राज्याची अर्थव्यवस्था 10.33 टक्के दराने वाढणार

0
10

>> आर्थिक सर्वेक्षण अहवालात अंदाज व्यक्त

राज्याची अर्थव्यवस्था आगामी आर्थिक वर्षात 10.33 टक्के दराने वाढण्याची शक्यता आर्थिक सर्वेक्षण अहवालात वर्तविण्यात आली आहे.
राज्यातील मोप-पेडणे येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, उच्च शिक्षणासाठी विविध संस्थांची स्थापना, पर्यटन धोरण, खाण उद्योग सुरू होण्याची शक्यता असल्याने अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गोव्याचे दरडोई उत्पन्न 2021-22 मध्ये 5,27,146 रुपयांपर्यंत वाढले आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न 2017-18 मधील 4,54,172 रुपयांवरून 2020-21 मध्ये 4,86,851 रुपयांपर्यंत सातत्याने वाढले आहे. जीडीपीमध्ये 9.11 टक्के वाढ झाली आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
भारत सरकारने 2022-23 या वर्षात राज्याच्या एकत्रित विकासासाठी 2000.63 कोटी रुपये आणि एसपीव्ही खात्याद्वारे 1914.23 कोटी रुपये वर्ग केले आहेत.

गोवा आयपीबीने एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत 11 नवीन औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या उपक्रमांमधून एकूण 1187.95 कोटी गुंतवणूक अपेक्षित आहे आणि 4697 लोकांची रोजगार क्षमता आहे. वर्ष 2011 ते 2023 या कालावधीत ग्रामीण लोकसंख्येतील घसरण सुरू आहे. गेल्या दशकात ग्रामीण लोकसंख्येची सरासरी घट 1.15 टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.