जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधांसाठी कार्यरत : मांडवीय

0
9

>> जी-20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीत घेतला सहभाग

जी-20 आरोग्य कार्यगट म्हणून आम्ही भविष्यातील जागतिक दर्जाच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधा आणि व्यवस्थेसाठी संयुक्तपणे सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी काल जी-20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीत आपल्या बीजभाषणातून स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी आमंत्रित केलेल्या जी-20 सदस्य देशांतील सर्व प्रतिनिधींचे कौतुक केले. भारताने प्रस्तावित केलेल्या आरोग्यविषयक प्राधान्यक्रमांशी इतर सदस्य देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचे प्राधान्यक्रम सुसंगत केल्याबद्दल डॉ. मांडवीय यांनी समाधान व्यक्त केले.
कोविड-19 महामारीचा जगभरातील आरोग्य व्यवस्थेवर झालेला परिणाम अधोरेखित करीत डॉ. मांडवीय म्हणाले की, आता भीती आणि दुर्लक्ष अशी दोन्ही चक्रे भेदण्याची आपली सामूहिक जबाबदारी असून, याआधी महामारीचा सामना करताना आलेला थकवा आपल्या आताच्या प्रतिबंध आणि प्रतिसादाच्या तयारीत अडथळा ठरणार नाही, याची काळजी आपण घ्यायला हवी. याआधी इटली आणि इंडोनेशियाच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात या सज्जतेला दिली गेलेली गती कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याशिवाय वैद्यकीय प्रतिकारविषयक उपाययोजनांसाठी औपचारिक स्वरुपाच्या जागतिक समन्वय यंत्रणेची गरज असल्याचे डॉ. मांडवीय यांनी अधोरेखित केले.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचेही यावेळी भाषण झाले. भारताच्या जी-20 अध्यक्षपदाचा आधार ‘वसुधैव कुटुंबकम्‌‍’ या प्राचीन भारतीय तत्वज्ञानाममध्ये आहे. सर्वांना परवडणाऱ्या दरात आणि समान उपलब्धता तसेच अधिकार आणि देशांच्या सीमा ओलांडून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणारी प्रणाली तयार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
यावेळी आयुष्य मंत्रालायचे सचिव राजेश कोटेचा, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल, आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल आदी उपस्थित
होते.