उमेदवारी अर्जांसाठी आज शेवटचा दिवस

0
13

>> फोंडा पालिकेसाठी 45, तर साखळीसाठी 31 अर्ज दाखल

फोंडा आणि साखळी या दोन नगरपालिकांच्या 5 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवार दि. 18 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 45 उमेदवारी अर्ज, तर साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 31 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. मंगळवार हा उमेदवारी अर्जांसाठी शेवटचा दिवस असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी दिवसभरात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, साखळी पालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष राजेश सावळ यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यांचा सध्याचा प्रभाग महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्याचे कृषीमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक आणि रॉय नाईक यांनी फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी वेगवेगळ्या प्रभागांतून काल उमेदवारी अर्ज दाखल केले. सोमवारी फोंड्यातून 36 उमेदवारी अर्ज आणि साखळीतून 23 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

रितेश नाईक यांनी प्रभाग 5 मधून आणि रॉय नाईक यांनी प्रभाग 1 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच भाजप फोंडा मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. फोंडा नगरपालिकेचे एकूण अकरा प्रभाग आहेत. प्रभाग 14 मध्ये आत्तापर्यंत एकच उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. प्रभाग 5 मध्ये 5 उमेदवारी अर्ज, तर अन्य प्रभागांमध्ये दोन, तीन, चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
फोंडा नगरपालिका निवडणुकीत मंत्री रवी नाईक यांच्या पुत्राबरोबर त्यांचे काही जवळचे नातेवाईक सुध्दा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. प्रभाग राखीवतेमुळे निवडणूक लढवू न शकणाऱ्या काही आजी-माजी नगरसेवकांनी आपल्या निकटवर्तीयांना निवडणूक रिंगणात उतरले आहे. परिणामी फोंडा पालिका निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

माजी नगराध्यक्षांच्या कन्या निवडणूक रिंगणात

माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांच्या कन्या संपदा नाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माजी नगराध्यक्ष शैलेंद्र शिंक्रे यांनी देखील कन्येला निवडणूक रिंगणात उतरले आहे. माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांच्या पत्नीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.