंकण-गोवा भूमी असा भाग मिळाला.
इ.स. 1300-1400 च्या काळात नाथ संप्रदायाचा उदय झाला. परशुरामाने वैष्णव पंथीय व नाथ पंथीय भक्तलोकांंमध्ये समन्वय घडवून आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. या पार्श्वभूमीवर आजही वैष्णवांची जिथे मंदिरे आहेत तिथे परशुराम जयंती साजरी होते.
केरळ, पैंगीण (गोवा) व चिपळूण (महाराष्ट्र) या ठिकाणची परशुराम मंदिरे तीर्थक्षेत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत.
‘छोटा चार धाम’ यात्रेच्या वेळी हिमालयीन प्रदेशात बर्फामुळे बंद असलेली ‘गंगोत्री’ व ‘यमुनोत्री’ ही मंदिरे उघडली जातात, तो दिवसही अक्षय तृतीयेचा. याच तिथीला गंगा पृथ्वीवर अवतरली व तिची गंगा नदी झाली. भगवान श्रीकृष्णाचा बालपणीपासूनचा परमभक्त सुदामा याने द्वारकापुरी जाऊन श्रीकृष्णाची भेट घेऊन त्यास ‘मूठभर पोहे’ दिले, तो क्षणही अक्षय तृतीया दिनीचा होता. सुदामाला अमर्याद अशी संपत्ती प्राप्त झाली. ‘संपत्ती’चा देव म्हणून कुबेराची नियुक्तीही याच तिथीला झाली. या सर्व वेद, ऋषी-मुनी कालीन व महाभारत तसेच इ.स. 1400 च्या काळात घडलेल्या घटनांचा संबंध अक्षय तृतीयेशी येतो. म्हणून हा दिवस अत्यंत शुभ फलदायी, संपत्ती वर्धन करणारा, कल्याण-हितकारी मानला जातो आणि संवत्सरातील एक महत्त्वाचा सण म्हणून हिंदू व जैन लोक साजरा करतात.
ओडिशा राज्यामध्ये ‘अक्षय तृतीया’ हा शेतकरी वर्गाचा एक महत्त्वपूर्ण उत्सव- आनंदोत्सव- म्हणून मानला जातो. त्या दिवशी शेतकरी गाई-म्हशी, बैल व शैती-अवजारांची पूजा करतात. देवाला नैवेद्य अर्पण करतात आणि रब्बी हंगामाच्या भातभेरणी कामास प्रारंभ करतात.
जैन धर्मीय लोक- विशेषतः आंध्र व तेलंगणा- आपल्या धर्माचे आद्य संस्थापक ‘पहिले तीर्थनकार’ यांचे स्मरण करून वर्षाची समाप्ती झाल्याप्रीत्यर्थ उसाचा रस ग्रहण करून दिनभराचा उपवास सोडतात. पलिताना (गुजरात) येथे होणाऱ्या तीर्थयात्रेला जाणारे जैन भक्तगण उसाचा रस पिऊन एका वर्षाच्या उपवास व्रताची सांगता करतात. त्याला ‘वर्ष-तपा’ असे म्हटले जाते.
‘अक्षय तृतीया’ ही शुभ तिथी (वैशाख शुद्ध तृतीया) हिंदू व जैन धर्मीयांत विविध घटनांशी संबंधित असल्याने अत्यंत शुभ, कल्याणप्रद, हितावह, संपत्ती वर्धिनी मानली गेली असून वर्षातील एक महत्त्वाचा सण म्हणून ती साजरी करतात.
गोवा, केरळ, कोकण किनारपट्टी प्रदेश (महाराष्ट्र), गुजरात, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आदी राज्यांत व नेपाळ देशात ‘अक्षय तृतीया’ सण उत्साहात साजरा केला जातो.
जगनियंत्या भगवान विष्णूने सहावा परशुरामाचा अवतार घेऊन परशुराम भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवा-कोकण भागाला संपन्न केले. ‘सर्वांचे कल्याण व्हावे, हित व्हावे, धन-धान्य-संपत्ती यांची अभिवृद्धी व्हावी आणि ही गोमंत-कोकण मंडळी सदासर्वदा सुखी व्हावी, आनंदी असावी’ अशी आजच्या ‘अक्षय तृतीया’ तिथी-दिनी भगवान शंकर-विष्णू यांच्याकडे आराधना करूया. शुभम् भवतु!