छत्री

0
26

क्षणचित्रं… कणचित्रं…

  • प्रा. रमेश सप्रे

‘छत्र’ या रूपात छत्री हे सत्तेचं, वैभवाचं प्रतीक आहे. राज्याभिषेकानंतर प्रभू श्रीराम ज्यावेळी सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावर प्रिय बंधू भरताने छत्र धरले होते. त्यामुळे रामजानकी या राजयुगुलाची शोभा वाढली होती.

पाऊस भिरभिरत होता. दोन शाळकरी विद्यार्थी एकाच छत्रीतून चालले होते. छत्री मोठी होती. मधला दांडा वेताचा होता नि मूठ वाकडी होती. आजोबांची काठी असते ना, तशी! एकानं भाबडेपणानं विचारलं, “खूप जुनी असेल ना ही छत्री?” यावर छत्रीचा मालक विद्यार्थी अभिमानाने म्हणाला, “माझी ही तिसरी पिढी!” यावर दुसऱ्याची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती, “बाप रे! इतकी टिकलीय ही छत्री?” दुसरा गंभीरपणे म्हणतो, “हो तर! आजोबांच्या काळात हिचं कापड फाटलं म्हणून बदललं गेलं. बाबांच्या काळात हा मधला दांडा मोडला म्हणून नवा घातला. नंतर छत्रीच्या आतल्या तारा वाकल्या म्हणून नव्या घालाव्या लागल्या. तरी छत्री मात्र तीच आहे- आजोबांची.”
वरवर पाहिलं तर हे म्हणणं पटू शकतं, नाही का? असो.

आपल्या जीवनातल्या अनेक उपयुक्त वस्तूंमध्ये छत्रीचा समावेश असतोच. आता दुचाकी वाहनांमुळे रेनकोटचा उपयोग वाढला तरी छत्री आपलं स्थान टिकवून आहेच. घडीची छत्री निघाली. एवढंच नव्हे तर दोन घड्या घालून पर्समध्ये मावेल एवढी छत्रीही मिळू लागलीय. पण खरी ‘क्लासिकल’ छत्री म्हणजे वाकडी मूठ असलेली. अशी छत्री फक्त मौसमी (सिझनल) उरत नाही. अनेक वसाहतीत सकाळी फिरायला बाहेर पडणाऱ्या वृद्ध आजोबांच्या किंवा प्रौढ काकांच्या हातात वर्षभर अशी छत्री असते.

एका आजोबांनी ‘छत्रीचे एकशे एक उपयोग’ या विषयावर बोलून वक्तृत्व स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळवले होते. काही उपयोग असे-
() उन्हा-पावसापासून रक्षण करणे, () चालताना आधारासाठी काठीसारखा उपयोग करणे, () कुत्र्यांना हाकलण्यासाठी प्रभावी साधन, () नको असलेल्या व्यक्तींना चुकवणे, () हक्काने शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या बागेतली उंच फुलझाडे वाकवून फुले चोरणे, () मुलांशी खेळताना काठी, तलवार, बंदूक असे अनेक उपयोग.

एकूण काय नित्यनियमानं छत्री वापरणारी मंडळी आहेत. दुर्दैवानंती काळाच्या पडद्याआड जाताहेत. असो.

छत्रीची एक गमतीची व्याख्या केली गेलीय. छत्री म्हणजे विसरली जाणारी (हरवणारी) किंवा चोरली जाणारी वस्तू. ‘अ थिंग विच इज आयदर लॉस्ट ऑर स्टोलन.’ यासंदर्भात एका विसरभोळ्या प्राध्यापकांचा मजेदार किस्सा सांगितला जातो. पावसाळ्यात पाऊस असताना आठवणीनं नेलेली छत्री पाऊस नसेल तेव्हा हमखास विसरणारे हे प्राध्यापक. एक दिवस घरी आल्यावर बायकोला म्हणतात, “आज माझं कौतुक कर. आणली की नई मी न विसरता छत्री?” यावर हसत हसत पत्नी म्हणते, “आज तुम्ही छत्री नेलीच नव्हती. घरीच विसरलात.” प्राध्यापक महाशय आश्चर्यानं उद्गारले, “म्हणजे मी दुसऱ्याचीच छत्री घेऊन आलो तर…!”

