हिंदूंच्या भावना दुखावल्या; दोघा युवतींविरुद्ध गुन्हा नोंद

0
10

उत्तरप्रदेशमधील राजकारणी आणि गुंड अतिक अहमद याची हत्या करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर हिंदूंविषयी अपमानास्पद मजकूर प्रसारित करून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने दोन इन्स्टाग्राम युजर्सविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी काल दिली.
अतिक अहमद याची हत्या करण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर गोव्यातील दोन युवतींच्या नावाने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करण्यात आला होता. गोवा पोलिसांनी या वादग्रस्त पोस्टची दखल घेऊन भा.दं.स. आणि आयटी कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी सायबर गुन्हा विभागाची मदत घेतली जात आहे. इन्स्टाग्रामला पत्र पाठवून या दोन्ही अकाऊंटधारकांची माहिती दिली जाणार असून, त्यानंतर ते बंद करण्याची सूचना केली जाणार आहे, असे वाल्सन यांनी सांगितले.

‘त्या’ आमदारांविरुद्ध
गुन्हा का नोंदवला नाही

काँग्रेस पक्षातून फुटून गेलेल्या आठ आमदारांनी मंदिर, मशीद व चर्चमध्ये शपथ घेऊनही नंतर पक्षातून फुटून जाऊन हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. मात्र, त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद न करणाऱ्या गोवा पोलिसांनी दोन मुलींवर त्यांच्याविरुद्ध कोणीही तक्रार केलेली नसताना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा नोंद केल्याबद्दल काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.