अनेक कलावंत, प्रतिभावंत, संशोधक, वैज्ञानिक मंडळी आपल्या स्वतःच्याच विश्वात मश्गुल असतात. त्यांच्या अनेक मनोरंजक कथा सांगितल्या जातात. ही अशीच एक घटना-
वैज्ञानिक एडिसन कायम आपल्या संशोधनाच्या चिंतनात मग्न असे. सतत आपला प्रयोगशाळेत. एकदा त्याची पत्नी हातात आणावयाच्या वस्तूंची यादी नि पैसे देऊन त्याला दुकानात पाठवते. ढगांचा गडगडाट होत असल्याने त्याच्या हातात छत्रीही देते. दुकानदाराला ती चिठ्ठी व पैसे देऊन वस्तू द्यायला सांगून एडिसन पुन्हा आपल्या विचारविश्वात हरवून जातो. वस्तू भरलेल्या पिशव्या घेऊन तो घराकडे वेगानं चालू लागतो. इतक्यात जोराचा पाऊस येतो. एडिसनची छत्री दुकानातच राहते. दुकानदार हाकासुद्धा मारतो, पण एडिसन आपल्याच नादात चालत राहतो. काही वेळानं पूर्ण भिजलेला एडिसन दुकानात छत्री विसरलोय का हे पाहायला परत येतो. छत्री त्याच्या हातात देत दुकानदार विचारतो, “आपण छत्री विसरलोय हे तुमच्या लक्षात केव्हा आलं?” एडिसन शांतपणे म्हणतो, “घरी पोचल्यावर छत्री बंद करण्यासाठी हात वर केला तेव्हा कळलं की वर काहीच नाहीये.” याला म्हणतात चिंतनमग्न होणं.

‘छत्र’ या रूपात छत्री हे सत्तेचं, वैभवाचं प्रतीक आहे. राज्याभिषेकानंतर प्रभू श्रीराम ज्यावेळी सिंहासनावर विराजमान झाले तेव्हा त्यांच्या डोक्यावर प्रिय बंधू भरताने छत्र धरले होते. त्यामुळे रामजानकी या राजयुगुलाची शोभा वाढली होती.

आपले सर्वांचे प्राणप्रिय शिवाजीराजे हे ‘छत्रपती’ म्हणूनच ओळखले जातात.

संतसूर्य जगद्गुरू तुकारामांनी देहूजवळील भंडाऱ्याच्या डोंगरावर अतिशय तीव्र अशी नामसाधना करून विठ्ठलाचा साक्षात्कार करून घेतला. ते वैकुंठाला गेल्यानंतर तीनशेहून अधिक वर्षं भंडाऱ्याच्या माथ्यावर तुकोबांचे निर्गुण स्मारक होते. म्हणजे समाधी वगैरे काहीही नव्हतं. काही वर्षांपूर्वी या अलौकिक संताच्या मूर्तिस्थापनेनंतर मस्तकावर देखणी मेघडंबरी (म्हणजे उंच छत्र) बांधली गेली.

चित्रपटसृष्टीत छत्री ही एक रोमान्स करायला आदर्श वस्तू म्हणून वापरली गेलीय. अर्थात मुसळधार पाऊस कोसळताना! राजकपूर-नर्गिसचं ते अमर गाणं आठवतंय का? एकच छत्री; तीही छोटी. नाचत-गात पावसात भिजत ती छत्री मात्र हातात धरलेली असते. ‘प्यार हुआ, इकरार हुआ है, प्यार से फिर क्यूँ डरता है दिल?’ अर्थात हल्लीच्या ‘खुल्लम खुल्ला प्यार’ करण्याच्या जमान्यात हे गीत नि ती छत्री फारच केविलवाणी वाटेल. फक्त स्मरणरंजन करायला हरकत नाही.

एखाद्या जीवनसत्य सांगणाऱ्या गीतात त्या परमेश्वराला ‘वो निली छत्री वाला’ असंही म्हटलेलं असतं. असो.

पॅराशूट म्हणजे हवाई छत्रीच नाही का? आपात्कालीन परिस्थितीत (इमर्जन्सी) जीव वाचवण्यासाठी ही हवाई छत्री उपयोगी पडतेच; पण शत्रूच्या प्रदेशात सैनिकांना (पॅराट्रूपर्स) अलगद उतरवण्यासाठीही हवाई छत्री उपयोगी पडते. यासंदर्भात एक मार्मिक सुविचार आहे- ‘अवर माईंड्‌‍स आर लाइक पॅराशूट्स, दे डोंट फंक्शन अनलेस ओपन!’ आपली मनं हवाई छत्रीसारखी असतात, उघडी (मोकळी) असतील तरच कार्यक्षम राहू शकतात. किती खरंय!